अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांचे वय ऐशी असून ते येत्या नोव्हेंबरमध्ये एक्याऐंशीव्या वयात पदार्पण करीत आहेत. या वाढत्या वयानुसार होणारे आजार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही होत आहेत. गेल्या काही महिन्यात जो बायडेन (Joe Biden) बोलता बोलता नाव, संदर्भ विसरले आहेत. बायडेन यांच्या या विसरभोळेपणाची चर्चा झाली आणि त्यांना त्यांच्या विरोधकांनी थांबण्याचा सल्लाही दिला आहे. पण जो बायडेन यांनी पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदासाठी उत्सुक असल्याचे जाहीर केले आहे. नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौ-यावर गेले होते. तेव्हा जो बायडेन (Joe Biden) यांनी केलेल्या त्यांच्या स्वागताची आणि सोबतच बायडेन यांच्या उर्जेची चर्चा झाली आहे. पण आता तेच बायडेन पुन्हा त्यांच्या आजारपणामुळे ट्रोल होत आहेत. त्याला कारण ठरला, तो बायडेन यांच्या चेह-यावरील एक डाग. एका फोटोग्राफरनं बायडेन यांचा एक क्लोजअप फोटो काढला. या फोटोमध्ये बायडेन यांच्या चेह-यावर डाग दिसला. हा डाग कुठला याची एवढी चर्चा झाली की शेवटी व्हाईट हाऊसला यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावे लागले. त्यानुसार बायडेन हे स्लीप एपनिया नावाच्या आजारानं त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना श्वास घेतांना त्रास होतो. विशेष म्हणजे, रात्री झोपतांना त्यांच्या शरीरास पुरेसा श्वास घेता येत नाही. त्यामुळे एका मशिनच्या मदतीनं ते श्वास घेतात. फोटोत याच मशिनचा फोटो आला आहे.

जो बायडेन (Joe Biden) यांच्या एका फोटोमध्ये सीपीएपी मशिनच्या पट्ट्याच्या खुणा दिसून आल्यावर एकच खळबळ उडाली. हे मशिन ज्यांना श्वसनाच्या समस्या आहे, त्यांच्यासाठी उपयोगी असते. त्यामुळे या मशिनसारखी मशिन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वापरतात का? त्यांना नेमका कुठला आजार आहे, याची चर्चा होती. त्यावर व्हाईट हाऊसनं स्पष्टीकरण दिलं असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना काही आठवड्यांपासून झोपेत असताना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी ते कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअर-वे प्रेशर (CPAP) मशीन वापरत आहेत. 80 वर्षीय बायडेन यांना दीर्घकाळापासून स्लीप एपनिया नावाचा आजार आहे. या आजारामध्ये रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. विशेषतः झोपेत असतांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो. त्यामुळे स्लीप एपनिया असलेल्या रुग्णांना सीपीएपी ही मशिन वापरावी लागते. बायडेन(Joe Biden) सुद्धा हे मशिन वापरत असून त्यांच्या फोटोमध्येही आता या मशिनच्या पट्ट्याच्या खुणा दिसत आहेत. पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांना बायडेन यांच्या चेहऱ्यावर पट्टी बांधण्याच्या खुणा दिसल्या. त्यापासून बायडेन यांच्या तब्बेतीची चौकशी करण्यात येऊ लागली. मात्र व्हाईट हाऊसनं यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. बायडेन 2008 पासून स्लीप एपनिया या आजाराबरोबर झुंज देत आहेत. वयोमानानुसार आता हा आजार त्यांच्या झोपेत खंड पाडत आहे. बायडेन यांनी डॉक्टरांकडे रात्री झोप लागत नसल्याची तक्रार केल्यावर आता त्यांना सीपीएपी मशीन वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
==========
हे देखील वाचा : 2024 च्या निवडणूकीची AI कडून केली जाणार भविष्यवाणी ?
==========
स्लीप एपनिया आजार म्हणजे, झोपेच्या दरम्यान श्वास घेण्यास येतांनाचे अडथळे. अनेकांना घोरण्याची समस्या असते, ती सुद्धा याच आजारात मोडते. या आजारामुळे उच्च रक्तदाब किंवा हृदयासंबंधित आजार होऊ शकतात. स्लीप एपनियामध्ये, घशाचे स्नायू कमकुवत होऊन फुफ्फुसांमध्ये हवेचा प्रवाह रोखला जातो. जो बायडेन यांनी 20 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.आता 2024 मध्ये होणा-या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी आपली उमेदवारी आधीच जाहीर केली आहे. जर बायडेनच अमेरिकेचे पुन्हा एकदा अध्यक्ष झाले तर अध्यक्षपदाची शपथ घेतांना त्यांचे वय 81 असेल. अमेरिकेचे ते सर्वात वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. मात्र आताच्या कार्यकाळात बायडेन अनेकवेळा धडपडले आहेत. त्यामुळे बायडेन यांनी पुढे आराम करावा असा सल्ला त्यांना त्यांचे विरोधक देत आहेत. एअर फोर्स अकादमीच्या कार्यक्रमात बायडेन पडले होते. हा त्यांचा व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता. या घटनेपूर्वीही बायडेन (Joe Biden) पाचवेळा धडपडले आहेत. आणि यावर त्यांना ट्रोलही करण्यात आले आहेत. आता हेच बायडेन आपल्या आजारावर मात करत पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी उत्सुक असल्याचे सांगत आहेत.
सई बने