राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील जिणमाता हे प्राचिन मंदिर सध्या भाविकांनी भरुन गेले आहे. राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेले सीकर हा संपन्न जिल्हा आहे. या जिल्ह्यातील जिणमाता मंदिर हे भाविकांसाठी श्रद्धेचे मोठे स्थान आहे. टेकडीवजा डोंगरावर हे मंदिर आहे. याच मंदिरासमोर डोंगराच्या माथ्यावर तिचा भाऊ हर्ष भैरवनाथ यांचे मंदिर आहे. अत्यंत जागृत असलेल्या जिणमातेचा आशीर्वाद घेण्यासाठी स्थानिक भक्तांसह देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या भक्तांची गर्दी असते.
औरंगजेबानं जिणमाता मंदिर (Jeen Mata) आणि भैरवबाबा मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला होता. पण औरंगजेबाच्या सैन्यानं मंदिरावर हल्ला केला, त्याचवेळी या सैनिकांवर मधमाशांनी हल्ला केला. त्यामुळे घाबरुन औरंगजेबानं माघार घेतली होती, या हल्ल्यानंतर औरंगजेब आजारी पडला. तेव्हा त्याला मातेच्या क्रोधाची जाणीव झाली. त्यानं मातेची माफी मागत मंदिरात अखंड ज्योत लावली. जिणमातेच्या मंदिराला स्थानिक राजांनी अत्यंत मोठ्याप्रमाणात मदत केली आहे. जिणमातेचा मोठा उत्सव नवरात्रोत्सवात साजरा होत असून रोज हजारो भाविक मातेचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत.
राजस्थानमधील सीकरच्या दक्षिणेस 29 किलोमीटर अंतरावर जिणमाता मंदिर (Jeen Mata) आहे. या जिणमातेची शक्तीची देवी म्हणून पुजा केली जाते. जिणमातेचे हे मंदिर शेकडो वर्षे जुने असल्याचे मानले जाते. जिणमाता हे भारतातील राजस्थान राज्यातील सीकर जिल्ह्यातील एक धार्मिक शक्तीपीठ आहे. हे दक्षिणेकडील सीकर शहरापासून 29 किमी अंतरावर आहे. जिणमाता मंदिर हे शक्तीची देवी दुर्गामाता यांना समर्पित एक प्राचीन मंदिर आहे. जिणमाताचे पवित्र मंदिर एक हजार वर्षे जुने मानले जाते. नवरात्रीच्या काळात लाखो भाविक येथे जिणमाताच्या दर्शनासाठी येतात. स्थानिक महिषासुरमर्दिनीच्या रुपात देवीची पुजा करतात.
जिणमाता मंदिराचा (Jeen Mata) हा परिसर अनेक वृक्षांनी वेढलेला आहे. या जिणमातेचे मुळ नाव जयंतीमाला असे होते. तिचेच मंदिर असलेले जिणमाता मंदिर कधी बांधले हे सांगता येत नाही. मात्र या मंदिराचे सभामंडप आणि मंदिराचे कोरीव काम असलेले खांब यावरुन मंदिर शेकडो वर्ष जुने असल्याचे जाणकार सांगतात. जिणमाता मंदिर जयपूरपासून राजस्थानमधील प्रसिद्ध अशा अरवली हिल्समध्ये आहे. जिणमाता हा दुर्गा मातेचा अवतार आहे. हस्तिनापुरातून वनवासात असताना पांडवांनी हे जिणमाता मंदिर बांधले होते असे मानले जाते. त्यानंतर मंदिराची वेळोवेळी दुरुस्ती करण्यात आली आहे. मंदिराचा सर्व परिसरच सुंदर असून याभागात वृक्ष मोठ्या प्रमाणात असल्यानं पक्षांचे प्रमाणही भरपूर आहे. मंदिराची वास्तू शेकडो वर्षाची असली तरी मंदिर अद्यापही अत्यंत भक्कम आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या सर्व खांबांवर वनस्पती, फुले, पाने आणि प्राणी, नर्तक आणि देवतांच्या प्रतिमा कोरण्यात आले आहेत.
============
हे देखील वाचा : वैष्णो देवीजवळील शिवखोरी गुहेचे रहस्य
============
स्थानिक जिणमाता मंदिराबाबत (Jeen Mata) अनेक आख्यायिका सांगतात, त्यातील एका अख्यायिकेनुसार, जिणमातेचा जन्म चौहान वंशातील राजपूत कुटुंबात झाला. जिणमातेचे तिच्या धाकट्य़ा भावावर, हर्षवर खूप प्रेम होते. जिणमाता आपल्या वहिनीसोबत एकदा चर्चा करत असताना हर्षचे कोणावर जास्त प्रेम आहे, यावरुन त्यांच्यात वाद झाला. यावर हर्ष ज्याच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा प्रथम उचलेले, त्यावर त्याचे प्रेम अधिक आहे, असे ठरले. पण हर्ष यानं जिणमातेच्या डोक्यावरील हंडा न उचलता आधी बायकोकडील हंडा उचलला. त्यामुळे जिणमाता क्रोधीत होऊन अरवलीच्या काजल शिखरावर गेली. तिथे जिणमाता तपश्चर्या करू लागली. हर्षला या वादाचे कारण समजल्यावर तो बहिणीला परत येण्यासाठी आग्रह करु लागला. पण जिणमातेनं नकार दिल्यावर हर्षनेही भैरोची टेकडीवर तपश्चर्या सुरू केली आणि त्याला भैरो पद प्राप्त झाले. या भागात मोठ्या प्रमाणात जिणमातेचे भक्त येतात. भारतभरातून येणा-या या भक्तांसाठी या भागात मोठ्या संख्येनं धर्मशाळा बांधण्यात आल्या आहेत. या मंदिरात चैत्र आणि अश्विन महिन्यात मोठा उत्सव होतो. यासाठी लाखो भाविक जमतात. जिणमातेचे मंदिर (Jeen Mata) कधीही बंद होत नाहीत. मंदिराचे दरवाजे चोवीस तास उघडे असतात. अगदी ग्रहणकाळातही मातेची आरती नियमीत वेळी केली जाते.
सई बने