आपल्या भारतीय जेवणाला मसाल्यांना जगातील बरेच लोकं नावं ठेवतात. त्याची खिल्ली उडवतात. मात्र आपले जेवण आणि त्यात वापरण्यात येणाऱ्या सर्वच गोष्टी आपल्या शरीरासाठी आणि पर्यायाने आपल्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहेत. अगदी मोहरीपासून दालचिनी, तेजपत्ता आदी सर्वच मसाले आरोग्याच्या दृष्टीभे फायदेमंद आहेत. अनेक अभ्यासांमधून हे सिद्ध झाले आहे.
आपल्या भारतीय लोकांच्या जेवणातला असाच एक सर्वांचा अतिशय लाडका आणि प्रत्येक घरात सहज उपलब्ध होणार पदार्थ म्हणजे जिरे. प्रत्येक भाजीमध्ये, आमटीमध्ये, उपवासाला, रोजच्या जेवणात आपल्या कडे सर्रास जिऱ्याचा वापर केला जातो. हेच जिरे आपल्या जेवणाला चव देण्यासोबतच शरीरासाठी आणि विविध आजारांसाठी देखील फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया जिऱ्याचे विविध प्रकारचे फायदे.
पचन सुधारते
जिऱ्याचा वापर अपचनापासून आराम देतो. जिरे पचनाला चालना देते, त्यामुळे अन्न लवकर पचते. जिरेमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, कॉपर, मॅंगनीज, अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे शरीराला जळजळ होण्यापासून वाचवते. जिर्याच्या पाण्याचे सेवन करून तुम्ही शरीराला डिटॉक्सिफाई करण्यास मदत करू शकता.
लोहाचा स्त्रोत
जिरे हा नैसर्गिक लोहाचा स्रोत आहे. एक चमचे जिरे पावडरमध्ये 1.4mg लोह असते. जिऱ्याचे रोज योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील लोहाचे प्रमाण सुधारते.
रक्तातील कोलेस्टेरॉलचे नियंत्रण
जिऱ्याच्या सेवनाने रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. सोबतच हृयविकाराना देखील आपल्यापासून दूर ठेवण्यास जिरे उपयुक्त आहे.
वजन कमी करण्यास मदत होते
जिरे खाल्ल्याने लोकांचे वजन कमी होण्यास मदत होते. जिऱ्याचे काही आठवडे नियमित सेवन केले तर नक्कीच वजन कमी होण्यास मदत होते.
अन्न संक्रमण प्रतिबंध
मसाला म्हणून जिऱ्याचा पारंपारिक वापर करण्यामागे अन्न सुरक्षित करणे हे देखील एक कारण असू शकते. जिऱ्यामध्ये अँटीमाइक्रोबियल असल्यामुळे ते अन्नाशी संबंधित संसर्गापासून आपले संरक्षण करते. जिरे अन्नामध्ये वाढणारे बॅक्टेरिया आणि बुरशी रोखतात. पचन दरम्यान, जिरे मेगालोमिसिन सोडते ज्यामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात.
निद्रानाशावर उपयुक्त
जिऱ्यामध्ये असलेले गुणधर्म झोपेची समस्या दूर करण्यात मदत करतात. हे सहजपणे तणावाची लक्षणे कमी करू शकतात. जिऱ्याच्या पाण्यात मेलाटोनिन देखील असते, ज्यामुळे चांगली झोप येते.
जिऱ्यामध्ये लोह, पोटॅशियम, जस्त आणि कॅल्शियम यांचा समावेश असतो. पोटॅशियम रक्तदाब आणि हृदय गती नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे, तर जस्त रोगप्रतिकारक कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
जिऱ्याचे सेवन कसे करावे
पाण्यामध्ये जिरे टाकून त्यात मीठ आणि लिंबू पिळून तुम्ही ते पाणी पिऊ शकतात. याशिवाय गरम पाण्यामध्ये एक चमचा जिरे टाकून ते पाणी थंड झाल्यावर प्याल्यास देखील फायदेशीर ठरू शकते.
(यापैकी कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)