आज भगवान श्रीकृष्णांची जयंती अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमी. संपूर्ण भारतामध्ये मोठ्या जल्लोषात हा सण साजरा केला जातो. विष्णूचा आठवा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला बुधवारी द्वापारयुगातील रोहिणी नक्षत्रात झाला. आजचा दिवस म्हणजे बाळकृष्णाचे लाड करण्याचा, त्याला पाळण्यात घालून झोका देण्याचे सौभाग्य मिळवण्याचा.
श्रावण महिन्यातील अतिशय महत्वाचा आणि मोठा सण म्हणजे गोकुळाष्टमी. या दिवशी भगवान विष्णुचा आठवा अवतार म्हणजे श्रीकृष्ण यांचा जन्म झाला. या दिवसाला श्री कृष्ण जयंती तसेच श्री कृष्ण जन्माष्टमी असे देखील म्हटले जाते. हा दिवस कृष्ण भक्तांसाठी सर्वात मोठा सोहळा असतो. केवळ भारतात नव्हे तर श्रीकृष्णाचे भक्त असलेल्या जगाच्या कानाकोपऱ्यातदेखील श्री कृष्ण जयंती साजरी केली जाते. या दिवशी श्री कृष्णाच्या बाल अवताराची पूजा केली जाते.
मात्र आपण एकीकडे गोपाळ कृष्णाचे सर्व लाड करत असताना दुसरीकडे कृष्ण जन्माष्टमीची पूजा आणि उपवास करण्याची देखील प्रथा आहे. आजच्या दिवशी जन्माष्टमीचा उपवास आणि पूजा याबद्दल आपण माहिती घेऊया. उपवास करण्याच्या विविध पद्धती आणि पूजा करताना काय करावे आणि काय करू नये हे देखील आपण या लेखातून जाणून घेऊया.
अनेक घरांमध्ये संपूर्ण दिवस उपवास केले जातात. कृष्णजन्मानंतर रात्री मोठा जल्लोष करत लड्डू गोपाळाला झुल्यात झूलवले जाते सोबतच पाळणे देखील गायले जातात. श्री कृष्णाच्या आवडीचे ५६ भोग सुद्धा लावले जातात. आज गोकुळाष्टमीचा उपवास करताना त्याचे नियम आणि विधी आपल्या धर्मात सांगितले आहेत. आजच्या दिवशी काय खावे काय खाऊ नये? सर्व जाणून घेऊया.
गोकुळाष्टमीच्या दिवशी लवकर उठून स्नान करतात, श्रीकृष्णाची आराधना करून पूजा करतात. शिवाय जोपर्यंत कृष्ण जन्म होत नाही तोपर्यंत उपवास करतात. यादरम्यान अनेकजण निर्जळी व्रत करतात तर काही फलाहार करतात. वेगवेगळ्या लोकांसाठी आणि वेगवेगळ्या प्रदेशांसाठी उपवासाचे नियम वेगळे आहेत. गोकुळाष्टमीला, लोक सहसा एक दिवस उपवास करतात आणि प्रार्थना करतात. हा उपवास मध्यरात्री कृष्ण जन्मानंतर सोडला जातो.
काही लोकं जन्माष्टमीच्या दिवशी सकाळपासून कृष्ण जन्मापर्यंत निर्जळी उपवास करतात. ते संपूर्ण दिवस काही खात नाही किंवा काही पीतही नाही. तर काही लोकं फळं, दूध, पाणी यांचे सेवन करत उपवास करतात. काही लोकं शुद्ध सात्विक आहार देखील या दिवशी घेतात आणि उपवास करतात.
गोकुळाष्टमीला सफरचंद, केळी आणि डाळिंब यांसारखी फळे खाल्लेली चालतात. शिवाय दही, दूध, पनीर आणि लोणी यांसारखे दुग्धजन्य पदार्थ देखील खाता येतात. सोबतच बटाटे, रताळी खाल्ली जाते, आणि शेंगदाणे, काजू, बदाम आदी मेवा देखील खाल्ला जातो.
गोकुळाष्टमीला सफरचंद, केळी आणि डाळिंब यांसारखी ताजी फळे खाऊ शकतात. तसेच दही, दूध, पनीर आणि लोणीसारखे दुग्धजन्य पदार्थ खाता येऊ शकतात. त्याचप्रमाणे बटाटे, रताळी खाल्ली जाते, आणि शेंगदाणे, काजू, बदाम खाण्यास परवानगी आहे.
गोकुळ अष्टमीच्या दिवशी पूजा करताना काही चुका कटाक्षाने टाळल्या पाहिजे. याबद्दल आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे. त्या चुका कोणत्या जाणून घेऊया.
१ तुळशीला स्पर्श करू नये
जन्माष्टमीला तुळशीची पूजा करताना संध्याकाळी तुळशीच्या रोपाला अजिबात स्पर्श करू नका. देवी लक्ष्मी स्वतः तुळशीमध्ये वास करते आणि संध्याकाळी स्पर्श केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते.
======
हे देखील वाचा : कृष्ण जन्माष्टमीची माहिती आणि पूजा मुहूर्त
======
२ तुळशीची पाने
श्रीकृष्णाला तुळशीची पाने अर्पण करायची असतील तर ती ओरबडून तोडू नयेत. तुळशीला नमस्कार करावा आणि पाने तोंडात असल्याचे सांगावे, त्याबद्दल माफी देखील मागावी आणि नंतर तिची पाने हलक्या हाताने तोडून घ्यावी.
३ मोकळे केस
तुळशीची पूजा करताना महिलांनी त्यांचे केस मोकळे सोडू नये. तुळशीपूजेच्या वेळी नेहमी केस बांधून ठेवा.
४ परिक्रमा
तुळशीची पूजा केल्यानंतर किंवा तुळशीला जल अर्पण केल्यानंतर प्रदक्षिणा करण्यास विसरू नका. तुळशीच्या पूजेनंतर तिला तीन वेळा प्रदक्षिणा करा.