Home » भक्तांच्या नवसाला पावणारी ‘बुढी काली मॉं’

भक्तांच्या नवसाला पावणारी ‘बुढी काली मॉं’

by Team Gajawaja
0 comment
Budhi Kali Mata Mandir
Share

बिहारच्या किशनगंजमधील 100 वर्षापूर्वीचे ‘बुढी काली मॉं’ मंदिर म्हणजे तमाम देवीभक्तांसाठी श्रद्धेचे मोठे स्थान आहे.  मुळात या मंदिराचे नावच भक्तांना आपल्याकडे खेचून घेते. या मंदिराला स्थानिक भाषेत बुढी किंवा बुढीया काली मंदिर असे म्हटले जाते. मंदिर शंभर वर्षाहून अधिक जुने असल्याने त्याला स्थानिक भाषेत बुढी काली मॉं मंदिर (Budhi Kali Mata Mandir) म्हटले गेले आणि कालांतराने बुढी काली मॉं मंदिर अशीच या मंदिराची ओळख झाली आहे.  

या काली मॉं मंदिरांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. विवाहइच्छुकांनी या मंदिरात नवस बोलल्यास त्यांची इच्छा पूर्ण होते, असे मानले जाते. तसेच या मंदिरात देवाच्या मूर्ती अर्पण करायची परंपरा आहे. मात्र कोणीही सहजासहजी या मूर्ती अर्पण करु शकत नाहीत. त्यासाठी रांग लावाली लागते आणि ही रांग आता 21 वर्षांची आहे. म्हणजेच आता जर भक्तांना मुर्ती अर्पण करायची असेल तर त्यांना पुढची 21 वर्ष वाट पहावी लागणार आहे. एवढी येथे भक्तांची गर्दी असते.  

काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बिहारच्या दौऱ्यावर होते. यात त्यांनी किशनगंजच्या ऐतिहासिक बुढी काली मंदिराला (Budhi Kali Mata Mandir) भेट देऊन पुजा केली. यांनतर बुढी काली मॉं मंदिर म्हणजे काय याबद्दल उत्सुकता जागृत झाली. बिहारमध्ये या मंदिराला हिंदु-मुस्लिम समजातील एकीचे प्रतिक म्हणून ही बघितले जाते. सुमारे 100 वर्षापूर्वी स्थानिक नवाब असद रझा यांनी या मंदिराल जमीन दिली होती. या नवाबाची मनोकामना देवीनं पूर्ण केल्यानं देवीच्या मंदिरासाठी ही जमिन दिल्याचे स्थानिक सांगतात. मुस्लिम बहुल भागात असणाऱ्या या मंदिरानं हिंदु-मुस्लिम सलोखा जपला आहे.   

किशनगंजमधील बुढी काली मॉं मंदिराचा (Budhi Kali Mata Mandir) महिमा अनन्यसाधारण आहे. हे काली मंदिर सिद्ध आणि जागृत देवस्थान असल्याचे सांगितले जाते. येथे उपासकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भक्तांची धारणा आहे. या मंदिराची स्थापना 1902 मध्ये झाली. कार्तिक अमावस्येला येथे विशेष निशी पूजा केली जाते. मंदिरात येणाऱ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे त्यानंतर देवीला मोठ्या संख्येने पुष्पहार अर्पण करण्यासाठी आणि देवीची पूजा करण्यासाठी भक्त गर्दी करतात. 

===========

हे देखील वाचा : अयोध्येतील रामलीलेत कलाकारांची मांदियाळी….

===========

मनोकामना पूर्ण झालेले भक्त देवीला लाडू आणि पेढ्यांचा नैवेद्य दाखवतात. हा प्रसाद मग भक्तांना वाटण्यात येतो. प्रसादाची वेळ सकाळी सात रात्री नऊ पर्यंत असते आणि  सर्ववेळ मंदिरात गर्दी असते.   1902 मध्ये जेव्हा या बुढी काली मॉं मंदिराची स्थापना झाली तेव्हापासूनच माँ कालीची अखंड पूजा केली जाते. भक्तांना बुधवारी संध्याकाळी विशेष खिचडी अर्पण केली जाते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार जेव्हा या बुढी काली मॉं मंदिराची(Budhi Kali Mata Mandir) स्थापना झाली तेव्हा हा सर्व परिसर घनदाट जंगलांनी वेढलेला होता आणि या भागात दरोडेखोरांचे  वास्तव्य होते. हे दरोडेखोर देवीची पुजा करीत असत. मंदिरात एक त्रिशुलही त्यांनी लावला होता. या छोट्या मंदिराचे नंतर मोठ्या मंदिरात रुपांतर झाले. 

आता नवरात्रात या बुढी काली मॉं मंदिराची सजावट करण्यात आली आहे. नवरात्रीनिमित्त विशेष पुजाही करण्यात येणार आहेत. त्यातच गृहमंत्री अमित शहा यांनी य मंदिरात पुजा केल्यानं मंदिराबाबत आणखी प्रसिद्धी झाली आहे,  त्यामुळे  भाविकांची अधिक गर्दी होत असल्याचे पुजाऱ्यांनी सांगितले.  

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.