काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकातील ऑस्कर आणि मायलो या श्वानांना रिटायरमेंट देण्यात आली. मुकेश अंबानींच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर कारमध्ये ठेवलेल्या स्फोटक प्रकरणाची तपासणी करताना ऑस्कर या श्वानाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. माणसं डोळ्यांनी ज्याचा शोध घेऊ शकत नाहीत, ते फक्त वासावरून काही मिनिटांतच शोधण्याचं कसब या श्वानांमध्ये असतं. पण श्वानांमध्ये असलेलं हे कसब वापरण्याचा विचार ज्या माणसाच्या डोक्यात पहिल्यांदा आला, त्याचं सुद्धा कौतुक केलं गेलं पाहिजे. तसं बघायला गेलं तर फक्त बॉम्बशोधण्यासाठी नाही आणि फक्त श्वानांचाच नाही, तर इतर प्राण्यांचा सुद्धा गुप्तहेर म्हणून वापर मोठ मोठ्या गुप्तहेर संस्थांकडून करण्यात आलेला आहे. पण हे करताना त्यांची बऱ्याचदा पंचाईत सुद्धा झाली आहे. गुप्तहेर म्हणून कोणते प्राणी वापरण्यात आले होते आणि ते वापरताना गुप्तचर संस्थांची पंचाईत कशी झाली, हे जाणून घेऊया. (Intelligence Agency)
मुळात प्राण्यांना गुप्तहेर म्हणून किंवा तशाच प्रकारच्या कामांसाठी वापरणं हे एखाद्या व्यक्तीला वापरण्यापेक्षा खूप सुरक्षित असू शकतं. गुप्तहेराला अटक झाल्यानंतर त्याच्याकडून माहिती काढून घेणं सोयीस्कर असू शकतं. पण एखाद्या प्राण्याला गुप्तहेर म्हणून वापरल्यानंतर, जरी तो प्राणी पकडला गेला. तर त्यांच्याकडून माहिती कशी काढून घेणार ? म्हणूनच गुप्तहेर आणि तशाच कामांसाठी प्राण्यांचा वापर करण्याचा विचार केला गेला असावा. एक महिन्यापूर्वी नॉर्वेच्या समुद्रात बेलूगा व्हेल मासा मृत अवस्थेत सापडला. जेव्हा ही बेलूगा व्हेल काही वर्षांपूर्वी दिसली होती तेव्हा तिच्या शरीरावर एक हार्नेस आणि एक छोटा कॅमेरा लावण्यात आल्याचं आढळलं होतं. या हार्नेसवर ‘सेंट पीटर्सबर्ग इक्विपमेंट’ असं लिहिलेलं होतं. त्यावरून हा अंदाज बांधण्यात आला की, ही व्हेल रशियन गुप्तहेर आहे. रशियन नौदल माशांना ट्रेनिंग देण्यासाठी प्रसिद्ध आहे. (Social News)
जेव्हा अमेरिका आणि सोव्हिएत संघात शीत युद्धाची ठिणगी पेटत होती, तेव्हा सोव्हिएत संघाच्या नौदलाने समुद्रातील काही प्राण्यांना ट्रेनिंग देण्याचा एक कार्यक्रम राबवला होता, ज्यामध्ये प्राण्यांचा वापर समुद्राच्याखाली पाळत ठेवण्यासाठी केला गेला. १९६० च्या दशकात सीआयए या अमेरिकन इंटेलिजेंस एजन्सिने प्रोजेक्ट ऑक्सीगॅस सुरू केला होता, ज्याअंतर्गत डॉल्फिनला शत्रूच्या जहाजांवर स्फोटक उपकरणं लावण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी पकडण्यात आलेल्या दोन बॉटलनोज डॉल्फिनसचा वापर करण्यात आला होता. त्याशिवाय याच वर्षी सीआयएनेच गुप्त माहिती मिळवण्यासाठी मंजिरींचासुद्धा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. (Intelligence Agency)
प्रयत्न यासाठी कारण त्यांचा मांजरींना गुप्तहेर बनवण्याचा प्लॅन टोटोल फसला होता. या मिशनचं नाव होतं ऑपरेशन एकॉस्टिक किटी. त्याअंतर्गत त्यांनी मांजरीच्या कानात मायक्रोफोन आणि रेडिओ ट्रान्समीटर बसवले. मांजर हा एक सामान्य पाळीव प्राणी आहे. सार्वजनिक किंवा घरात बंद ठिकाणी मांजर गेलं, तर त्यावर कोणीच संशय घेणार नाही. शत्रूच्या ठिकाणी मांजर गेल्यानंतर मांजरींच्या कानात बसवलेल्या मायक्रोफोन आणि रेडिओ ट्रान्समीटरद्वारे शत्रूचं बोलणं ऐकण्याचा त्यांचा प्लॅन होता. ही प्लॅनिंग, हे मिशन ऐकायला भारी वाटतं असेल, पण मांजरांना ट्रेनिंग देताना काहीतरी भलतच घडलं. फिल्ड टेस्टिंगदरम्यान त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात सीआयए अधिकाऱ्यांची दमछाक होत होती. मांजरीला नेमक्या ठिकाणी जाण्याचं ट्रेनिंग देऊन सुद्धा मांजर त्याच्या मर्जीप्रमाणे इथे तिथे पळत होतं. असंच ट्रेनिंग दरम्यान एक मांजर गाडी खाली येऊन मेलं. त्यामुळे अमेरिकेने मांजरींना स्पाय म्हणजे गुप्तहेर बनवण्याचा प्लॅन कॅन्सल केला. मांजरी चांगल्या गुप्तहेर बनू शकत नाहीत, हे समजण्यासाठी अमेरिकेला सात वर्ष लागली. शेवटी १९६७ साली जवळ जवळ १०० कोटींपेक्षा जास्त पैसे खर्च केल्यानंतर त्यांनी हा कार्यक्रम रद्द केला. (Social News)
सीआयएचा हा प्रयोग फक्त मांजरींपुरता मर्यादित नव्हता. सीक्रेट मिशनस दरम्यान गुप्तहेर दुसऱ्या गुप्तहेरला किंवा एजंटला माहिती पुरवण्यासाठी एका पूर्वनियोजित ठिकाणीच संदेश किंवा दस्ताऐवज टाकतो. याला डेड ड्रॉप असं म्हणतात. शीतयुद्धाच्याच काळात सीआयएने गुप्तहेरान माहिती किंवा दस्ताऐवज लपवून एकमेकांपर्यंत पोहचवण्यासाठी मृत उंदरांचा वापर करण्याचे ऑर्डर्स दिले होते. मृत उंदराच्या मृतदेहावर प्रिझर्व्हेटिव्ह लावून त्याच्या आतील भागाचा वापर करून त्यामध्ये नोट्स आणि गुप्त फोटो लपवले जातील, अशीही आयडिया होती. आता उंदीर म्हटलं की, कोणताही माणूस त्याच्या जवळ जाणार नाही. म्हणून आयडिया एकदम भारी आहे, असं वाटलं होतं. पण या मिशनमध्ये सुद्धा सीआयएच्या समोरून मांजरच आडवी गेली. मांजरींनी हे सीआयएचे उंदीर उचलायला सुरुवात केली. अशा प्रकारे सीआयएची आणखी एक आयडिया मांजरीमुळे फ्लॉप गेली. (Intelligence Agency)
======
हे देखील वाचा : नव्याची आशा !
====
आता तुम्ही म्हणाल, हे सर्वच प्राणी गुप्तहेर म्हणून हवी तशी कामगिरी करू शकले नाहीत. पण एक प्राणी म्हणजेच पक्षी असा आहे, ज्याने गुप्तहेर म्हणून चोख कामगिरी केली. तो पक्षी म्हणजे कबुतर. खूप आधीपासूनच कबुतरांचा गुप्तहेर आणि संदेशवाहक म्हणून वापर केला गेला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश गुप्तचर संस्थेने एक ऑपरेशन राबवलं होतं, ज्यामध्ये जर्मन सैन्याच्या घडामोडी आणि महत्त्वाचे ठिकाणांची गुप्त माहिती मिळवण्यासाठी कबूतरांचा वापर करण्यात आला होता. कागदावर लिहिलेले छोट्या छोट्या चिठ्या कंबूतरांच्या पायाला बांधल्या जायच्या. या कबुतरांमुळेचं नाझी सैनिकांच्या शस्त्रांची आणि नियोजित रॉकेट हल्ल्यांची महिती त्यांना आधीच मिळत होती. ब्रिटिश गुप्तचर यंत्रणांनी १९४१ ते १९४४ या काळात नाझींच्या ताब्यातील युरोपमध्ये १६,००० कंबूतरांचा वापर केला होता. प्राण्यांचा गुप्तहेर म्हणून वापर करण्याचे अनेक धाडसी प्रयोग झाले. ज्यामध्ये गुप्तचर संस्थांना कधी यश आलं तर कधी प्राण्यांमुळे त्यांची पंचाईत झाली. (Social News)