Home » इंद्रदेवही या देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात…

इंद्रदेवही या देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात…

by Team Gajawaja
0 comment
Kanaka Durga Devi
Share

भारतात सर्वदूर देवीची मंदिरे आहेत.  या सर्व मंदिरांची स्वतंत्र्य अशी आख्यायिका आहे. प्राचीन काळापासून असलेल्या या मंदिरांमध्ये देवीची विविध रुपे असून त्यांची मनोभावे पूजा केली जाते.  असेच एक मंदिर आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील इंद्रकीलाद्री पर्वतावर आहे. माता दुर्गेचे हे अतीप्राचीन मंदिर असून मंदिर कनक दुर्गा देवीला समर्पित आहे. स्थानिकांच्या सांगण्यानुसार कनक दुर्गा मंदिरातील देवीची मूर्ती ही स्वयंभू आहे. या मंदिराचा उल्लेख शिवलीला आणि शक्ती महिमा यामध्येही आहे. हे मंदिर इंद्रकीलाद्री टेकडीवर कृष्णा नदीच्या काठावर आहे. कनक दुर्गा देवीचा महिमा अगाध असून कालिका पुराण, दुर्गा सप्तशती यामध्ये इंद्रकीलाद्री येथील देवी कनक दुर्गेचा हा महिमा सांगण्यात आला आहे.  काही भक्त या कनक दुर्गा देवीला देवी शाकंभरीचे रूप मानतात.  (Kanaka Durga Devi)

विजयवाडा येथील या कनकदुर्गा माता मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त अनेक धार्मिक सोहळे साजरे होत आहेत.  आता नवरात्रीच्या काळात, कनक दुर्गा देवीला बालत्रीपुरा सुंदरी, गायत्री, अन्नपूर्णा, महालक्ष्मी, सरस्वती, दुर्गा देवी, महिषासुरमर्दिनी आणि राजराजेश्वरी देवी यांच्या रुपात सजवले जाते. देवीचे हे वेगवेगळे रुप बघण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. नवरात्रीचे हे नऊ दिवस हा सोहळा मोठ्या उत्सवात साजरा होत असताना दस-याच्या दिवशी त्याचा समारोप करण्यात येतो.  हा सोहळाही मोठा असतो.  यासाठी देशविदेशातील कनकदुर्गा मातेचे भाविक उपस्थित असतात.  विजयादशमीच्या दिवशी कनक दुर्गा देवीला हंसाच्या आकाराच्या बोटीवर बसवून कृष्णा नदीच्या फेरफटका मारला जातो.  ही परंपरा थेप्पोत्सवमया नावाने प्रसिद्ध आहे.  याचवेळी येथे शस्त्रांची पूजाही मोठ्या प्रमाणात केली जाते. या पुजेला आयुधापुजा म्हणण्यात येते.  (Kanaka Durga Devi)

या कनकदुर्गा मंदिरामागे अनेक पौराणिक कथा आहेत. एका पौराणिक कथेनुसार, राक्षसांनी पृथ्वीवर मोठा अनाचार सुरु केला. या राक्षसांना मारण्यासाठी माता पार्वतीने वेगवेगळी रूपे धारण केली. मातेने कौशिक अवतारात शुंभ-निशुंभ, महिषासुरमर्दिनी अवतारात महिषासुर आणि दुर्गेच्या अवतारात दुर्गामासुर या राक्षसांचा वध केला.  त्यानंतर कनक दुर्गा मातेने तिचा भक्त असलेल्या कीलानुला पर्वत बनण्याची आज्ञा दिली. महिषासुराचा वध केल्यावर देवीने आठ हातात शस्त्रे घेऊन सिंहावर स्वार होऊन इंद्रकीलाद्री पर्वतावर स्वतःची स्थापना केली. या ठिकाणाजवळील खडकावर ज्योतिर्लिंगाच्या रूपात शिवाची स्थापनाही झाली होती.  भगवान ब्रह्मदेवाने येथे मलेलू फुलांनी भगवान शंकराची पूजा केली. यामुळेच येथे स्थापन झालेल्या शिवाचे नाव मल्लेश्वर स्वामी पडले.  देवीनं या पर्वतावर स्वतःची स्थापना करुन घेतल्यावर तिचे स्वयंभू स्थान तयार झाले.  (Kanaka Durga Devi)

याशिवाय कनकदुर्गा माता मंदिरासंदर्भात महाभारतातही कथा सांगितली आहे.  त्यानुसार अर्जुनने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली.  त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी अर्जुनाला पशुपथ शस्त्र दिले. या जागी अर्जुनाने देवीचे स्थान तयार केले.  तेच हे कनकदुर्गा माता मंदिर असल्याचे सांगण्यात येते.  आणखी एका मान्यतेनुसार आदिदेव शंकराचार्यांनीही या मंदिराला भेट देऊन त्यांनी आपले श्रीचक्र स्थापन केले.  देवीच्या भक्तांच्या सांगण्यानुसार भगवान इंद्र देखील या पर्वताला भेट देतात आणि देवीचा आशीर्वाद घेतात.  म्हणूनच या पर्वताला इंद्रकीलाद्री असे नाव पडले असल्याचे सांगण्यात येते. 

==========

हे देखील वाचा : वाळवंटाचे गाव कसे झाले जगातील सर्वोत्तम गाव

==========

या मंदिरात भाविकाची कायम गर्दी असते.  मात्र नवरात्रौत्सवानिमित्त भक्तांची मोठी गर्दी उसळते.  मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या आहेत.  भाविक या पाय-या हळदी-कुंकवाने सजवतात.  याला मेटला पूजाम्हणतात.  नवरात्रीच्या काळात देवीच्या मंदिराकडे जाणा-या सगळ्या पाय-या या लाल आणि पिवळ्या झालेल्या असतात.  कनकदुर्गा माता मंदिर हे अत्यंत प्रशस्त आहे.  मंदिराचा कळस हा सोनेरी रंगाचा आहे.  लांबवरुन हा देवीचा कळस अत्यंत देखणा दिसत असून त्यावरु मंदिराच्या भव्यतेची जाणीव होते.  कनकदुर्गा मातेची मुर्तीही प्रसन्न आणि भव्य आहे.  देवीच्या हातात आयुधे आहेत.  देवीच्या हातातील त्रिशुळानं राक्षसांचा वध केल्याची आख्यायिका आहे.  देवीचे मुख हळदीनं सजवण्यात येते.  देवीच्या कपाळावर मोठ्या आकारातील कुंकवाचा मळवट आहे.  आरतीच्या वेळी या देवीचे डोळे बघण्यासाठी आणि देवीच्या चेह-यावरील भाव बघण्यासाठी भक्त गर्दी करतात.

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.