नुकतीच भारत आणि ऑस्ट्रेलिया महिलांची एकमेव दिवस-रात्र कसोटी ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट येथे पार पडली. या सामन्यात भारताच्या डावखुऱ्या सलामीवीर, महाराष्ट्रातील सांगलीच्या स्मृती मानधनाने शतक (१२७ धावा) काढून सामनावीर हा किताब मिळवला. ही कसोटी अनिर्णित राहिली तरी भारताच्या महिलांनी फलंदाजी व गोलंदाजीत निर्विवादपणे वर्चस्व गाजवले.
स्मृती तसेच दिप्ती शर्मा यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ८ बाद ३७७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियन महिलांनी ९ बाद २४१ धावा काढल्या. पावसाने वारंवार व्यत्यय आणलेल्या या सामन्यातील दुसऱ्या डावाला तसा काही अर्थ उरला नव्हता. स्मृती मानधना ही ऑस्ट्रेलियात शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला ठरली. तिने नुसतेच शतक झळकावले नाही तर २२ चौकार आणि एक षटकार मारून ऑस्ट्रेलियन गोलंदाजीवर वर्चस्व गाजवले.
याखेरीज अजून एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे भारताच्या पूनम राऊत हिच्या खिलाडू वृत्तीचा. ती ३६ धावांवर असताना विकेटकीपरकडे झेल देऊन बाद झाली. ती पंचांच्या निर्णयाची वाट न बघता पॅव्हेलियनकडे चालू लागली. विशेष म्हणजे पंचानी ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे झेलबाद्चे अपील फेटाळून लावले होते.
भारतीय महिलांची कामगिरी अजून लक्षणीय ठरते कारण ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून ढगाळ हवामानाचा फायदा घेण्यासाठी भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. पण ऑस्ट्रेलियाचे ढिसाळ क्षेत्ररक्षण व भारतीयांची चिवट फलंदाजी यामुळे त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले.
कसोटी मालिकेपूर्वी एक दिवसीय मालिका सुद्धा चुरशीची झाली. ऑस्ट्रेलियाने ही मालिका जरी २-१अशा फरकाने जिंकली असली तरी दुसरा सामना भारताने जवळजवळ जिंकला होता कारण शेवटच्या चेंडूवर झुलन गोस्वामीने ऑस्ट्रेलियन फलंदाजाला बाद केले होते पण तो नो बॉल ठरला आणि अतिरिक्त चेंडूवर ऑस्ट्रेलियाने विजयी धाव काढली. तिसरा अटीतटीचा सामना भारताने शेवटच्या षटकात, दोन विकेट्स राखून, जिंकला आणि ऑस्ट्रेलियाची सलग २६ सामने अपराजित राहण्याची परंपरा खंडित केली.
कसोटीनंतर झालेली टी २० मालिका मात्र ऑस्ट्रेलियन महिलांनी २-० अशी जिंकली व आपले या प्रकारातले वर्चस्व कायम राखले.
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर येण्याआधी भारताने इंग्लंडमध्ये एक कसोटी सामना खेळला होता. तोही सामना भारतीय महिलांच्या जिगरबाज खेळाने अनिर्णित राहिला. पहिल्या डावात स्मृती मानधना व शेफाली वर्माने १६७ धावांची सलामी दिल्यावर,भारतीय डाव २३३ धावात गडगडला. पण दुसऱ्या डावात अष्टपैलू स्नेह राणा व भाटिया या जोडीने नाबाद शतकी भागीदारी करून सामना वाचवला.
भारतीय महिला क्रिकेटला १९७३ मध्ये सुरुवात झाली. त्यावेळी सर्व प्रथम ऑस्ट्रेलियन संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पुण्यात झाला होता. याच मालिकेद्वारे भारताला डायना एदलजी, शांता रंगास्वामी, उज्वला निकम, सुधा शाह, शुभांगी कुलकर्णी यासारख्या खेळाडूंची ओळख झाली.
डायना एदलजी म्हणजे त्यावेळच्या महिला संघातील ‘कपिल देवच’ होती. आक्रमक फलंदाजीबरोबरच ती डावखुरी फिरकी गोलंदाज सुद्धा होती त्यामुळे तिला ‘डायनॅमिक डायना’ असे म्हटले जात असे.
या पहिल्या वाहिल्या मालिकेला भारतीय प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
१९८० नंतरच्या दशकात संध्या अगरवालने त्यावेळच्या सर्वोच्च १९० धावांची खेळी करून महिला कसोटीत विक्रमाची नोंद केली.
विसावं शतक संपत असताना मिताली राजचा भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर उदय झाला आणि या ताऱ्याचे तेज अजून कमी झालेले नाही. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावा नोंदवताना तिने इंग्लंडच्या शार्लोट चा १०२७३ धावांचा विक्रम नुकताच मोडला. ती सध्याच्या भारतीय महिला संघाची कसोटी व एक दिवसीय सामन्यात कर्णधार आहे.
गेली काही वर्षे हरमन प्रीत कौर हिने भारतीय महिला क्रिकेट गाजवले आहे. २०१७ ची विश्वचषक स्पर्धा कोण विसरेल. उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १७१ धावा काढताना तिने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची यथेच्छ पिटाई केली होती. त्या खेळीच्या जोरावरच भारतीय महिलांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात सुद्धा हरमनप्रीत व राऊतने विजयाचा घास हातातोंडाशी आणला होता पण इतर खेळाडूंनी दडपणाखाली कच खाल्ली आणि भारताचे विजेतेपदाचे स्वप्न थोडक्यात हुकले.
२०२० च्या मार्चमध्ये टी 20 विश्वचषकामध्ये सुद्धा भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना हरल्यामुळे उपविजयी ठरला. याच स्पर्धेद्वारे शेफाली वर्मा या युवा मुलीने आपली छाप पाडली.
काळाच्या ओघात अनेक बदल स्वीकारत भारतीय महिला क्रिकेटने आपली वाटचाल सुरूच ठेवली आहे. आता भारतीय क्रिकेट मंडळाकडेच महिला क्रिकेटचे नियंत्रण आल्याने महिला क्रिकेटचा विकास झपाट्याने होऊ लागला आहे यात शंका नाही.
वरील विवेचनावरून असे वाटते की भारतीय महिला क्रिकेटने आता बाळसे धरले आहे. पण काही हानिकारक गोष्टींची लागणही झाली आहे. साधारण तीन वर्षांपूर्वी मिताली राज बरोबर मतभेद झाल्याने रमेश पवार यांची प्रशिक्षकपदावरून उचलबांगडी झाली होती. या घटनेमुळे संघात दुफळी माजल्याचे चित्र निर्माण झाले होते. पवार यांच्या जागी रमण यांची नियुक्ती झाली पण इंग्लंड दौऱ्यापूर्वी रमण याना राजीनामा द्यावा लागला आणि पुन्हा रमेश पवार प्रशिक्षकपदी विराजमान झाले.
मिताली राजचा विरोध हेच रमण यांच्याही राजीनाम्याचे कारण आहे. श्री रमण यांनी जाहीरपणे सांगितले की भारतीय संघात नवी स्टार संस्कृती निर्माण झाली आहे ती घातक आहे. त्यांचा रोख मिताली राजकडे होता. आज वीस वर्षाहून अधिक काळ मिताली राजचे ‘राज्य’ भारतीय महिला क्रिकेटवर चालू आहे. रमण तसेच रमेश पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की आता भारतीय संघात नेतृत्व बदल करण्याची वेळ आली असून स्मृती मानधनाकडे नेतृत्व देणे ही काळाची गरज आहे.
भाकरी फिरवली नाही तर ती करपते या उक्तीनुसार कप्तान बदलला तर भारतीय संघाच्या बाळसाचे रूपांतर गुटगुटीतपणात होईल अन्यथा भारतीय संघाची कामगिरी ‘कृश’ होऊ लागेल.
– रघुनंदन भागवत
(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.