आज आपण आधुनिक काळात जगत असताना अनेक जुन्या गोष्टी मागे सोडून, किंवा कालानुरूप बदलून जगणे कधी कधी आवश्यक होते. याचा अर्थ असा नाही की, आपण आपल्या सर्वच जुन्या गोष्टी मागे सोडून पुढे जावे. जमेल तशा सोयीने त्या गोष्टी वापराव्या, आचरणात आणाव्या. आज सर्वच गोष्टी आधुनिक होत असताना, आपले स्वयंपाक घर कसे मागे राहील.
आजच्या काळात मॉड्युलर किचन ही संकल्पना खूपच गाजत आहे. जवळपास सगळ्याच घरांमध्ये या पद्धतीचे किचन आपल्याला पाहायला मिळते. या किचनला साजेसे किचनमधील भांडी देखील आता सर्व वापरताना दिसतात. नॉनस्टिक, काचेची अशी स्वयंपाकाची भांडी सध्या वापरली जातात. स्टीलचा वापर जरी होत असला तरी तो जास्त नसतो. अशातच पितळी आणि तांब्याची भांडी कोण वापरणार? कारण ही भांडी वापरण्यास अतिशय चांगली आणि आरोग्यदायी असली तरी ती स्वच्छ करणे जरा अवघड काम आहे. मात्र देव पूजेसाठी आजही हीच भांडी वापरली जातात.
मात्र अनेकदा आजही स्त्रिया तांब्याची, पितळेची भांडी हा आपला जुना ठेवा असलेली भांडी खास दिनी, सणासुदीच्या दिवशी नक्कीच वापरायला काढतात. नुकतीच दिवाळी साजरी झाली. या दिवाळीच्या पाच दिवसात अनेकांनी त्यांच्याजवळ असलेली ही भांडी वापरायला काढली असेल. मग आता ते वापरून झाल्यावर स्वच्छ करण्यास महिलांना तसा त्रासच होतो. हेच भांडे पटकन साफ कसे करावे यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
सर्वप्रथम, भांडी स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. एका छोट्या वाटीत अर्धा चमचा मीठ, टुथपेस्ट आणि लिक्विड डिश सोप आणि त्यात थोडं पाणी घालून पेस्ट तयार करा. त्यानंतर हे घट्ट मिश्रण भांड्यांना लावून स्पंजच्या मदतीने भांडी घासून स्वच्छ करा. यामुळे पितळेची भांडी काही मिनिटात स्वच्छ होतील.
चिंच
तांबे आणि पितळेची भांडी काळी पडण्यासाठी चिंचेचा वापर केला जाऊ शकतो. चिंचेचा हा उपाय करून पाहण्यासाठी थोडी चिंच पाण्यात भिजवून ठेवा. चिंच पाण्यात विरघळली की नीट कुस्करून पूजेची भांडी घासून घ्या. यानंतर भांडी स्वच्छ पाण्याने धुवा.
लिंबू आणि मीठ
पूजेची भांडी आणि चांदीच्या मूर्ती स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मीठ वापरू शकता. यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात एक लिंबाचा रस आणि तीन चमचे मीठ टाका. आता या पाण्यात चांदीच्या मूर्ती 5 मिनिटे ठेवा. 5 मिनिटांनंतर या मूर्ती पाण्यातून काढून कापडाने वाळवा.
व्हिनेगर
मंदिरात ठेवलेली तांबे आणि पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी पांढरा व्हिनेगर हा एक उत्तम उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी एका ग्लास पाण्यात दोन चमचे व्हिनेगर घालून उकळा. या व्हिनेगर पाण्यात साबण मिसळा आणि पूजेची भांडी धुवा. असे केल्याने पूजेच्या भांड्यांना त्यांची मूळ चमक परत मिळेल.
बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस
पितळेची भांडी स्वच्छ करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. सर्वप्रथम गरम पाणी घ्या आणि त्यात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिसळा. या पाण्यात सर्व भांडी बुडवून ठेवा. सुमारे 20 ते 25 मिनिटांनंतर स्क्रबरच्या मदतीने ही भांडी घासून घ्या. तुम्हाला आढळेल की ही भांडी जास्त मेहनत न करता सहज चमकतील.
टूथपेस्टसह
प्रथम पितळीचे दिवे साबण किंवा डिटर्जंटने स्वच्छ करा. नंतर थोडी टूथपेस्ट त्यांच्यावर लावा. काही मिनिटांनंतर दिवे घासा यामुळे काळे पडलेले दिवे नवीन असल्यासारखे चमकू लागतील.
व्हिनेगर आणि मीठ
प्रथम, एका भांड्यात तीन चमचे व्हिनेगर आणि एक चमचा मीठ मिसळा. हे मिश्रण दिव्यांवर लावा आणि काही वेळ राहू द्या. त्यानंतर स्क्रबरने हळूवार स्क्रबिंग करा आणि टॅपखाली स्वच्छ धूवून घ्या. शेवटी कोरड्या कापडानं पुसून थोडावेळ उन्हात वाळवा.
लिंबाचा रस
लिंबाच्या रसात कापसाचा बोळा बुडवून पितळेच्या दिव्यांवर घासा. नंतर कोमट पाण्यानं स्वच्छ करा. यामुळे दिवे चमकू लागतील.
तांदळाचे पीठ किंवा चणाडाळ पीठ
एका भांड्यात पाणी, व्हिनेगर, तांदळाचं पीठ किंवा चणाडाळीच्या पीठाचे मिश्रण तयार करा. त्यानंतर या मिश्रणाचा जाड थर दिव्यांवर लावा. पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर साबण किंवा डिटर्जंटने धुवा. नंतर कोरड्या कापडाने पुसून टाका.
टोमॅटो केचप
टोमॅटो केचप पितळेच्या दिव्यांवर लावा तसंच मऊ टूथब्रशने घासून स्वच्छ करा. नंतर पाण्यानं स्वच्छ धुवा आणि कोरड्या कापडानं पुसून टाका. कॅचपच्या अम्लीय गुणधर्मामुळे त्यावर साचलेलं वंगण आणि काळे डाग दूर होतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.