आपण उत्तम आरोग्य टिकवण्यासाठी अनेक उपाय करतो. महागडी डायट करतो. परदेशी भाज्या, फळे किंवा इतर पदार्थांचे सेवन करतो. मात्र आपल्या देशात उपलब्ध असलेल्या भाज्या, फळे ह्या अतिशय गुणकारी आणि आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहेत. या भाज्या, फळं आपण नियमितपणे खाल्ल्यास नक्कीच त्याचा आपल्या शरीरावर आणि पर्यायाने आरोग्यावर फायदा होईल.
अशीच एक आरोग्यदायी भाजी किंवा फळ म्हणजे बीट. बीट खाण्याचे फायदे जर तुम्ही वाचाल तर आजपासूनच बीट नियमितपणे बीट खाण्यास सुरुवात कराल. बीट आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काही लोक या फळाचा रस पितात किंवा भाज्यांमध्ये घालून खातात. यात अनेक जीवनसत्त्वे असतात, जी शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. अनेक आजारानावर देखील बीट हे उत्तम आणि गुणकारी औषधं आहे.
लालसर, गडद गुलाबी रंगाचे गोडसर असणारे बीट जिभेला चव देण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. बीटचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन योग्य राहते आणि त्वचा चमकदार आणि सुंदर राहते. बीटमध्ये कॅलरीज कमी असतात आणि जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या पोषक तत्व भरपूर असतात. बीट हे प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फायबर आणि व्हिटॅमिन सी यांचा उत्कृष्ट स्रोत आहे. तसे पाहिले तर बीट वर्षभर मिळते. मात्र थंडीच्या दिवसात बीटची अवाक मोठ्या प्रमाणावर वाढते आणि बाजारात चांगल्या प्रतीचे बीट मिळायला लागते. हे बीट खाल्ल्याने आपल्याला कोणते फायदे मिळतात ते आपण जाणून घेऊया.
१. बीट हे भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहे. रोज याचे सेवन केल्याने या दोन्हींचे आवश्यक प्रमाण तुमच्या शरिरामध्ये संतुलित राहते. बीटामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम, व्हिटॅमिन बी ९ आणि लोह चांगल्या प्रमाणात आढळते, ज्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो.
२. बीट या फळामध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. जे शरीरातील रक्त वाढवण्यासाठी उपयुक्त मानले जाते. जर तुम्हाला रक्ताच्या कमतरतेची समस्या जाणवत असेल तर तुम्ही या फळाचा आहारात समावेश करू शकता.
३. बीटमध्ये कमी कॅलरीज असतात; तसेच शून्य फॅट असते. त्यामुळे वजन कमी करण्याच्या आहारामध्ये बीटचा समावेश करणे फायदेशीर ठरते. बीट खाण्यामुळे वजन वाढत नाही; तसेच त्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते.
४. बीट हृदयासाठी खूप लाभदायक ठरू शकते. बीटमध्ये नायट्रेट्स आढळतात; जे रक्तदाब नियंत्रित ठेवतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. रक्तवाहिन्यांवरील दबाव कमी होतो आणि रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
५. बीटरूटमध्ये आढळणारे फायबर पचनासाठी खूप फायदेशीर आहे. बीटरूट सहज पचन सुलभ करून आणि बद्धकोष्ठता टाळून निरोगी पाचन तंत्रास प्रोत्साहन देते.
६. तज्ज्ञांच्या मते, बीटरूटचे सेवन स्टॅमिना वाढवण्यास मदत करते. नियमित बीटरूट खाल्ल्याने शरीरात ऑक्सिजन वाढतो, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीची ऍथलेटिक कामगिरी सुधारते. त्यासाठी कोणतीही शारीरिक क्रिया करण्यापूर्वी सुमारे २ तास आधी बीटचा रस घेऊ शकता.
७. बीटमध्ये बीटालेन्स असतात, जे शरीरातील जळजळ रोखण्याचे काम करते. ज्यामुळे संधिवात, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादींना प्रतिबंध करण्यास मदत करतात.
८. बीटमध्ये असलेले बीटा-सायनाइन कर्करोगापासून बचाव करण्यास मदत करते. त्यात अँटी-ऑक्सिडंट्स देखील आढळतात, जे फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात. त्यामुळे बीट खाल्ल्याने कॅन्सरपासून बचाव होतो.
९. बीट या फळामध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर अनेक पोषक घटक असतात. याच्या वापराने रोगप्रतिकारशक्ती वाढते, तसेच त्वचेसाठीही फायदेशीर ठरते.
१०. पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे. जीवनसत्त्व अ, व क, फायबर, सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस, क्लोरिन, आयोडीन, लोह व नैसर्गिक साखर या घटकांनी समृद्ध बीटरूट बऱ्याच वर्षापर्यंत फायदे देते.
========
हे देखील वाचा : जाणून घ्या आरशाशी संबंधित वास्तु नियम
========
११. पोषक घटकांनी समृद्ध बीट उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. बीट फोलेटचा उत्कृष्ट स्रोत आहे; जो रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे.
( टीप : या लेखात दिलेली माहिती फक्त वाचनापुरती देण्यात आली आहे. कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)