Home » वाढदिवस खास : कधीही निवडणूक न हारलेल्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

वाढदिवस खास : कधीही निवडणूक न हारलेल्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

by Jyotsna Kulkarni
0 comment
Pratibha Patil
Share

आपला देश कायमच नेतृत्वाच्या बाबतीत भाग्यवान ठरला. स्वातंत्र्यानंतर या देशाचा कारभार नेहमीच योग्य हातानी आणि योग्य व्यक्तींनी सांभाळला. म्हणूनच जगात आज आपल्या देशाचे नाव विकसनशील देशांमध्ये सर्वात पुढे आहे. मुख्य म्हणजे आपल्या देशाला अनेक हुशार कर्तृत्वान महिलांचे देखील नेतृत्व लाभले. महिलांनी देखील त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर देशाला पुढे नेण्याचे मोठे काम केले.

प्रत्येक महत्वाच्या पदावर महिलांनी काम करत देशाची सेवा केली. देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपती या पदावर काम करत देशाची शान वाढवली आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती हा बहुमान मिळवणाऱ्या श्रीमती प्रतिभा पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस आहे. प्रतिभा पाटील या भारताच्या १२ व्या राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या होत्या. आज प्रतिभा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टी.

श्रीमती प्रतिभा पाटील यांचा जन्म १९ डिसेंबर १९३४ रोजी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात असलेल्या नाडगांव या छोट्या खेडे गावात झाला. त्यांचे शालेय शिक्षण आर. आर. विद्यालय जळगाव येथे झाले. जळगाव शहरातीलच प्रसिद्ध अशा मु. जे. महाविद्यालयात अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे विषय घेऊन प्रतिभा पाटील यांनी त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच टेबल टेनिसमध्ये त्यांनी प्राविण्य मिळवले. प्रतिभाताई उत्कृष्ट टेबल टेनिसपटू असून त्यांनी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी स्पर्धांमध्ये अनेक बक्षीसे जिंकली आहेत. एम. जे. महाविद्यालयात शिकत असताना प्रतिभा पाटील यांनी ‘कॉलेज क्वीन’चा किताबही पटकावला होता. पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच ‘आमदार’ झालेल्या प्रतिभाताईंनी पुढे मुंबई येथील शासकीय विधी महाविद्यालयातून वकिलीची पदवी संपादन केली.

प्रतिभा पाटील यांनी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात सनदी वकील म्हणून आपल्या व्यावसायिक कारकीर्दीला सुरुवात केली. त्या सोबतच त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये विशेषतः शोषित महिलांच्या उद्धारासाठी काम करायला देखील सुरु केले.

प्रतिभा पाटील यांनी वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी विधानसभेची पहिली निवडणूक लढवली आणि ती जिंकली देखील. त्या जळगाव मतदारसंघाच्या आमदार झाल्या. त्यानंतर १९८५ पर्यंत त्या सातत्याने ४ वेळा मुक्ताईनगर मतदारसंघाच्या आमदार म्हणून निवडून आल्या. पुढे १९८५ ते १९९० पर्यंत त्या राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्या.

त्यानंतर प्रतिभा पाटील यांनी राज्यसभा उपसभापती पद देखील भूषवले. १९९१ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत त्या अमरावतीच्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. श्रीमती प्रतिभा पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्ये म्हणजे त्या त्याच्या राजकीय जीवनात कुठल्याही निवडणुकीत कधीही पराभूत झाल्या नाहीत.

श्रीमती प्रतिभा पाटील या २५ जुलै २००७ रोजी भारताच्या १२ व्या राष्ट्रपती म्हणून विराजमान झाल्यात. भारताच्या सर्वोच्च पदावर निवडून येणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. राष्ट्रपती पदावर विराजमान होण्यापूर्वी २००४ ते २००७ या कालावधीत त्या राजस्थान राज्याच्या ‘राज्यपाल’ म्हणून कार्यरत होत्या.

कायदेतज्ज्ञ असलेल्या प्रतिभाताई जळगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आल्या. एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षा झाल्या. पहिल्यांदाच मंत्री आणि त्यानंतर सतत वीस वर्षे त्यांनी निरनिराळ्या खात्याची मंत्रीपदे सांभाळली. आरोग्य, पर्यटन, संसदीय कार्य, गृहनिर्माण, समाजकल्याण सांस्कृतिक, सार्वजनिक आरोग्य समाजकल्याण, दारूबंदी पुनर्वसन, शिक्षणमंत्री अशी अनेक मंत्रीपदे त्यांनी निभावली.

विधान सभेवर फेरनिवड, विधान मंडळ नेतेपदी निवड, राज्यसभेवर निवडून गेल्या, राज्यसभेच्या उपाध्यक्षा म्हणून निवडून आल्या. महिला बँकांची स्थापना केली. आदिवासी विकास योजना,वसंतराव नाईक महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि ज्योतिबा फुले महामंडळ इ. महामंडळांची स्थापनेत योगदान होते.

अंधांसाठी संस्था काढून कार्य उभे केले. १९९१ साली त्या अमरावतीतून लोकसभा सदस्य झाल्या, राष्ट्रपती पदावर असताना संपुर्ण जगात त्यांनी भारताची नवी ओळख करून दिली. राष्ट्रपती प्रतिभा पाटील या आजवरच्या सगळ्यांत ’दयाळू’ राष्ट्रपती ठरल्या. सर्वाधिक परदेशी दौरे करणाऱ्या आणि परदेशी दौऱ्यांवर सर्वाधिक खर्च झालेल्या राष्ट्रपती म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. राष्ट्रपती म्हणून त्यांनी महिला आणि बाल विकासावर अधिक भर दिला होता.

========

हे देखील वाचा : अश्विन अन्नाची रिटायरमेंट !

========

श्रीमती प्रतिभा पाटील यांनी १९६२ मध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या डॉ. देवीसिंह रामसिंह शेखावत यांच्याशी लग्न केले. डॉ. शेखावत यांनी मुंबई येथील नामांकित हाफकिन संस्थेतून केमोथेरपी सारख्या विषयात संशोधन करून पीएच. डी. पदवी प्राप्त केली. एक

शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ता असणारे डॉ. शेखावत अमरावती महानगरपालिकेचे पहिले महापौर बनले तसेच ते अमरावती विधानसभा मतदार संघातून निवडून आले आणि आमदार देखील झाले. श्रीमती प्रतिभाताई आणि डॉ शेखावत यांना मुलगी श्रीमती ज्योती राठोर आणि मुलगा श्री राजेंद्रसिंह ही दोन अपत्ये आहेत. राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर प्रतिभाताई पाटील पुणे येथे स्थायिक झाल्या आहेत.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.