Home » … आणि अखेर सचिनला मिळाली गुरूंची शाबासकी

… आणि अखेर सचिनला मिळाली गुरूंची शाबासकी

by Team Gajawaja
0 comment
Share

“दिवसभर कसून सराव झाल्यानंतर मी प्रचंड थकलेलो असायचो आणि सर मला संपूर्ण मैदानाला पळत फेऱ्या मारायला लावायचे… तेव्हापासून मी दमणं विसरलो…” गुरूची देण्याची आणि शिष्याची घेण्याची वृत्ती असेल, तर असामान्य गुरू- शिष्याची जोडी तयार होते आणि अशा जोडीचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे रमाकांत आचरेकर आणि सचिन तेंडुलकर.

आपला ११ वर्षांचा धाकटा भाऊ सचिनला चांगलं क्रिकेट येतं यावर ठाम विश्वास असलेला मोठा भाऊ अजित प्रसिद्ध प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या क्रिकेटच्या उन्हाळी शिबिराला घेऊन गेला. नेटमध्ये क्रिकेट खेळण्याची अजिबात सवय नसलेला सचिन सुरुवातीला भांबावला. आजूबाजूला बरीच मुलं, शिवाय आचरेकर सरांची करडी नजर यामुळे तो अवघडला. 

एरवी बऱ्यापैकी बॅटिंग करणाऱ्या सचिनला काहीच जमलं नाही. ते पाहून आचरेकर सरांनी, “हा खूप लहान आहे, पुढच्या वर्षी घेऊन ये’ सांगत त्याची बोळवण केली, पण अजितला आपल्या धाकट्या भावाच्या कौशल्यावर विश्वास होता. त्यानं आचरेसर सरांना लांब जाऊन सचिनचा खेळ पाहायची विनंती केली आणि सुदैवानं त्यांनी ती ऐकली. 

आचरेकर सर नाहीत म्हटल्यावर सचिनवरचं दडपण कमी झालं आणि तो नैसर्गिकपणे खेळू लागला. तेव्हा अजित काय म्हणतोय, हे आचरेकर सरांच्या लगेचच लक्षात आलं. त्यांनी सचिनला त्यांच्या शिबिरात घेतलंच, शिवाय शाळा बदलण्याचा सल्ला देऊन त्याच्यात दडलेल्या जगप्रसिद्ध क्रिकेट खेळाडूला त्यांनी अक्षरशः आकार दिला.

क्रिकेटचे धडे आणि आयुष्याचेही

रमाकांत आचरेकर सरांनी बरेच खेळाडू घडवले. शेकडो मुलांचा खेळ त्यांनी विकसित केला. विशेष म्हणजे, हे करताना त्यांनी मुलांना नकळतपणे आयुष्याचे धडेही दिले. सचिननं स्वतः वेळोवेळी आचरेकर सरांनी दिलेल्या शिकवणीचे किस्से सांगितले आहेत. सचिन म्हणतो, “आचरेकर सर खूप कडक आणि प्रचंड शिस्तीचे होते. आमच्यातही त्यांनी तीच शिस्त बाणवली. त्यांची शिकवण्याची पद्धत काळाच्या खूप पुढची होती. ते आम्हाला सतत सराव सामने खेळायला लावायचे. आमच्यापेक्षा ते या खेळाप्रती जास्त समर्पित होते. आम्ही मैदानावर सराव करत असताना ते दुरून कुठूनतरी बारीक लक्ष ठेवून असायचे आणि प्रत्येकाच्या काय चुका झाल्या हे छोट्याशा कागदावर टिपून ठेवायचे. सामना संपला की प्रत्येकाची कानउघाडणी व्हायची. पण या चुका दाखवताना त्यांनी एक खूप मोलाची शिकवण आम्हाला दिली. 

ते कायम सांगायचे की, सुधारणेला वाव द्या. तुम्ही चुका दुरूस्त केल्या नाहीत, तर खेळाडू म्हणून तुमची प्रगती खुंटेल. त्यांनी आम्हाला नुसताच खेळ शिकवला नाही, तर खूप मोठी ताकद दिली. मी नेटमध्ये सराव करत असताना ते स्टंपवर एक रुपयाचं नाणं ठेवायचे आणि मी आउट झालो नाही, तरच ते नाणं मला मिळायचं. 

एकदा मी त्यांना घरी जेवायला बोलावलं, तर त्यांनी मला शाळेच्या सामन्यात शंभर रन्स काढल्यास तरच येईन असं सांगत आव्हान दिलं. मी पण रात्रभर कसून सराव केला आणि त्यांची अट पूर्ण केली. मी आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्त व्हायची वेळ आली, तरी ते कधीच मला ‘वेल डन’ म्हणाले नव्हते. त्यांच्या अशा पद्धतींमुळे मी मानसिकदृष्ट्या खूप कणखर झालो. पुढे मैदानात दमल्यावर किंवा एकाग्रता कमी झाल्यानंतर विकेट कशी पडू द्यायची नाही, हे मी या सगळ्यातून शिकत गेलो.

====

हे देखील वाचा – विद्यार्थी चळवळ ते ‘काय झाडी’… डायलॉगने चर्चेत आलेले शाहाजीबापू कोण?

====

शिष्योत्तम

गुरू जितका चांगला, तितकं शिष्याचं भलं होतं हे जरी खरं असलं, तरी केवळ गुरू चांगला असून उपयोग नसतो, तर शिष्यही तितकाच समर्पित असावा लागतो. आचरेकर सर जितके शिस्तीचे होते, जितक्या आत्मीयतेने शिकवत होते, तितक्याच उत्सुकतेनं सचिननंही त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतलं. त्यांच्या तळमळीला सचिननं आपल्या मेहनतीची जोड दिली. त्यामुळे जगप्रसिद्ध झाल्यानंतर किंवा अगदी क्रिकेटचा देव अशी ओळख मिळाल्यानंतरही सचिन आपल्या या पहिल्या शिक्षकाचं ऋण कधीच विसरला नाही. वेळोवेळी तो सरांना भेटत राहिला आणि त्यांनी आपल्या करियरचा पाया रचला हे सांगत राहिला. 

आचरेसकर सरांची दुर्मीळ शाबासकी त्याच्यासाठी कायम महत्त्वाची राहिली… गंमत म्हणजे, देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार- भारतरत्न सचिनला जाहीर झाला, त्यादिवशी सरांनी त्याला ‘वेल डन’ म्हणत जणू आणखी एक पुरस्कार दिला. 

आचरेसकर सरांची दुर्मीळ शाबासकी त्याच्यासाठी कायम महत्त्वाची राहिली. आचरेकर सरांविषयी आपल्या भावना व्यक्त करताना एकदा सचिन म्हणाला होता, “त्यांनी मला फक्त मैदानावरच स्ट्रेट ड्राइव्ह कसा मारायचा हे शिकवलं नाही, तर प्रत्यक्ष आयुष्यातही कसं सरळपणे वागायचं याचे धडे दिले. ते खूप ग्रेट होते.” गुरू- शिष्याची ही जोडी आत्ताच्या आणि पुढच्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील हे नक्की.

कीर्ती परचुरे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.