Home » Guillain Barre Syndrome : पुण्यात रहस्यमयी आजाराची दहशत !

Guillain Barre Syndrome : पुण्यात रहस्यमयी आजाराची दहशत !

by Team Gajawaja
0 comment
Guillain Barre Syndrome
Share

पुण्यामध्ये सध्या दुर्मिळ समजल्या जाणा-या गिलेन-बॅरे सिंड्रोम म्हणजेच जीबीएस या आजाराचे संशयीत रुग्ण सापडल्यानं खळबळ उडाली आहे. गिलेन-बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ आणि न्यूरोलॉजिकल आजार आहे. या आजाराबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे त्याच्याबद्दल जागरुकताही कमी आहे. त्यामुळेच या आजाराची लागण झाल्यावर रुग्णाला लगेच त्याची जाणीव होत नाही. या आजाराबाबत नागरिकांनी जागरुक व्हावे यासाठी संबंधित आरोग्य यंत्रणेनं आवाहन केले आहे. पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम नावाच्या आजाराचे 26 रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे. गुइलेन-बॅरे सिंड्रोम म्हणजे काय आणि त्याची लक्षणे काय आहेत, हे सुरुवातीला बघूया. दुर्मिळ आजारामध्ये ज्याची गणना होते तो सिंड्रोम हा आजार स्नायूंच्या हालचाली नियंत्रित करतो. नसांवर याचा परिणाम होतो. यामुळे स्नायू कमकुवत होऊ शकतात. (Guillain Barre Syndrome)

हात किंवा पायाच्या संवेदना कमी होऊ शकतात. काहीवेळा रुग्णाला अन्न गिळतांना किंवा श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो. पुण्यामध्ये एकापाठोपाठ एक असे 26 गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे रुग्ण मिळाल्यानं शहरातील तीन प्रमुख रुग्णालयांनी आरोग्य अधिकाऱ्यांना सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे रुग्ण प्रामुख्याने सिंहगड रोड, धायरी आणि आसपासच्या भागात मिळाले आहेत. या रुग्णांची संख्या पाहिल्यावर महाराष्ट्र आरोग्य विभागानेही एका चौकशी पथकाची स्थापना केली आहे. याशिवाय पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णांचे नमुने चाचणीसाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठवले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गुइलेन-बॅरे सिंड्रोम आजार झाल्यास रुग्णाला अशक्तपणा, सुन्नपणा जाणवू लागतो. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास रुग्ण गंभीर होण्याचीही शक्यता असते. अशावेळी अर्धांगवायू येण्याचीही शक्यता असते. मात्र गुइलेन-बॅरे सिंड्रोम नेमका कशामुळे होत आहे, याचा शोध अद्याप चालू आहे. (Social Updates)

या रोगाचा संसर्ग झालेले रुग्ण साधारण एक आठवड्याच्या काळात बरे होतात. मात्र हा कालावधी एक महिन्यापर्यंतही वाढू शकतो, असे तज्ञांचे मत आहे. गुइलेन-बॅरे सिंड्रोम झाल्यापैकी 80 टक्के रुग्ण पूर्णपणे बरे होतात. मात्र 15 ट्क्के रुग्ण बरे होण्यास जास्त कालावधी लागतो, तसेच त्यांच्यात कमकुवतपणा रहाण्याची शक्यता असते. तसेच गुइलेन-बॅरे सिंड्रोम झाल्यापैकी किमान 5 टक्के रुग्ण गंभीर होण्याचाही धोका वर्तवण्यात आला आहे. त्यासाठी या रोगाची लागण झाली आहे, हे त्वरित ध्यानात येणे गरजेचे आहे. वेळेवर उपचार झाल्यास या रोगावर उपचार शक्य असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा एक ऑटोइम्यून रोग आहे ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती मज्जासंस्थेवर हल्ला करते. हा आजार सामान्यतः न्यूमोनिया सारख्या संसर्गानंतर विकसित होतो. पुण्यामध्ये जे 26 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी बहुतांश संशयित रुग्ण हे 12 ते 30 वयोगटातील आहेत. हा रोग दुर्मिळ असला तरी योग्य उपचारानं तो पूर्णपणे बरा होऊ शकतो, असे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले आहे. गुइलेन-बॅरे सिंड्रोमची लक्षणे काय आहेत, हे जाणणे गरजेचे आहे. या रोगाची लक्षणे रुग्णामध्ये 2 ते 4 आठवड्यात विकसीत होतात. (Guillain Barre Syndrome)

================

हे देखील वाचा :  Bird Flu : आकाशात उडणारे पक्षी थेट जमिनीवर !

Crime Story : आयुर्वेदिक काढा आणि खून !

================

त्यावेळीच तज्ञ डॉक्टरांबरोबर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. यातील प्रमुख लक्षण म्हणजे, हात आणि पायाला सुन्नपणा येतो, तसेच अशक्तपणा जाणवू लागतो. यानंतर रुग्णाला चालण्यास अडचण येऊ लागते. तसेच त्याचे शरीरावरचे संतुलन जाते आणि आणि समन्वयाच्या समस्या निर्माण होतात. याशिवाय डोळ्यामधून धुरकट दिसते. डोळे लाल होतात, काही रुग्णांमध्ये श्वास घेण्यास अडचण येत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. यापैकी कुठलेही लक्षण आढळत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. गुइलेन-बॅरे सिंड्रोम आजार झाला आहे की नाही, हे नक्की करण्यासाठी न्यूरोफिजियोलॉजिकल चाचणी आणि स्पाइनल टॅप करण्यात येते. यावर उपचार करतांना प्लाझ्मा एक्सचेंज किंवा इंट्राव्हेनस इम्युनोग्लोबुलिन करण्यात येते. याशिवाय फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी देखील उपयोगी पडत आहे. यामुळे गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे कुठलेही लक्षण दिसत असेल तर घाबरुन न जाता, डॉक्टरांबरोबर संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे. (Social Updates)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.