Home » जेष्ठा गौरी सण साजरा करण्याच्या पद्धती

जेष्ठा गौरी सण साजरा करण्याच्या पद्धती

by Jyotsna Kulkarni
0 comment
Gauri Aagman 2024
Share

सोन्याच्या पावलांनी गवर आली माहेराला….म्हणत आज सर्वत्र गौरींचे मोठ्या धुमधडाक्यात आगमन होत आहे. सोन्याच्या पावलांनी या…शेराचे सव्वाशेर करा…म्हणत घरातील सवाष्णी या गौरींचे मोठ्या उत्साहाने स्वागत करत आहे. गौरीचे आगमन ज्येष्ठा नक्षत्रावर होते म्हणून तिला ‘ज्येष्ठा गौरी’ म्हणतात असे सांगितले जाते. महाराष्ट्रात या सणाचे मोठे स्वरूप पाहायला मिळते. स्त्रिया सर्व साज शृंगार करून गौरी घरी आणतात. मात्र तुम्हाला माहित आहे का…? सण जरी एकच असला तरी त्याचे स्वरूप, पद्धती, रीती, परंपरा मात्र खूपच वेगळ्या आणि आकर्षक असतात. आज लेखातून आपण गौरी बसवण्याच्या या विविध पद्धती आणि रीती जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

आपल्याकडे गौरी आवाहन करण्याच्या विविध पद्धती प्रचलीत आहेत. मराठवाडा, विदर्भ, कोकण, खान्देश आदी विविध भागात या गौरींचा सण साजरा करण्याच्या अनेक पद्धती आहे. कुठे गौरींचे मुखवटे, धडासह बसवले जातात तर कुठे खड्याच्या गौरी असतात, तर कुठे केवळ मुखवटे असतात.

कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये सप्त देवतांचे, ७ खड्यांच्या रूपात पूजन करण्याचे व्रत पाळले जाते. कोकणात अनेक सुप्रसिद्ध मंदिरातील देवता या सप्त शिळांच्या रूपात आढळतात. त्यामुळे सप्त शिळांचे महत्व केवळ ब्राह्मणच नाही तर अन्य अनेक समाजांमध्ये आहे. त्यांच्या त्या कुलदेवताही आहेत. पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवून त्यांची पूजा करतात.

Gauri Aagman 2024

काही घरांमध्ये धान्याची रास म्हणजेच गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्रे, लोखंडी सळ्या किंवा सिमेंटचे स्टँण्ड मिळतात त्यावर गौरीचे मुखवटे ठेवतात आणि त्याला साडी नेसवून विधीवत पूजा करतात. काही घरांमध्ये तुम्ही पाहिलं असेल सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात. किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात.

काही घरांमध्ये पत्र्याच्या कोठ्या ठेऊन त्यावर धड ठेवले जाते त्यानंतर त्याला साडी नेसवतात आणि वर मुखवटे ठेवतात. हे मुखवटे शाडू मातीचे, पितळेचे देखील असतात. काही ठिकाणी तर छोट्या मडक्यांवर रंगाने देवीचा चेहरा रंगवला जातो आणि त्याची देखील पूजा केली जाते. काही घरांमध्ये गौरींचे धड देखील मातीचे असते. त्यावरच साडी नेसवली जाते.

काही ठिकाणी तेरडा या वनस्पतीचे रोप गौरी समजली जाते आणि तिची पूजा केली जाते. तेरड्याची रोपे मुळासकट उपटून आणली जातात. यात मुळे म्हणजेच गौरीची पावले, अशी मान्यता असते. तेरडा वनस्पती म्हणजे गौरी मानली जाते त्याचप्रमाणे शंकराचे प्रतीक म्हणून शंकरोबा नावाच्या वनस्पतीची पूजा करतात. यातही गौरी घरी आणायच्या वेळा देखील बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पाहायला मिळतात. काही ठिकाणी दिवसभरात कधीही गौरी आणली जाते, तर काही ठिकाणी संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गौरीला आणायची पद्धत आहे.

गौरी आणण्याच्या वेळी त्यांचे मुखवटे तुळशीपासून सुरुवात करत संपूर्ण घरात फिरवले जातात. घरात रांगोळीने देवीची पाऊले काढली जातात. त्यानंतर घराबाहेर तुळशीचे रोप, कुंडी ठेवली जाते तिथून गौरी आणायची सुरुवात होते. तिला घरात घेताना सवाष्णी हळदी कुंकू देतात तिचे औक्षण करतात. नंतर घराच्या उंबरठ्यावर धान्याने भरलले माप ओलांडून ही गौर घरात “गौर आली गौर” “कशाच्या पाऊलांनी आली?” “गाईवासरांच्या पावलाने आली’ असे म्हणत फिरवली जाते. नंतर तिच्या जागी तिला नेत तिची स्थापना करतात.

संध्यकाळी तिची विधिवत आरती केली जाते, नैवेद्य दाखवला जातो. गौरी पूजनाच्या दिवशी गौरींची विधिवत पूजा होऊन त्यांची प्राणप्रतिष्ठा केली जाते. त्यानंतर कुलाचार होतो, रितीनुसार नैवेद्य होतो. संध्याकाळी सवाष्णींना हळदी कुंकूंसाठी बोलवतात. तिसऱ्या दिवशी ही गौर आपल्या घरी पुन्हा जायला निघते. तिचे विसर्जन केले जाते.

ज्येष्ठा गौरी आरती

भाद्रपद शुद्ध सप्तमीस प्रतिष्ठा
अनुराधा नक्षत्र ज्येष्ठा श्रेष्ठा
गणेशा सहित गौरी धनिष्ठा

बैसली येउनि सकळिया निष्ठा ||१||

जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।

ज्येष्ठा नक्षत्र पुजेचा महिमा
षडरस पक्वान्ने होती सुखधामा
सुवासिनी ब्राह्मण अर्पुनी निजनेमा

तुझे आशीर्वादे सकलही धामा ।।२।।

जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।

उत्थापन मूळावर होता अगजाई
वर देती झाली देवी विप्राचे गृही
रुद्र विश्वनाथ भक्ताचे ठायी
वर देती झाली देवी सकळांचे गृही ।।३।।

जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.