भारतभर गणेशाची मंदिरे आहेत. प्रत्येक हिंदू घरामध्ये गणेशाचे पूजन केले जाते. गणेशाला आद्यदेवही म्हटले जाते. कुठलीही पुजा करतांना, गृहशांती असो वा ग्रहशांती कुठेही प्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते. बुद्धीची देवता म्हणूनही गणेशाला वंदन केले जाते. मात्र फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरही गणेशाची आराधना केली जाते. इंडोनेशिया या देशात गणपती बाप्पाला संकटापासून वाचवणारा देव म्हणून पुजले जाते. इंडोनेशियातील (Indonesia) माऊंट ब्रोमो या सक्रिय ज्वालामुखीच्या काठावर गणपती बाप्पाची जवळपास 700 वर्षाहून अधिक जुनी मुर्ती आहे. या बाप्पाची तेथील निवासी पुजा करतात. ज्वालामुखीच्या काठावर असणारा हा गणपती बाप्पा ज्वालामुखीच्या विनाशापासून सर्वांना वाचवतो, अशी धारणा स्थानिकांमध्ये आहे.
इंडोनेशियामधील (Indonesia) ब्रोमो येथे सक्रिय ज्वालामुखी आहे. याच ज्वालामुखीच्या अगदी तोंडाजवळ 700 वर्षांपासून गणपती बाप्पा विराजमान आहेत. इंडोनेशियामध्ये सर्वाधिक ज्वालामुखी आहेत. त्यातील 141 ज्वालामुखीपैकी 130 अजूनही सक्रिय आहेत, त्यापैकीच एक म्हणजे माउंट ब्रोमो ज्वालामुखी. हा ज्वालामुखी जावा प्रांतातील ब्रोमो टेंजर सेमेरू नॅशनल पार्कमध्ये आहे. या ज्वालामुखीच्या तोंडावर असलेली गणेशाची मुर्ती 700 वर्ष जुनी आहे. या गणेशाची भक्तीभावानं पुजा करण्यात येते. स्थानिकांना ज्वालामुखीच्या संकटापासून वाचवणारा देव म्हणून गणेशाला पुजले जाते.
इंडोनेशियामध्ये (Indonesia) गणेशाच्या अशाच अनेक मुर्ती बघायला मिळतात. तेथील नोटांवरही गणपती बाप्पाची प्रतिमा आहे. मात्र या सर्वात माउंट ब्रोमो येथील गणपती बाप्पा समस्त इंडोनेशियावासियांसाठी वंदनीय आहे. मुळात ब्रोमो या शब्दाची फोड केली तर त्यातून ब्रह्म हा शब्द येतो, असे मानले जाते. ब्रह्मदेवाचे स्थान म्हणूनही काही जाणकार ब्रोमोचा उल्लेख करतात. ब्रह्माला स्थानिक इंडोनेशियन (Indonesia) भाषेत ब्रोमो म्हणतात. इंडोनेशियामध्ये 141 ज्वालामुखी आहेत. हजारो वर्षांपासून हे ज्वालामुखी धगधगत आहेत. ब्रोमो पर्वत पूर्व जावामध्ये आहे. हा सर्व भाग इंडोनेशियातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या डोंगराच्या आजूबाजूच्या सुमारे 50 गावं आहेत आणि त्यात लाखो हिंदू कुटुंबांचे वास्तव्य आहे. या हिंदू कुटुंबाची या ब्रोमो डोंगरावर खूप श्रद्धा आहे. त्यातच त्यातील गणेशाची मुर्ती या सर्वांसाठी पूजनीय आहे. येथील बहुतांश हिंदू कुटुंबे डोंगराच्या सर्वात जवळ असलेल्या चेमोरो लवांग गावात राहतात. यालाच टेंगर मासिफ असे नावही आहे. या भागात राहणारे हिंदू स्वतःला माजापहित शासकाचे वंशज मानतात.
त्यांच्यामध्ये ब्रह्मदेवाची पूजा केली जाते. मुळात ब्रह्मदेवाचे एकमात्र मंदिर भारतातील राजस्थानच्या पुष्करमध्ये आहे. पण याच ब्रह्मदेवाचे भारताबाहेर मंदिर असून ते इंडोनेशियातील या ब्रोमो डोंगरावर आहे. तिथेच श्री गणेशाची मुर्ती आहे. ही मूर्ती या सक्रिय ज्वालामुखीपासून त्यांचे रक्षण करते, अशी लोकांची अढळ श्रद्धा आहे. हा संपूर्ण परिसर अतिशय रमणीय आहे. येथे दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. या डोंगराळ भागात रहाणारे हिंदू त्यांचे सर्व सण मोठ्या उत्सवात साजरे करतात. त्यातील प्रमुख म्हणजे, कसाड यज्ञ हा आहे. या उत्सवाच्या चौदाव्या दिवशी या भागातील सर्वच हिंदू मोठ्या संख्येनं ब्रह्मदेवाची आणि श्री गणेशाची पूजा करण्यासाठी या डोंगरावर जातात. हे सर्व भाविक जातांना सोबत आपले रक्षण करणा-या देवांसाठी फळ आणि फुले घेऊन जातात. ही सर्व फळे-फुले त्या ज्वलंत ज्वालामुखीमध्ये टाकण्यात येतात. (Indonesia)
========
हे देखील वाचा :अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला करणार नौसेनेचे नेतृत्व
========
यामुळे ज्वालामुखी शांत होतो, आणि त्याचा काही त्रास होत नाही अशी, स्थानिकांची धारणा आहे. पंधरा दिवस या भागात हा कसाडा महोत्सव चालतो. प्रत्येक दिवशी भाविक या डोंगरावर चढतात आणि ज्वालामखीला विविध नैवेद्य देतात. तसेच बक-यांचाही बळी दिला जातो. ही पूजा गेली अनेक वर्ष चालू आहे. ब-याचवेळा या उत्सवाच्या वेळी ज्वालामुखी धगधगत असतो. त्यातून राख बाहेर पडत असते. पण असे असले तरी स्थानिक कसेही करून ब्रोमो डोंगर चढून जातात. गणपती बाप्पाची पूजा करतात आणि ज्वालामुखीमध्ये आपल्या ऐपतीनुसार नैवेद्य अर्पण करतात. यामुळेच या भागात गेली कित्येक वर्ष हिंदूंच्या अनेक पिढ्या सुखानं राहत असल्याचे स्थानिक सांगतात.
सई बने