Home » जेव्हा परराष्ट्र मंत्रालायचे अधिकारी, कर्मचारी आणि मुत्सद्दी संपावर जातात… 

जेव्हा परराष्ट्र मंत्रालायचे अधिकारी, कर्मचारी आणि मुत्सद्दी संपावर जातात… 

by Team Gajawaja
0 comment
Strike of French diplomats
Share

आपण अमुक कामगार संपावर गेले, तमुक कर्मचारी संपावर गेले त्यांनी निदर्शनं केली, डॉक्टर संपावर गेले अशा बातम्या वाचत असतो, टीव्हीवर पहातसुद्धा असतो. पण आपल्याला विश्वास बसणार नाही अशा गोष्टी जगभरात घडत आहेत. जर तुम्हाला कोणी सांगितलं की एका देशातले परराष्ट्र मंत्रालायचे अधिकारी, कर्मचारी, वेगवेगळ्या देशातले राजदूत, मुत्सद्दी हे संपावर गेले, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? 

हो हे खरं आहे! आणि असं घडलंय! फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी, तसंच फ्रान्सचे विविध देशातले राजदूत, मुत्सद्दी संपावर गेले होते. २ जून २०२२ म्हणजे गुरुवारी फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी फ्रान्सच्या सद्य सरकारविरुद्ध निदर्शने केली. यावेळी २०० मुत्सद्दी फ्रेंच परराष्ट्र मंत्रालयाबाहेर उपस्थित होते. तसंच फ्रान्सच्या विविध देशातल्या मिशन्सवर असलेल्या राजदूतांनीही ऑनलाइन उपस्थिती दाखवली, त्यानीसुद्धा ‘काम बंद आंदोलन’ केलं. (Strike of French diplomats)

फ्रान्समध्ये गेल्या २० वर्षात हे पहिल्यांदा घडलं आहे की, अशाप्रकारे परराष्ट्र मंत्रालयातले अधिकारी संपावर गेले आहेत. फ्रांसचे अझरबाईजान मधले राजदूत असलेले झाकरी ग्रॉस यांनी ट्विट केलं की, फ्रांसचे मुत्सद्दी संपूर्ण तन मन लावून काम करत आहेत. पण त्यांना कमी पगार मिळतो, तसंच त्यांना गरजेपेक्षा ज्यास्त काम करावं लागतं आणि त्यांना मदतीला असणारा कर्मचारी वर्ग हा अगदीच तुटपुंजा आहे. फ्रान्सचे अध्यक्ष एमन्युएल माकरों यांनी तर, फ्रान्सच्या प्रशासनाच्या विरुद्ध जाऊन फ्रान्सचे मुत्सद्दी काम करतात आणि स्वतःच्या कामाकडे दुर्लक्ष करतात, असे आरोप मागे केले होते. 

फ्रेंच सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयातला कर्मचारी वर्ग कमी करणार असल्याच्या आणि परराष्ट्र मंत्रालयात सुधारणा घडवून आणण्याच्या विरोधात हा संप फ्रेंच मुत्सद्दयानी केला. अमेरिका आणि चीन यांच्यानंतर फ्रान्सचा परराष्ट्र मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा वर्ग हा जगातील तिसरा सगळ्यात मोठा वर्ग आहे. फ्रान्सकडे एकूण १८०० मुत्सद्दी वेगवेगळ्या मिशन्सवर आहेत, तर फ्रेंच परराष्ट्र मंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाची संख्या १३,५०० इतकी आहे. (Strike of French diplomats)

फ्रेंच मुत्सद्द्यांना ही काळजी आहे की, फ्रेंच सरकारच्या निर्णयामुळे फ्रेंच सरकारचंच नुकसान होतंय आणि यामुळे फ्रान्सचा जो दबदबा युरोपमध्ये आणि जगामध्ये आहे त्याला तडा जाऊ शकतो. फ्रेंच सरकारने फ्रान्सच्या प्रशासनात परराष्ट्र मंत्रालयाच्या कर्मचारी वर्गाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे, जो जानेवारी पासून लागू होईल. यात मंत्रालयातील कर्मचारी वर्गाला साधारण प्रशासकीय सेवेमध्ये विलीन केलं जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कमी जागांसाठी ज्यास्त लोक अशापद्धतीचा अवलंब केल्यामुळे प्रचंड प्रमाणात स्पर्धा वाढीस लागेल आणि याचा मुत्सद्यांवर परिणाम होईल, अशी भीती सद्यस्थितीला अंतर्भूत असलेल्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

=====

हे देखील वाचा – दुबईतील ‘या’ आहेत सर्वाधिक श्रीमंत गृहिणी, लाइफस्टाइल पाहून व्हाल थक्क

=====

दुसरी एक चिंता सद्यस्थितीतील फ्रेंच मुत्सद्दयाना सतावते आहे ती म्हणजे मंत्रालायसाठी आणि एकूण परराष्ट्र सेवेसाठी असणाऱ्या बजेटमध्ये केली गेलेली कपात. बजेटमध्ये केलेल्या कपातीमुळे परराष्ट्र मंत्रालयाच्या कर्मचारी वर्गात २००७ पासून २०% इतकी कपात झाली आहे. (Strike of French diplomats)

फ्रान्सची ‘एलिट डिप्लोमॅटीक कॉर्प्स’ जी सोळाव्या शतकापासून अस्तित्वात आहे, ती आत्तापर्यंत साधारण प्रशासकीय सेवेपासून वेगळी ठेवण्यात आली होती. पण आता प्रशासकीय सेवा आणि परराष्ट्र सेवा यांचं एकत्रीकरण करून सरसकट सगळे नियम आता फ्रेंच परराष्ट्र सेवेला लागू होणार आहेत. यातला अजून एक भाग म्हणजे, प्रशासकीय सेवा आणि परराष्ट्र सेवा यांचं एकत्रीकरण केल्यामुळे प्रशासकीय सेवेत असणारे अधिकारी स्वतःच खातं बदलून परराष्ट्र सेवेत जाऊ शकणार आहेत. या खातेबदलामुळे जागा कमी आणि उमेदवार जास्त, स्पर्धा ज्यास्त अशी परिस्थिती उद्भवणार आहे. आणि या गोष्टीला सध्याच्या फ्रेंच मुत्सद्द्यांचा विरोध आहे. (Strike of French diplomats)

थोडक्यात या मुत्सद्द्यांच्या म्हणण्यानुसार, आत्तापर्यंत परराष्ट्र सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी इतक्या वर्षांच्या अनुभवातून आणि खडतर अशा घेतलेल्या विशिष्ट प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध केलं. पण याची पुनरावृत्ती होईल याची शाश्वती नाही कारण प्रशासकीय सेवेतले कर्मचारी यांनी खातं बदलून परराष्ट्र सेवेत काम केलं, तर इतकी वर्ष खडतर मेहनत घेऊन परराष्ट्र सेवेतल्या अधिकाऱ्यांनी जे मिळवलं आहे ते गमवायची वेळ येईल. अशा परिस्थितीत परराष्ट्र सेवेतल्या अधिकाऱ्यांच्या अनुभवसिद्ध अशा कृतीला, त्यांच्या कामाला काहीही किंमत राहणार नाही. 

हा केलेला संप एक दिवसाचा होता. या संपावर फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्री कॅथरिन कॉलॉन यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. भारतात राहणाऱ्या आपल्यासारख्या लोकांना हे चमत्कारिक वाटेल, याचं कारण आपण फक्त कल्पना करून बघा की भारतीय परराष्ट्र सेवेतले अधिकारी, राजदूत, मुत्सद्दी हे काही काळासाठी संपावर गेले आणि त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले, तर काय परिस्थिती उद्भवेल?असं होऊ नये, पण फक्त कल्पना जरी केली तरी पण आपल्याला चमत्कारिक आणि रंजक वाटेल. (Strike of French diplomats)

याप्रसंगी फ्रान्स सरकार आणि फ्रेंच परराष्ट्र मंत्रालयातल्या कर्मचारी वर्ग, राजदूत आणि मुत्सद्दी यांच्यामध्ये चर्चा होऊन काहीतरी मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे. बाकी येणारा काळ ठरवेलच! 

– निखिल कासखेडीकर


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.