भारताचे राजकारण (Indian Politics) हे नेहमीच संपूर्ण जगात गाजते आणि चर्चेत असते. आजवरच्या अनेक दशकांच्या भारतीय राजकारणाच्या इतिहासात अनेक उत्तम, हुशार, चाणाक्ष नेते होऊन गेले. अशा महान नेत्यांमुळे भारतीय राजकारणाला एक वेगळीच ओळख आणि उंची मिळाली. अशाच एका महान नेत्यांमधील एक नेता म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. (Atal Bihari Vajpayee )
भारताचे पंतप्रधानपद (Prime Minister) भूषवणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक असे निर्णय घेतले ज्यांमुळे आजही संपूर्ण भारत आणि भारताचे नागरिक त्यांचे ऋणी आहेत आणि कायमच राहतील. अतिशय महान, हुशार आणि कर्तृत्वान अशा अटल बिहारी वाजपेयी यांची आज १०० वी जयंती (100th Birth Anniversary) आहे. (Political News)
अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताच्या विकासामध्ये आपले अमूल्य आणि कधीही विसरता न येणारे असे मोठे योगदान दिले. त्यांचे कर्तृत्व, निर्णयक्षमता आदी अनेक गोष्टींची भुरळ सगळ्यांनाच पडायची. एक उत्तम नेता असण्यासोबतच ते अतिशय चांगले कवी देखील होते. आयुष्यभर अविवाहित राहून त्यांनी देशाची सेवा केली. आज अटलजींच्या १०० व्या जयंतीचे औचित्य साधून आपण जाणून घेऊयात त्यांच्या काही महत्वाच्या गोष्टींद्दल. (Political News)
अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्यप्रदेश राज्यातील ग्वालियर येथे झाला. कवी, लेखक, पत्रकार, राजकीय नेते, उत्कृष्ट वक्ता असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून वाजपेयीजींना ओळखले जाते. एक छोटा राजकीय कार्यकर्ता ते पंतप्रधानपदापर्यंतचा त्यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी होता.
अटलबिहारी वाजपेयी यांनी आपले प्रारंभिक शिक्षण ग्वाल्हेरमधून केले आणि नंतर ते पुढील शिक्षणासाठी कानपूरला गेले. अटलबिहारी वाजपेयी यांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता. १९४२ मध्ये महात्मा गांधींच्या भारत छोडो (Bharat Chodo) आंदोलनात ते खूप सक्रिय होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला.
दरम्यान, त्यांनी कानपूरच्या डीएव्ही कॉलेजमधून एलएलबी केले. यावेळी अटलबिहारी वाजपेयी आणि त्यांच्या वडिलांनी एलएलबीचे शिक्षण एकत्र घेतले आणि या काळात पिता-पुत्र दोघेही एकाच वसतिगृहाच्या खोलीत राहत होते. त्यानंतर पुढे ते राजकारणात आले.
अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात पत्रकार म्हणून केली. त्यांनी राष्ट्रधर्म, पांचजन्य आणि वीर अर्जुन यासाठी काम केले. जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेल्या परमिट पद्धतीला विरोध करण्यासाठी मुखर्जी श्रीनगरला गेले तेव्हा त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले. यावेळी ते या घटनेचे वृत्ताकंन करण्यासाठी पत्रकार म्हणून तिथे उपस्थित होते.
वाजपेयीजींनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, मुखर्जी यांना अटक झाली होती, पण मी परत आलो. या घटनेनंतर काही दिवसांनी डॉ. मुखर्जी यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यानंतरच त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आणि देशाचे एक आदर्श पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या गेले.
१९४२मध्ये ‘भारत छोडो’ चळवळीत वाजपेयींनी उडी घेतली. तेव्हा त्यांना अटक झाली होती. नंतर ते श्यामाप्रसाद मुखर्जी (Shyamprasad Mukherjee) व पर्यायाने भारतीय जनसंघाच्या संपर्कात आले. पुढे भारतीय जनसंघाचे नेते म्हणूनच त्यांची ओळख निर्माण झाली.
१९५७ मध्ये वाजपेयी बलरामपूर मतदारसंघातून संसदेवर सर्वप्रथम निवडून आले. वाजपेयी यांच्याकडे वक्तृत्वाची अकल्पनीय शक्ती होती. तिच्याच बळावर त्यांनी विरोधी पक्षात असूनही आपली छाप सोडली. जवाहरलाल नेहरू यांनी देखील वाजपेयी एकदिवस नक्कीच भारताचे पंतप्रधान होतील, अशी भविष्यवाणी वर्तवली होती.
वाजपेयी यांनी व्हिक्टोरिया कॉलेजमधून राज्यशास्त्रात मास्टर्स पदवी संपादन केली होती. ते आयुष्यभर अविवाहित राहिले. जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष, जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते, जनता पक्षाचे संस्थापक सदस्य, भाजपचे अध्यक्ष आणि भाजप संसदीय पक्षाचे नेते, ११व्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते तसेच, २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९ दरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री ही पदे त्यांनी भूषविली.
अटल बिहारी वाजपेयी यांनी तीन वेळा भारताचे पंतप्रधान पद भुषवलंय. होते. प्रथम १६ मे ते १ जून १९९६ म्हणजे केवळ १३ दिवस १९९८ मध्ये त्यानंतर १९ मार्च १९९९ ते २२ मे २००४ पर्यंत भारताचे पंतप्रधान होते.
इंदिरा गांधी यांची अंगरक्षकाकडून हत्या झाल्यानंतर दिल्लीमध्ये ज्या शीख विरोधी दंगली उसळल्या त्याचाही भाजपने विरोध केला. यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला केवळ २ जागा मिळाल्या. तरीही भाजपा देशाच्या राजकारणात मुख्य प्रवाहात राहिला आणि वाजपेयी हेच पक्षाच्या केंद्रस्थानी राहिले.
भाजपवरील हिंदुत्वाचा प्रभाव वाढत होता. त्यातूनच विश्व हिंदू परिषद (Vishwa Hindu Parishad) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriy Swayamsevk Sangh) विचारधारेला भाजपने राजकीय स्तरावर आवाज दिला. यात अयोध्येत राममंदिर बांधण्याचा मुद्दा अग्रभागी होता.
६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेमुळे देशात जातीय हिंसाचार उसळला. तरीही देशाच्या राजकारणातला भाजपचा प्रभाव कायम राहिला. १९९५च्या मार्चमध्ये गुजरात आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांत भाजपाला चांगले यश मिळाले. त्याचवेळी भाजपच्या मुंबई येथील नोव्हेंबर १९९५च्या अधिवेशनात आडवाणी यांनी वाजपेयी यांचे नाव १९९६च्या लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधानपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले.
१९९६च्या लोकसभा निवडणुकीत भाजप १६२ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. अनेक प्रादेशिक पक्ष तसेच छोट्या पक्षांच्या यशामुळे १९९६ची लोकसभा त्रिशंकू राहिली. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण मिळाले. वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पण लोकसभेत बहुमताचा आकडा भाजपला गाठता आला नाही.
त्यामुळेच बहुमताच्या अग्निपरीक्षेला सामोरे न जाताच वाजपेयींनी तेराव्या दिवशी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तो दिवस होता १ जून १९९६. त्यानंतर १९ मार्च १९९८ ते २२ मे २००४ पर्यंत वाजपेयी पंतप्रधान होते. वाजपेयींनी यशस्वीपणे आघाडीचं सरकार चालवले.
१९९८ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. भाजपाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना झाली. जे सरकार १३ महिने हे चालले. जयललिता यांच्या पक्षाने पाठिंबा काढल्यामुळे १७ एप्रिल १९९९ रोजी अवघ्या एका मताने वाजपेयी सरकार कोसळले. त्यानंतर पुन्हा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले.
वाजपेयी यांनी छोट्या पक्षांना एकत्र घेऊन पाच वर्षे सरकार चालविले. यावेळी एनडीएचा प्रयोग यशस्वी झाला आणि वाजपेयींनी १९९९ ते २००४ असा पाचवर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान ठरले.
अटल बिहारी वाजपेयी तब्बल दहावेळा लोकसभेवर आणि दोन वेळा राज्यसभेवर निवडून गेले. २००९ पर्यंत ते उत्तर प्रदेश लखनऊमधून निवडून लोकसभेवर गेले. मोरारजी देसाई (Morarji Desai) यांच्या जनता सरकारमध्ये अटल बिहारी वाजपेयी परराष्ट्र मंत्री होते. जनता पक्षाचे आघाडी सरकार कोसळल्यानंतर वाजपेयींनी १९८० साली भारतीय जनता पार्टीची स्थापना केली.
अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भारताने पोखरण इथं अणुचाचणी घडवून आणली. पंतप्रधान झाल्यावर केवळ एक महिन्याच्या आत वाजपेयींनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यावेळी सारा देश वाजपेयींच्या मागे उभा राहिला. अमेरिका, कॅनडा, जपान, इंग्लंड, युरोपीय महासंघानं भारतावर निर्बंधही लादले पण आर्थिक आघाडीवर पावलं उचलत वाजपेयींनी देशाला त्याची झळ लागू दिली नाही.
भारत एक महाशक्ती म्हणून जगात उभा राहण्यासाठी वाजपेयींनी प्रयत्न केले. सगळ्यांशी मैत्री राखत जागतिक शांततेसाठी योगदान देणे हाच वाजपेयींच्या नेतृत्वचा अग्रक्रम होता. पाकिस्तानसोबतही वाजपेयींना मैत्रीचे संबंध हवे होते. त्यामुळेच फेब्रुवारी १९९९ ला लाहोर दिल्ली बस सेवा सुरु केली.
२५ डिसेंबर २०१४ रोजी वाजपेयींच्या जन्मदिनी भारताच्या राष्ट्रपतींनी वाजपेयींना भारत रत्न (Bharatratna) पुरस्काराची घोषणा केली. भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. २७ मार्च २०१५ रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी वाजपेयींच्या निवासस्थानी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.
अटल बिहारी वाजपेयी यांची गाजलेली वक्तव्ये
– अटलबिहारी वाजपेयी यांना एकदा लग्नासंदर्भात प्रश्न विचारला गेला. त्यांनी या प्रश्नावर जे उत्तर दिले ते खूपच रंजक आणि लोकप्रिय होते. लग्नासंबंधीच्या एका प्रश्नावर अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते, “मी अविवाहित आहे… पण बॅचलर नाही.”
=======
हे देखील वाचा : ड्रोन की युएफओ अमेरिकेत खळबळ !
=======
– एकदा एका कार्यक्रमात एका महिला पत्रकाराने अटलजींना विचारले, ‘वाजपेयी जी, तुम्ही अजूनही अविवाहित का आहात?’ यावर त्यांनी ‘मी आदर्श पत्नीच्या शोधात आहे’ असे उत्तर दिले. त्यानंतर महिला पत्रकाराने विचारले, ‘ती सापडली नाही का?’ वाजपेयींनी उत्तर दिले, ‘सापडली, पण तीही एक आदर्श नवरा शोधत होती.’
– वाजपेयी १९७८ मध्ये परराष्ट्र मंत्री होते. दरम्यान, एकदा पत्रकार उदयन शर्मा यांनी विचारले, ‘वाजपेयी जी, पाकिस्तान, काश्मीर आणि चीनची चर्चा बाजूला ठेवा आणि मला सांगा, श्रीमती कौलचे काय प्रकरण आहे?’ या प्रश्नामुळे सगळे शांत झाले मात्र वाजपेयींनी हसत उत्तर दिले की, ‘हा मुद्दा काश्मीरसारखा आहे.’