Home » रशियन युक्रेन युद्धाला वर्ष पूर्ण झालं तरी…

रशियन युक्रेन युद्धाला वर्ष पूर्ण झालं तरी…

by Team Gajawaja
0 comment
War
Share

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत आलंय. या युद्धाला वर्षपूर्तीपूर्वी होण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन  हे अचानक कीवमध्ये दाखल झाले. बिडेन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची राजधानी किव येथे भेट घेतली. बिडेन यांनी अचानक युक्रेनला दिलेल्या भेटीवर अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. तसेच वर्षभरापूर्वी सुरु झालेल्या या युद्धानं (War) नेमकं रशियाला काय दिलं आणि युक्रेननं काय गमावलं याची चर्चा सुरु झाली आहे.  

रशियन सैन्याने 24 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनवर हल्ला (War) केला.  रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांचा यामागचा उद्देश म्हणजे युक्रेनवर कब्जा करणे हा होता.  रशियाच्या मानानं अगदी छोट्या असलेल्या युक्रेननं हा त्यांचा उद्देश सफल होऊ दिला नाही.  युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियासारख्या बलाढ्य शक्तीला वर्षभर झुंझवत ठेवलं, यातच त्यांचं यश मानलं जात आहे.  पण यामागची बाजूही लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे, या सर्वात युक्रेन हा देश पूर्णपणे उदध्वस्त झाला आहे.  येथील लाखो लोकांचे आयुष्य हे शून्यवत झाले आहे. अर्थात रशिया कितीही बलवान असला तरी या युद्धाच्या झळा त्यालाही सोसाव्या लागल्या आहेत. अद्याप कोणतीही पक्की आकडेवारी नसली तरी, असे मानले जाते की, या युद्धात दोन्ही बाजूंचे हजारो सैनिक मारले गेले आहेत.  या युद्धानं काय साधलं गेलं हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. रशिया, ही मोठी शक्ती आहे.  पण या शक्तीशाली देशाला युक्रेनसारख्या देशानं प्रसंगी खाली वाकायला लावलं आणि दुसरीकडे छोट्या युक्रेननं अतिशय निग्रहानं युद्धाला तोंड दिले. पण हे करताना युक्रेनच्या नागरिकांना मोठी आहुती द्यावी लागली आहे.  त्यामुळेच या युद्धाचे फलित काय हा प्रश्न चर्चिला जात आहे. (War)

एक वृत्तपत्राच्या अहवालानुसार युक्रेनवर केलेल्या हल्यामुळे रशियाने काळ्या समुद्रातील व्यापार मार्गाचा बहुतांश भाग ताब्यात घेतला आहे. याशिवाय रशियाने युद्ध (War) सुरू झाल्यापासून युक्रेनच्या 18% भूभागावर कब्जा केला आहे. युक्रेनमधील सेवेरोडोनेत्स्क, डोनेत्स्क, लुहान्स्क, झापोरिझिया, मारियुपोल आणि मेलिटोपोल या सहा प्रमुख शहरांवर रशियानं आपला ताबा मिळवला आहे.  ही युक्रेनमधली मुख्य शहरे असून आर्थिक उलाढाल याच शहरातून चालते.  ही शहरे जर रशियाच्या ताब्यात राहिली तर युक्रेनच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी झाल्याचे मानण्यात येते.  मुळात युद्ध (War) सुरु झाल्यापासून रशिया अत्यंत सहजपणे विजय मिळवेल असा अंदाज होता.  मात्र युक्रेननं याबाबतीत भल्याभल्यांना फोल ठरवलं.  युक्रेन इतके दिवस युद्धात (War) टिकून राहिले, त्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिका आणि पाश्चात्य देशांकडून मिळालेली शस्त्रे आणि आर्थिक मदत.  पण ही मदतही आता कमी पडू लागली आहेत.  त्यातही रशियानं युक्रेनची जी सहा शहरं ताब्यात घेतली आहेत, तिथे मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती आणि खनिजांच्या खाणी आहेत. हे सर्व ताब्यात मिळवल्यावर रशियानं अर्धेअधिक युद्ध (War) जिंकल्याचे सांगण्यात येते. 

याशिवाय युक्रेनचे मारियुपोल शहर रशियन सीमेच्या अगदी जवळ आहे.  हे महत्त्वाचे बंदर असून ते काळ्या समुद्राला जोडते. मारियुपोल बंदरातून जवळपास 10 दशलक्ष मेट्रिक टन मालाची वाहतूक होते. हे बंदर ताब्यात घेतल्यावर आता रशिया त्यावर पूल बांधून अधिक उद्योगधंद्यांची उभारणी करु शकते असा अंदाज आहे. याच भागात दोन मोठ्या स्टील कंपन्या आहेत. त्यांचाही ताबा रशियाकडे आल्यामुळे युक्रेनची अर्थव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे. याशिवाय सर्वात मोठा धोका म्हणजे, झापोरिझिया हे युरोपचे अणुऊर्जा केंद्र आहे. येथे युरोपातील सर्वात मोठा अणु प्रकल्प आहे. हा भाग रशियामध्ये समाविष्ट करून पुतिन आपल्या देशाला जगातील सर्वात मोठी अणुशक्ती बनवू शकतात.  याच भागाला युक्रेनचे केमिकल इंडस्ट्री सेंटर म्हणतात. येथे युक्रेनमधील सर्वात मोठा केमिकल प्लांट आहे. आता ही शहरे रशियाच्या ताब्यात गेल्यावर त्याचा परिणाम म्हणून युक्रेनची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळण्याच्या मार्गावर गेली आहे. रशियानं ताबा मिळवलेल्या युक्रेनची इतर शहरेही अशीच महत्त्वाची मानली जातात.  येथून दोन प्रमुख युरोपियन महामार्ग येथून जातात. एका शहरात भांडी तयार करण्याचा आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्याचा मोठा कारखाना आहे. आता त्यावर रशियाचे वर्चस्व आहे. याशिवाय विमान आणि वाहतुकीशी संबंधित भाग, कारचे इंजिन बनवणारे कारखानेही या भागात आहेत.  ते ताब्यात घेतल्यानंतर रशिया आता वाहतुकीशी संबंधित उत्पादन वाढवू शकणार आहे.

========

हे देखील वाचा : ३३५ वर्ष लढले गेलेले युद्ध

=======

या युद्धाला (War) वर्ष होत असतांना भारत, अमेरिकेसह युरोपीय देशांनी पुतीन यांना युद्ध संपवण्याचे आवाहन केले आहे. अर्थात 2022 वर्षाच्या अखेरीस पुतीन यांनीही हे युद्ध लवकर संपवण्याचा प्रयत्न असल्याचे जाहीर केले होते. पण त्यानंतरही युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरुच राहिले.  या युद्धामुळे हजारो सैनिकांना आणि सामान्य नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी मोठा दावा केला आहे की या युद्धात (War) 30,000 हून अधिक नागरिक मारले गेले आहेत. सुमारे 80 लाख लोकांना घरे सोडून इतरत्र जाण्यास भाग पडले आहे.  या युद्धाचा मोठा फटका बसला आहे, तो लहान मुलांना.  युद्धामुळे अनेक मुलं पोरकी झाली आहेत.  अशा मुलांच्या भविष्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. दोन देशातील हे युद्ध (War) लाखो नागरिकांच्या जिवावर मात्र उठले आहे.  युद्धाला वर्ष पूर्ण होत असतांना त्याला विराम मिळावा अशीच अपेक्षा सर्वसामान्यांची आहे.  

सई बने….


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.