निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले. एवढेच नाही तर शिवसेना हे नाव जसेच्या तसे वापरण्यास बंदी घातली. हे निर्णय अंतरिम आहेत असे जाहीर करण्यात आले आहे.
यावरून १९६९ च्या काँग्रेसमधील पहिल्या फुटीच्या आठवणी जाग्या झाल्या. १९६९ मध्ये काँग्रेसमध्ये एकनाथ शिंदेंच्या उठावासारखीच स्थिती निर्माण झाली होती. इंदिरा गांधी काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या होत्या व काँग्रेस सत्तारूढ असल्याने त्या देशाच्या पंतप्रधान होत्या. निजलिंगाप्पा काँग्रेसचे अध्यक्ष होते. राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसच्या संजीव रेड्डींचे नाव जाहीर झाल्यावर इंदिरा गांधींनी ऐन वेळी व्ही व्ही गिरी या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला व गिरी हे संजीव रेड्डींचा पराभव करून राष्ट्रपतीपदी निवडून आले. निजलिंगप्पाच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने इंदिरा गांधींची पक्षातून हकालपट्टी केली. पण इंदिरा गांधींनी नवीन पक्ष स्थापन न करता आपणच खरी काँग्रेस असल्याचा दावा केला. त्याकाळी काँग्रेसचे निवडणूक चिन्ह होते बैलजोडी. (Election Symbol) हा वाद निवडणूक आयोगासमोर गेला. इंदिरा गांधींकडे संसदीय पक्षात बहुमत होते तर निजलिंगप्पांकडे पक्षाच्या कार्यकारिणीत बहुमत होते. निवडणूक आयोगाने तेव्हा सुद्धा काँग्रेसचे बैलजोडी हे चिन्ह गोठवले आणि दोन्ही गटांना नवीन नाव व चिन्ह घेण्यास सांगितले. इंदिरा गांधींच्या पक्षाने काँग्रेस (न्यू ) हे नाव घेतले व त्यांना गायवासरू हे चिन्ह मिळाले. निजलिंगप्पाच्या काँग्रेसने काँग्रेस(ओल्ड) हे नाव धारण केले व त्यांना चरखा हे चिन्ह मिळाले. निवडणूक आयोगाने त्यावेळी सुद्धा खरी काँग्रेस कुठली यावर निर्णय दिला नव्हता. बैलजोडी हे काँग्रेसचे मूळ चिन्ह परत कधी काँग्रेसच्या कुठल्याही गटाला मिळाले नाही. त्यावेळी पक्षांतर बंदी कायदा अस्तित्त्वात नसल्याने न्यायालयीन लढाया झाल्या नाहीत. कालांतराने सर्वच काँग्रेसजनांनी इंदिरा गांधींचे नेतृत्व मान्य केल्याने काँग्रेस(न्यू) हीच खरी काँग्रेस म्हणून ओळखली जाऊ लागली. निजलिंगप्पांचा काँग्रेस(ओल्ड) पक्ष काही काळानंतर दुर्बल होत गेला व आणीबाणीनंतर जनता पक्षात विलीन झाल्यावर हा पक्ष संपुष्टात आला.(Election Symbol)
१९७७-७८ मध्ये परत काँग्रेसमध्ये फूट पडली आणि काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी व ब्रह्मानंद रेड्डी असे दोन गट निर्माण झाले. काँग्रेसचे नामकरण काँग्रेस(इंदिरा) आणि काँग्रेस (रेड्डी) असे झाले. यावेळी सुद्धा नवीन चिन्हे देण्यात आली. काँग्रेस (इंदिरा) या पक्षाला हाताचा पंजा हे चिन्ह मिळाले. थोड्याच काळानंतर रेड्डी काँग्रेसचे विलीनीकरण काँग्रेस(आय) मध्ये होऊन एकसंघ काँग्रेस अस्तित्वात आली आणि हाताचा पंजा हे सध्या प्रचलित असलेले चिन्हच काँग्रेसची निशाणी ठरले.(Election Symbol)
या पूर्वपीठिकेप्रमाणे आता शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह यापुढे कोणत्याही गटाला मिळणार नाही हे निश्चित. शेवटी जे नेतृत्व पक्षात सर्वमान्य ठरेल त्याच नेत्याचा पक्ष भविष्यात शिवसेना म्हणून ओळखला जाईल. सध्या उद्धव ठाकरेंची अवस्था निजलिंगप्पांसारखी झाली आहे व शिंदे इंदिरा गांधींप्रमाणे संसदीय बहुमताच्या जोरावर नेतृत्व करत आहेत.(Election Symbol)
=============
हे देखील वाचा : CJI पदी दीर्घकाळ राहिल्याचा वडिलांचा रेकॉर्ड, मुलाला सुद्धा मिळणार सीजेआय पद
=============
कुठल्याही चॅनेलवर हा पूर्वेतिहास सांगितला जात नाही म्हणून हा प्रपंच. सर्व वकील, विश्लेषक असे भासवत आहेत की हा अंतरिम आदेश असल्याने निवडणूक आयोगाचा अंतिम निर्णय निराळा असेल. थोडक्यात आपापल्या पोलिटिकल मास्टर्सना एक मधाचे बोट दाखवणे हा एकच हेतू दिसतो.(Election Symbol)
शेवटी यात राजकीय दृष्ट्या कोणी काय कमावले व काय गमावले ? याचे उत्तर शोधले तर खालील मुद्दे जाणवतात…
शिंदे गटाने निवडणूक आयोगाचे दार ठोठावून आपल्या गटाला शिवसेनेचा एक गट म्हणून मान्यता मिळवली आहे.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे म्हणजेच शिवसेना या गृहीतकाला छेद देण्यात शिंदे गट यशस्वी ठरला आहे.
तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेचे धनुष्य बाण हे चिन्ह शिंदेंनी शिवसेनेकडून हीरावून घेतले, भले ते चिन्ह त्यांना न मिळो.
आज शिवसेनेपुढे नवीन चिन्हासह नवीन नावाने निवडणुकांना सामोरे जाण्याचे अवघड आव्हान उभे राहिले आहे. शिंदे गट नव्याने आस्तित्त्वात आल्याने नवीन नाव व चिन्हासह मतदारांना सामोरे जाण्यात त्यांना एवढी अडचण भासणार नाही.
शिंदे यांचा उद्देश धनुष्य बाण चिन्ह मिळवणे एवढाच नव्हता तर त्यांचा उद्देश शिवसेनेला या चिन्हापासून वंचित ठेवणे हाच असावा असे वाटते.
रघुनंदन भागवत