दर महिन्यात दोनवेळा येणारी एकादशी म्हणजे नेमकं काय याची माहितीच अनेकांना नसते. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी व्यतिरिक्त अन्य एकादशींबाबत अनेकांना फारशी माहिती नाही. मात्र एकादशीला हिंदू पंचागात अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकादशीचा उपवास केला जातो. विष्णूभक्तांसाठी ही एकादशी महत्त्वाची असते. एकादशीचे महत्त्व धार्मिकदृष्ट्या जसे आहे, तसेच आरोग्यासाठीही हा एकादशीचा उपवास हा आरोग्यासाठीही वरदान असल्याचे सांगितले जाते.
एकादशी म्हणजे हिंदू पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला अकरावा दिवस. पंचांगाप्रमाणे महिन्यातला दोन पंधरवड्यांत प्रत्येकी एक अशा किमान दोन एकादशी येतात. एकादशीचे व्रत विष्णुभक्तांसाठी खास असते. हे व्रत अनादी असल्याचे सांगण्यात येते.
प्रत्येक महिन्यात दोन, याप्रमाणे वर्षातून २४ एकादशी येतात. कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, पुत्रदा, जया, आमलकी ही शुक्ल पक्षातील एकादशींची नावे आहेत, तर वरूथिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, उत्पत्ती, सफला, षट्तिला, विजया, पापमोचनी ही कृष्ण पक्षातील एकादशींची नावे आहेत. याव्यतिरिक्त अधिक महिना आला, तर एकादशींची संख्या वाढते. अधिक महिन्यातील एकादशीला कमला असे म्हटले जाते.
आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी
वर्षाला चोवीस एकादशी येत असल्या तरी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी यांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू गाढ निद्रेत जातात असे मानले जाते. कार्तिकी एकादशीपर्यंत भगवान विष्णुंची निंद्रा चालू असते. त्यामुळेच चातुर्मासाची सुरुवात आषाढ शुक्ल 11ला होतो आणि कार्तिक शुक्ल 11ला चातुर्मास संपतो. हिंदू धर्मात या चार महिन्यात अनेकजण व्रत, उपवास आणि पुजा करतात. जैन धर्मातही या चातुर्मासाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. चातुर्मासात जैन साधू गावोगावी न जाता एकाच देरासरात स्थानकवासी होतात आणि ध्यानधारणा करतात.

ज्या दिवशी देव म्हणजेच भगवान विष्णु गाढ निद्रेतून उठतात ती देवउठणी एकादशी. म्हणजेच कार्तिकी एकादशी. या कार्तिकी एकादशीपासून तुळशी विवाह सुरू होतो आणि विवाह मुहूर्तही सुरु होतात. पंढरपूरची यात्रा याच दिवशी संपते.
निर्जला एकादशी
अनेकजण निर्जला एकादशी करतात. फक्त पाणी घेऊन हा उपवास केला जातो. या पाण्यात फक्त सुंठ आणि साखर घालण्यात येते. असे पाणी पोटात अन्न नसताना गेल्यास त्याचा पोटातील अवयवांना फायदा होतो. पोट साफ करण्यास त्याची मदत होते. यामुळे पचनशक्ती वाढते, परिणामी आरोग्य सुधारते. त्यामुळे महिन्यातून दोन वेळा येणाऱ्या एकादशीच्या उपवासाचे जेवढे धार्मिक महत्त्व आहे, तेवढेच ते व्रत आरोग्यदायी असल्याचे सांगितले जाते.

वरुथिनी एकादशी
महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला वरुथिनी एकादशी असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. यामागे एक कथा सांगितली जाते. भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला वरुथिनी एकादशी व्रताचे महत्त्व सांगितले होते. जो कोणी वरुथिनी एकादशीचे व्रत करतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते, असे या कथेत सांगण्यात आले आहे.
=====
हे देखील वाचा – ब्रम्ह मुहूर्ताच्यावेळी ‘ही’ स्वप्न पडल्यास अचानक होतो धनलाभ
एकादशीचा उपास का करतात? एकादशी उपासाचे प्रकार
एकादशीला उपवास करण्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत. त्याला स्मार्त आणि भागवत अशा दोन पद्धती म्हटले जाते. बहुतांशी वारकरी मंडळी भागवतपद्धती मानतात तर स्मृतींना मानणारे स्मार्त एकादशीचे व्रत करतात. एकादशीचा उपवास बहुतांशीजण दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सोडतात. या उपवासाला फक्त फळे, आणि दुधाचे पदार्थ खाल्ले जातात.
एकादशीच्या सूर्योदयापासून दुसर्या दिवशी सूर्योदयापर्यंत हा वर्ज्य कालावधी मानला जातो. एकादशीला भात खाल्ला जात नाही. भागवत पुराणात भगवान विष्णूचे परम भक्त अंबरीषाने एकादशीचे निरीक्षण नोंदवले आहे. त्यामध्ये उपवास करताना काय खावे आणि व्रताची सांगता कशी करावी याबाबतही सांगितले आहे. भगवान विष्णुचे जे भक्त या दिवशी उपवास करतात त्यांच्यावर पडलेला अशुभ शक्तींचा प्रभाव कमी होतो. आणि त्यांना मानसिक स्थैर्य प्राप्त होते, असे सांगण्यात आले आहे.

एकादशीचे व्रत करताना भगवान विष्णूची पूजा तुळशीच्या पानांनी देवाला अभिषेक करुन दिवसभर विष्णूनामाचा जप करावा असेही सांगण्यात आले आहे. वारकऱ्यांमध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीचे महत्त्व खूप आहे. या दोन्ही दिवशी पंढरपूरला वारकऱ्यांची गर्दी होते. एकादशीच्या दिवशी विठोबाचे आणि रुक्मीणी मातेचे दर्शन घेणे मोठे पुण्याचे मानले जाते. त्यामुळे लाखो वारकरी यादिवशी उपवास करुन देवाचे दर्शन घेतात.

एकादशीचा उपास का करतात? धार्मिक महत्त्व
एकादशीचे व्रत का करावे यासाठी काही कथा सांगितलेल्या आहेत, त्यामध्ये देव आणि दानव यांच्यातील युद्धाची कथा प्रमुख आहे. कुंभ नावाच्या राक्षसाचा मुलगा मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णु, शिव अशा सर्व देवांपेक्षा ताकदवान झाला. त्याच्या भयाने सर्व देव त्रिकुट पर्वतावर एका गुहेत लपून बसले. तेव्हा एकादशी होती. त्यांनी हा आषाढी एकादशीचा उपवास केला. या उपवासामुळे त्यांनी शक्ती मिळाली. त्यातून सर्व देवांनी गुहेच्या दाराजवळ बसलेल्या मृदुमान्य राक्षसाला ठार मारले. ही शक्ती म्हणजेच एकादशी असे सांगण्यात आले आहे.
एकूण एकादशी व्रतामागे अनेक कथा असल्या तरी त्यातील उद्देश हा सर्वांचेच कल्याण असाच आहे.
– सई बने