भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे पुस्तक प्रेम सर्वश्रुत आहे. पुस्तकांना त्यांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व होते. जेवणात वेळ जावू नये म्हणून ग्रंथालयातच पाव आणून तिथेच पाव खात जास्तीत जास्त पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करणारे बाबासाहेब आपल्याला माहिती आहेत. त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग त्यांच्या जीवनातील पुस्तकांचे महत्व अधोरेखित करतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) त्यांच्या काळातील भारतातील सर्वात जास्त शिकलेले व्यक्ती होते. मुंबईच्या एलफिस्टन कॉलेजमधून त्यांनी बी.ए.ची डिग्री घेतली होती. कोलंबिया विश्वविद्यालय आणि लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स मधून त्यांनी पीएचडी मिळवली होती. सुरुवातीपासूनच वाचनाची प्रचंड आवड असल्याकारणाने त्यांच्याकडे पुस्तकांचा प्रगल्भ साठा होता. ‘इनसाईड एशिया’ या पुस्तकाचे लेखक ‘जॉन गुंथेर’ लिहितात, जेव्हा १९३८ मध्ये माझी बाबासाहेबांशी भेट झाली होती तेव्हा त्यांच्याकडे आठ हजार पुस्तके होती, त्यांच्या मृत्युपर्यंत ही संख्या पस्तीस हजारापर्यंत पोहोचली होती.

बाबासाहेबांचे निकट सहयोगी राहिलेले ‘शंकरानंद शास्त्री’ त्यांच्या पुस्तकात लिहितात, मी रविवार २० डिसेंबर १९४४ रोजी दुपारी बाबासाहेबांना (Dr. Babasaheb Ambedkar) भेटायला गेलो. त्यांनी मला त्यांच्या सोबत जामा मस्जिद परीसरामध्ये चालायला सांगितले. तिथे जुन्या पुस्तकांचं प्रचंड मोठं मार्केट होतं. दुपारच्या जेवणाची वेळ होतेय म्हणून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्यावर याचा काही फरक पडला नाही. बाबासाहेब जामा मस्जिद परीसरामध्ये आहेत हे कळल्यावर तिथे लोकांची प्रचंड गर्दी झाली. एवढ्या गर्दीला तोंड देत त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरील जवळपास दोन डझन पुस्तके खरेदी केली. ते त्यांची पुस्तके कुणालाच वाचायला देत नसत. पुस्तके वाचायची कुणाची इच्छा असेल तर त्यांनी माझ्या ग्रंथालयात येऊन वाचावेत, असा त्यांचा आग्रह असायचा.
सकाळपर्यंत बाबासाहेब (Dr. Babasaheb Ambedkar) पुस्तक वाचनात गढून गेलेले असत. बाबासाहेबांचे अनुयायी राहिलेले ‘नामदेव निमगडे’ त्यांच्या पुस्तकात सांगतात, रात्रीच्या वेळी बाबासाहेब वाचनात एवढे गढून जात असत की, बाहेरील जगाचे त्यांना बिलकुल भान राहत नसे. एकदा बाबासाहेब त्यांच्या खोलीत वाचत बसलेले असताना मी तिथे गेलो आणि त्यांच्या पायांना स्पर्श केला. वाचनात मग्न असलेले बाबासाहेब बोलले, “टॉमी, नको करू हे.” मला थोडं आश्चर्य वाटलं. बाबासाहेबांनी जेव्हा वर बघितलं, तेव्हा त्यांना लक्षात आलं. वाचनात ते एवढे मग्न होऊन गेले होते की टॉमी येऊन पाय कुरवाळतोय असं त्यांना वाटलं.
=======
हे देखील वाचा : हत्येसाठी प्रत्येकवेळी हा मुघल बादशाह वापरायचा नवी पद्धत
=======
बाबसाहेबाचं चरित्र लिहिणारे ‘धनंजय कीर’ लिहितात, रात्रभर वाचल्यानंतर बाबासाहेब (Dr. Babasaheb Ambedkar) फक्त दोन तास झोप घेत असत. उठून थोडा व्यायाम करत. त्यानंतर अंघोळ करून नाश्ता करत असत आणि वर्तमानपत्र वाचल्यानंतर आपल्या कारमधून ते कोर्टाकडे रवाना होत. रस्त्यातून जाताना ते टपालाने नवीन आलेल्या पुस्तकांवर नजर फिरवत असायचे. कोर्टांनंतर ते पुस्तकांच्या दुकानात जात आणि घरी येतांना नवीन पुस्तकांचा एक गुच्छ घेऊन येत. त्यांच्या दैनंदिनीमध्ये पुस्तकांनी बराच वेळ व्यापलेला असायचा. समाजओघाबाहेर ढकलल्या गेलेल्या घटकांसाठी अविरतपणे राबत आपले जीवन वेचणाऱ्या बाबासाहेबांच्या जीवनात पुस्तकांना अनन्यसाधारण महत्व होते.