महाराष्ट्राला सांस्कृतिक आणि साहित्यिक परंपरा आहे, आणि दिवाळी अंक ही त्यातलीच एक समृद्ध करणारी गोष्ट ! ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा’ या ओळीतील जो आनंद आहे तो फराळ, फटाके यांच्याबरोबरच दिवाळी अंकांमुळे द्विगुणित होतो. ऐन दिवाळीच्या दिवसात लाडू, चकली, करंजी, चिवडा यांचा आस्वाद घेता घेता दिवाळी अंकातील आपल्या आवडत्या लेखकाची कथा वाचणे यापेक्षा दुसरे स्वर्गसुख कोणते? आपण लहानपणापासून मौज, दीपावली, माहेर, हंस, अक्षर असे अनेक दिवाळी अंक आपल्या पुस्तकांच्या खजिन्यात जपून ठेवलेले असतील. पण तुम्हाला माहितेय का दिवाळीचा पहिला अंक कोणता तो कोणी सुरु केला ? आणि एकंदरीतच या दिवाळी अंकांचा इतिहास काय ? याच प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया. (Diwali Ank)
तर मंडळी, १९०९ साली मराठीतला पहिला दिवाळी अंक मासिक मनोरंजनचे संपादक काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी प्रकाशित केला. तो व्यक्तिचित्र विशेषांक होता. खर तर अमेरिकेतील/ इंग्रजीतील ख्रिसमस विशेषांकांवरून त्यांना ही कल्पना सुचली. मग मराठीत दिवाळी अंक का असू नये, असं त्यांना वाटलं आणि त्यांनी हा अंक सुरु केला. इतकंच नव्हे, तर तो त्यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिला होता. बालकवींची सुप्रसिद्ध असणारी ‘आनंदी आनंद गडे’ ही कविता या पहिल्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती! सलग तीन वर्षं का. र.मित्र यांनी तो विनामूल्य उपलब्ध करून दिला, आणि त्यानंतर हळूहळू इतरही मासिकांनी दिवाळी अंक काढायला सुरूवात केली. पुढे १९३२ पर्यंत बऱ्याचशा मासिकांनी दिवाळी अंक काढायला सुरुवात केली होती. पण हे दिवाळी अंक यायच्या आधी पूर्वी मराठी मासिकांतून क्रमश: कादंबऱ्या प्रकाशित केल्या जायच्या. मग त्याच दिवाळी अंकांतून प्रकाशित होऊ लागल्या. कथा, कविता, कादंबऱ्या, व्यक्तिचित्रं, प्रवासवर्णन, आत्मचरित्र अशा विविध प्रकारचं लेखन दिवाळी अंकांतून प्रकाशित होऊ लागलं. ही दिवाळी अंकाची परंपरा मनोरंजन या मासिकाने १९३५ पर्यंत जपली. आता म्हणजेच २०२४ पर्यंत ही परंपरा यशस्वीरीत्या चालू असून, संपूर्ण महाराष्ट्रात आजच्या घडीला ३०० ते ४०० दिवाळी अंक निघतात! (National News)
का. र. मित्रंनी १९०९ साली काढलेला ‘मनोरंजन’ चा पहिला दिवाळी अंक १९२ पानांचा होता.या अंकाचं आणखी एक वैशिष्ठय म्हणजे, त्यात असलेला त्यावेळच्या स्त्री- लेखिकांचा समावेश ! त्या काळची स्त्री आजच्यासारखी पुरुषांच्या बरोबरीची मानली जात नव्हती. तरीही मनोरंजनाच्या पहिल्या दिवाळी अंकात चिमणाबाई गायकवाड, लक्ष्मीबाई टिळक, काशीबाई हेर्लेकर, क्षमाबाई राव, गिरिजाबाई केळकर, कु. मथुराबाई जोशी अशा विदुषींच्या साहित्याचा समावेश होता. मुळातच काशिनाथ मित्र नव्या विचारांचे पुरस्कर्ते असल्यामुळे ‘मनोरंजन’ची निर्मिती त्यांनी त्याच विचारांतून केली होती. या पहिल्या दिवाळी अंकापासून दिवाळी अंकांच्या प्रथेमध्ये खंड पडलेला नाही. काळाच्या ओघात पुढे अनेक दिवाळी अंक या प्रवाहात सामील झाले. नव्या संकल्पना, विषय, मांडणी, लेखक, कवी, कादंबरीकार घेऊन हा प्रवास अबाधित राहिला आहे. हल्ली कोणत्याही गोष्टीचा मग ते नाटक असो, सिनेमा असो वा एखादी कलाकृती असो, त्याचा एक ट्रेंड सेट झाला कि त्याच धाटणीची कॉपी होऊ लागते. दिवाळी अंकांबाबत मात्र असं झालं नाही. (Diwali Ank)
तसं बघायला गेलं तर मराठी माणसाची दिवाळी दिवाळी अंकाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही! आत्तापर्यंत दिवाळी अंकांचा इतिहास पहिला तर यात मराठी साहित्यातील विविध प्रकार हाताळले असून, त्यातून अनेक लेखक-साहित्यिक नावारूपास आले.१९२२ साली निर्मित झालेला ‘मौज’ हा सर्वात जुना दिवाळी अंक आहे. ग. दि. माडगूळकर, कुसुमाग्रज, शांत शेळके, मंगेश पाडगांवकर , विंदा करंदीकर, वसंत बापट, इंदिरा संत, नारायण सुर्वे आदी दिग्गज कवींनी मौजच्या दिवाळी अंकात नेहमीच हजेरी लावली. कवी ग्रेस, अनुराधा पाटील व त्यानंतरची पिढी ‘मौज’सारख्या दिवाळी अंकांमुळेच लोकांपर्यंत पोहोचली. जयवंत दळवींच्या बहुतेक कादंबऱ्या सर्वात आधी दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झाल्या. व. पु. काळें, पु. ल. देशपांडे यांसारख्या नामांकित लेखकांची लेखन कारकीर्द दिवाळी अंकांमधूनच सुरू झाली. पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ला मौज मधूनच प्रसिद्धी मिळाली होती. ‘बटाट्याची चाळ’ तर दर दिवाळीत छापून यायच.नंतर त्याच १९५८मध्ये पुस्तक झाल. व्यंकटेश माडगूळकरांची पहिली कथा ‘गावाकडं’ ही पन्नासच्या दशकात दिवाळी अंकातून छापून आली होती.पूर्वी काही दिवाळी अंक हे संपादकांचे दिवाळी अंक म्हणून ओळखले जात असत. आचार्य अत्रेंचा ‘नवयुग’, पु.आ.चित्रेंचा ‘अभिरुची’, राम पटवर्धनांचा ‘सत्यकथा’, उमाकांत ठोंबरेंचा ‘वीणा’ , अनंत अंतरकरांचे ‘हंस’, ‘नवल’, ‘मोहिनी’… हि त्याची काही उदाहरणे आहेत. (National News)
प्रसिद्ध चित्रकार दीनानाथ दलालांनी १९५०च्या दशकात ‘दीपावली’ हा दिवाळी अंक सुरू केला, तर त्याच सुमारास त्या काळातील दुसरे गाजलेले चित्रकार रघुवीर मुळगावकर यांनी ‘रत्नदीप’ हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. विशेष म्हणजे ‘आवाज’ या विनोदी दिवाळी अंकावर सलग तीन वर्षे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुखपृष्ठ काढले होते, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. व्यंगचित्रं हे दिवाळी अंकाचच बाळ म्हणावं लागेल. दिवाळी अंकांनी मराठीला जितके व्यंगचित्रकार दिले, त्याचं मोल खूप आहे. प्रभाकर झळके, प्रभाकर ठोकळ, द. अ. बडमंत्री ते अगदी शेवटपर्यंत आपली कारकीर्द गाजवणारे वसंत सरवटे आणि मंगेश तेंडुलकर यांच्यापर्यंतच्या नावांचा त्यात समावेश आहे. थोडक्यात काय तर नवशिख्या लेखकांच्या, कलाकारांच्या दृष्टीने त्यांच्या जडणघडणीसाठी दिवाळी अंक ही एक शाळाच आहे, आणि वाचकांची भूक भागवण्याचं ते एक उत्तम साधन आहे. (Diwali Ank)
आता दिवाळी अंकांबद्दल बोलतोय तर त्यात महत्वाचा फॅक्टर येतो तो म्हणजे जाहिराती ! याबद्दल सांगायचं झालं तर १९५० ते ८० या काळातील दिवाळी अंक हे खरोखर साहित्य विशेषांक होते, आणि ते जाहिरातींचा वापर केवळ आधार म्हणून करत. आता जाहिराती जास्त आणि त्याला तोंडी लावायला साहित्य अशी अवस्था आहे, असं मत जाणकार व्यक्त करतात. कासवछाप अगरबत्ती, महाराष्ट्र बँक, कॉसमॉस बँक, विको वज्रदंती, कॅम्लिन, कालनिर्णय, अशा अनेक कंपन्या २५ लाखांपर्यत जाहिराती दिवाळी अंकांना देतात. दीनानाथ दलाल जाहिरातींना ‘दिवाळी अंकांचा गॅस’ म्हणत. पण हल्ली बरेचसे अंक केवळ जाहिराती मिळतात म्हणूनही काढले जातात. वर्तमानपत्रांच्या दिवाळी अंकांचा त्यात प्राधान्यायने समावेश होतो. पण या दिवाळी अंकांच्या निमित्तानं प्रिंटर, बाइंडर, प्रूफरिडर, कंपोझिटर, चित्रकार, ग्राफिक आर्टिस्ट, वेब डिझायनर, अनुवादक, वितरक, अशा अनेकांना रोजगार मिळतो. (National News)
आता हे दिवाळी अंक नेमके कधी येतात हे जाणून घ्यायचं झालं तर हे सर्व दिवाळी अंक दिवाळीच्या आगेमागेच बाजारात येतात, पण दै. सामनाचा दिवाळी अंक मात्र दसऱ्यालाच बाजारात येतो. दिवाळी अंकांच्या आगमनाची नांदी ‘सामना’ च्या अंकाने होते. दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, द्वैमासिक, त्रैमासिक, षण्मासिक, अर्धवार्षिक आणि वार्षिक अशी सर्व नियतकालिकं दिवाळी अंक काढतात. मौज, श्रीदीपलक्ष्मी, हंस, दीपावली ही पूर्वीची साप्ताहिकं-मासिकं आता बंद पडली असली तरी आता त्यांचे दिवाळी अंक मात्र काढले जातात.महाराष्ट्राबाहेर विचार केला तर बडोदा, इंदूर, हैद्राबाद, कोलकाता, दिल्ली या ठिकाणांहूनही अंक प्रकाशित होतात. भारताबाहेर सांगायचं झालं तर लंडन आणि अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळं हे दिवाळी अंक काढतात. मराठीत किती विपुल आणि व्यापक प्रमाणावर साहित्यनिर्मिती झाली आहे, याचा अंदाज या दिवाळी अंकातून येतो. गेल्या शतकभरात किमान दहा हजार दिवाळी अंक निघाले असून, आज ते अंक शोधून काढणेही कठीण झाले आहे. वास्तविक बघायला गेलं तर अगदी १९०९ पासून निघालेल्या दिवाळी अंकांच एक स्वतंत्र ग्रंथालय निर्माण होऊ शकेल. (Diwali Ank)
======
हे देखील वाचा : दिवाळी ट्रेंडिंगचा ६८ वर्षांचा मोठा इतिहास
====
दरवर्षी मोठ्या संख्येने दिवाळी अंक बाजारात येतात, आणि स्वत:च्या वैशिष्ट्यांसह ते वाचकांपर्यंत पोहोचतातही. साहित्य, महिला, ज्योतिष, आरोग्य, रहस्यकथा या वैविध्यपूर्ण प्रकारांसह ते वाचलेही जातात. काही दिवाळी अंक दर वर्षी स्वतंत्र विषय घेऊन त्याचा विशेषांक काढतात. थोडक्यात काय तर शंभर वर्षांपूर्वी महाराष्ट्रात रुजलेली दिवाळी अंकांची हि परंपरा अव्याहतपाने आजही सुरु आहे. पूर्वी वाचन हेच मनोरंजनाचे मुख्य साधन होते. पुढे काळ बदलला आकाशवाणी, दूरदर्शन, खाजगी वाहिन्या, केबल, इंटरनेट असा मनोरंजनाचा आवाका विभागला गेला. तंत्रज्ञानात बदल झाले.पण या सर्व बदलांना सामोरे जात दिवाळी अंकांचा प्रवास मात्र चालूच आहे. असं म्हणता कि परंपरा हे संस्कृतीचं बायप्रॉडक्ट असतं. त्यामुळे संस्कृती धोक्यात येऊ लागली की, त्याचा उपसर्ग परंपरेला होतच असतो. म्हणूनच महाराष्ट्राची साहित्यिक दौलत असलेल्या या दिवाळी अंकांचा आपणही लाभ घेतला पाहिजे इतकच ! त्यामुळे यावर्षी एक संकल्प करूया आपल्या आप्तेष्टांना दिवाळीची मिठाई देण्याऐवजी दिवाळी अंकांचा फराळ भेट म्हणून देऊया. जमेल ना? (National News)