दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. सगळीकडे सध्या दिवाळीची जोरदार तयारी चालू असून, साफसफाई, खरेदी करण्यावर मोठा भर दिला जात आहे. दिवाळी म्हटले की, सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो दिवाळीचा फराळ. चिवडा, लाडू, चकली, शंकरपाळे, करंजी आदी अनेक पदार्थ या फराळामध्ये सामील असतात. दिवाळीच्या फराळ जरी सगळीकडे एकसारखा बनत असला तरी त्यात अनेक प्रकारची व्हरायटी पाहायला मिळते. चिवड्याचे अनेक प्रकार, विविध लाडू, शेव आदी सर्वच पदार्थांमध्ये नानाविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.
दिवाळीतील फराळाचा राजा म्हणजे ‘लाडू’. लाडू न आवडणारा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. पूर्वापार पासून लाडू म्हटले की बेसन, रवा, रवा खोबरे आदी लाडूंचे प्रकार आपल्याला दिसायचे. आता लाडूंचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. विस्मरणात गेलेले लाडूंचे प्रकार देखील आता सर्रास आपण बघतो. याच दिवाळीच्या निमित्ताने आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत विविध प्रकारच्या लाडूच्या काही रेसिपी. मग दिवाळीला या रेसिपी नक्की तरी करा आणि तुमच्या प्रियजनांना देखील खाऊ घालून दिवाळीचा आनंद द्विगुणित करा.
१) बुंदीचे लाडु
साहित्य:
१ कप बेसन
१ कप साखर
वेलची पूड
केशर
तळण्यासाठी तूप किंवा तेल
बुंदी पाडायला आणि तळायला असे दोन झारे
कृती:
१) बेसनात १ चमचा तूप घालावे. पाणी घालून मध्यमसर पीठ भिजवावे. पीठ घट्टही नको आणि पातळसुद्धा नको. गुठळ्या राहू देउ नयेत.
२) कढईत तूप गरम करून आच मध्यम ठेवावी.
३) कढईवर झारा धरून भिजवलेल्या पीठातील थोडे पीठ घालावे. बुंदी पाडाव्यात. बुंदी तळल्या गेल्या कि दुसऱ्या झाऱ्याने बुंदी तूपातून काढाव्यात. पेपरवर काढाव्यात.
४) झाऱ्यावर लागलेले पीठ हाताने साफ करून झारा धुवून पुसून घ्यावा. परत तीच कृती करून सर्व बुंदी तळून घ्याव्यात.
५) साखरेमध्ये साखर बुडेल इतके पाणी घालून एकतारी पाक बनवावा. पाकात वेलची केशर घालावे. पाकात बुंदी घालून ढवळावे. मिश्रण अधून मधून ढवळावे. पाक शोषला गेला कि लाडू वळावेत.
२) रवा खवा लाडु
साहित्य:
२ कप रवा (बारीक)
दिड कप खवा, कुस्करून
दिड कप साखर
१ कप पाणी
१/४ कप तूप
१/२ टिस्पून वेलचीपूड
कृती:
१) कढईत तूप गरम करावे. त्यात रवा मध्यम आचेवर भाजून घ्यावा. खूप खमंग भाजू नये. रवा बाजूला काढून ठेवावा.
२) त्याच कढईत कुस्करलेला खवा घ्यावा. मंद आचेवर रंग बदलेस्तोवर भाजावा. खवा पटकन जळतो म्हणून सतत तळापासून ढवळावे.
३) रवा आणि खवा कोमट झाला की हलकेच मिक्स करून घ्यावे.
४) साखरेचा एकतारी पाक करून घ्यावा. त्यासाठी, साखर आणि पाणी एकत्र करून घ्यावे. उकळी आली की ३-४ मिनिटे उकळू द्यावे. पाकचा थेंब ताटात घेउन चिमटीत पकडावा. आणि चिमटीची उघडझाप करावी. एक तार आली की पाक तयार झाला असे समजावे. आच बंद करावी.
५) या पाकात रवा-खव्याचे मिश्रण घालावे आणि नीट मिक्स करावे. मिश्रण थोडे पातळ वाटेल पण काहीवेळाने आळेल. वेलची पावडर घालावी आणि मिक्स करावे. मिश्रण थोडे घट्टसर झाले की लाडू वळावेत.
३) चुरमा लाडु
साहित्य:
३/४ कप बेसन
१/२ कप साखर
१/४ कप पाणी
१/४ किलो तूप
१/२ टीस्पून वेलचीपूड
१ टेस्पून बेदाणे
कृती:
१) बेसन एका वाडग्यात घालावे. २ टीस्पून कडकडीत गरम तुपाचे मोहन बेसनात घालावे. मिक्स करून ३-४ टेस्पून पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. १५ मिनिटे झाकून ठेवावे.
२) १५ मिनिटांनी परत एकदा मळून घ्यावे. खूप घट्ट वाटल्यास थोडे पाणी घालून मळावे. (पुरी लाटता येईल इतपतच मऊ करावे)
३) कढईत तूप गरम करावे. मळलेल्या बेसनाच्या पातळसर पुऱ्या लाटाव्यात. या पुऱ्या गरम तुपात तळून घ्याव्यात. आच मध्यम आणि मंद यांच्यामध्ये ठेवावी.
४) पुऱ्या तळल्यावर खुसखुशीत झाल्या पाहिजेत. पुऱ्या कोमट झाल्या कि हाताने चुरून घ्याव्यात. चाळणीवर चाळून चाळणीत उरलेला जाडसर भाग लाटण्याने लाटून बारीक करावे किंवा खलबत्त्यात कुटून घ्यावे. (शॉर्टकट – मी पुऱ्या गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पूड केली)
५) साखर आणि पाणी एकत्र करून दोन तारी पाक करावा. साखर विरघळून उकळी फुटली कि ३-४ मिनिटांनी पाकाचा एक थेंब प्लेटमध्ये टाकावा. दोन चिमटीत घेउन उघडझाप करावी. दोन तारा दिसल्या तर पाक तयार झाला असे समजावे नहितर अजून थोडावेळ उकळावे. फक्त मध्येमध्ये तार चेक करत राहावी. गरम दोनतारी पाक कुटलेल्या बेसनात घालावा. वेलचीपूड आणि बेदाणे घालावे. मिक्स करून मिश्रण आळू द्यावे.
६) मिश्रण आटले की लाडू वळावेत.
४) रवा खोबऱ्याचे लाडु
साहित्य:
२ कप बारीक रवा
१ कप खवलेला ताजा नारळ
दिड कप साखर
१ कप पाणी
३ ते ४ टेस्पून तूप
१/२ टिस्पून वेलची पूड
२५ बेदाणे
कृती:
१) रवा मध्यम आचेवर ४ मिनीटे कोरडाच भाजावा. तळापासून सारखे ढवळत राहावे जेणेकरून रवा जळणार नाही. अगदी हलकेच भाजावे.
२) भाजलेला रवा परातीत काढावा. त्यात खवलेला नारळ घालावा आणि मिसळावे. नारळातील ओलसरपणा रव्यात उतरेपर्यंत तसेच ठेवावे.
३) कढई गरम करून त्यात तूप घालावे. तूप वितळले कि रवा-नारळाचे मिश्रण घालावे. ८ ते १० मिनीटे मिश्रण मिडीयम-हाय फ्लेमवर भाजावे. सतत तळापासून ढवळावे. काही वेळाने रवा आणि तूपाचा छान वास येईल. रव्याचा रंग हलका बदामी होईस्तोवर भाजावे. भाजलेले मिश्रण परातीत काढून ठेवावे.
४) साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करावा. मिश्रण उकळायला लागले कि साधारण ३ ते ४ मिनीटांनी पाकाचा थेंब पहिले बोट आणि अंगठा यात पकडून उघडझाप करावी. जर एक तार दिसली कि पाक तयार आहे असे समजावे [हि तार अगदी सेकंदभरच दिसेल]. किंवा एकतारी पाक ओळखता येत नसेल. मिश्रण उकळायला लागले कि ३ ते ४ मिनीटात एकतारी पाक तयार होतो. पाक तयार झाला कि गॅस बंद करावा.
५) लगेच पाक रवा-नारळाच्या मिश्रणात ओतावा. मिक्स करावे. मिश्रण सुरूवातीला पातळ दिसेल पण काहीवेळाने घट्ट होईल. यात वेलचीपूड घालावी. मिश्रण आळेस्तोवर मधेमधे मिक्स करत राहावे.
मिश्रण आळले कि लाडू बनवावेत. प्रत्येक लाडवावर एकेक बेदाणा लावावा.
५) रवा बेसन लाडु
साहित्य:
१ कप बारीक रवा
१/२ कप बेसन
४ टेस्पून तूप
१ कप साखर
१/२ कप पाणी
१/२ टिस्पून वेलचीपूड
बदाम काजूचे पातळ काप
कृती:
१) बारीक रवा मध्यम आचेवर कोरडाच भाजावा. गुलाबीसर रंग येऊ द्यावा. तसेच भाजताना सतत कालथ्याने उलथत राहावा. मोठ्या आचेवर भाजल्यास रंग पटकन येईल पण रवा कच्चाच राहिल.
२) रवा भाजला कि परातीत काढून ठेवावा. त्याच कढईत तूप घालून, मध्यम आचेवर बेसन खमंग भाजून घ्यावे. बदाम काजूचे काप घालावे.
३) दुसर्या पातेल्यात १ कप साखर आणि १/२ कप पाणी घालून एकतारी पाक करावा. एकतारी पाक करण्यासाठी साखर पाणी एकत्र करावा एक उकळी येऊ द्यावी. उकळी आली कि मिश्रण फेसाळेल आणि फेस कमी झाला कि अर्ध्या मिनीटात लगेच गॅस बंद करावा आणि हा पाक रवा आणि बेसनाच्या मिश्रणात घालावा. कालथ्याने ढवळावे आणि झाकून ठेवावे. १५-२० मिनीटांनी मिश्रण ढवळावे. वेलचीपूड घालावी. हळू हळू मिश्रण आळेल आणि लाडू वळण्याइतपत घट्ट झाले कि लगेच लाडू वळावेत.
६) बेसन लाडु बिना पाकाचे
साहित्य:
दिड कप बेसन
साधारण पाऊण कप तूप (वितळवलेले)
३/४ कप पिठी साखर (किंवा गरजेनुसार)
१/२ टिस्पून वेलचीपूड
३ टेस्पून दूध
बेदाणे किंवा सुकामेव्याचे तुकडे आवडीनुसार
कृती:
१) बेसन तूपामध्ये मध्यम आचेवर खमंग भाजून घ्यावे (साधारण ३५ ते ४० मिनीटे). भाजताना सारखे ढवळत राहावे. तूपात बेसन घातल्यावर आधी घट्ट होईल आणि साधारण ५ ते ७ मिनीटांत पातळ व्हायला लागेल. पातळ झाले तरी काळजी करू नये.
२) दुध न घालता:
बेसन छान बदामी रंगावर भाजले गेले कि गॅस बंद करावा. बेसन पूर्ण गार होवू द्यावे. साधारण २ तास तरी साखर घालू नये. नंतर त्यात आवडीप्रमाणे सुकामेवा, वेलचीपूड आणि गरजेनुसार साखर घालावी. निट मिक्स करून लाडू वळावेत. कधी कधी लाडूचे पिठ पातळ झाल्यासारखे वाटते आणि लाडू बसतात. पण काही तासांनी लाडू वळले कि छान होतात.
तरीही बेसन गरम असतानाच थोडे दुध घातले तर शक्यतो लाडू चुकत नाहीत. त्याची कृती पुढीलप्रमाणे.
२) दुध घालून:
बेसन व्यवस्थित भाजले गेले आणि खमंग वास आला कि गॅस बंद करावा आणि दुधाचा हबका मारावा. यामुळे बेसन चांगले फुलेल (आधी फसफसेल) आणि घट्टसर होईल. हे बेसन लगेच दुसर्या भांड्यात काढून ठेवावे. साधारण २० मिनीटांनी यात सुका मेवा, वेलचीपूड आणि साखर घालून हलके मळून ठेवून द्यावे. गार झाले कि लाडू वळावेत.
७) मूग डाळीचे लाडु
साहित्य:
१ कप रवाळ मूग डाळ पिठ
१/२ कप तूप
१/२ कप पिठीसाखर
१/४ कप दूध
१ लहान चमचा वेलचीपूड
आवडीनुसार बेदाणे बदाम,पिस्ता यांचे काप
कृती:
१) मूगडाळ जराशी रवाळ दळून आणायची. तूप पातेल्यात गरम करायचे. त्यात मूगडाळीचे पिठ मध्यम आचेवर खमंग भाजायचे.
२) पिठाचा रंग बदलला आणि खमंग भाजले गेले कि त्यावर दूधाचा हबका मारावा व ढवळावे. गॅस बंद करून पातेले खाली उतरवावे.
३) भाजलेले पिठ कोमटसर झाले कि त्यात पिठीसाखर घालावी. बऱ्याचदा मिक्स करताना पिठी साखरेची गोळी होते त्याची निट काळजी घ्यावी. निट मिक्स करावे. वेलची पूड, सुकामेवा घालावा व लाडू वळावे.
८) पाकातले बेसन लाडु
साहित्य:
१ वाटी बेसन
१/२ वाटी साजूक तूप
पाऊण वाटी साखर
अर्धी वाटी पाणी
वेलची पूड
बेदाणे
कृती:
१) तूप पातेल्यात गरम करावे त्यात बेसन घालून मध्यम आचेवर खमंग भाजावे. बेसन गॅसवरून उतरवावे.
२) पाणी आणि साखर एकत्र गरम करत ठेवावे व त्याचा एकतारी पाक करावा.
३) तयार झालेला पाक गरम असतानाच भाजलेल्या बेसनात घालून ढवळावे. ढवळताना बेसनाची गोळी होण्याची शक्यता असते. त्याची काळजी घ्यावी.
४) हळूहळू पाक बेसनात मुरतो. मध्येमध्ये मिश्रण ढवळत राहावे. मिश्रणात वेलची पूड घालावी.मिश्रण थोडे घट्टसर झाले कि लाडू वळावेत. लाडू वळताना त्यावर एक एक बेदाणा लावावा.
९) रवा लाडु
साहित्य:
२ वाट्या बारीक रवा
१ वाटी पाणी
दिड वाटी साखर
१/२ वाटी साजूक तूप
१ लहान चमचा वेलची पूड
कृती:
१) प्रथम रवा मध्यम आचेवर तूपावर भाजून घ्यावा. खमंग वास आला कि गॅसवरून उतरवावा.
२) पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करून घ्यावा. [साखर वितळली आणि पाण्याला उकळी फुटली कि ३ ते ४ मिनिटात एकतरी पाक तयार होतो.]. भाजलेल्या रव्यात पाक ओतावा. गुठळ्या न होता मिक्स करावे. त्यात वेलची पूड घालावी.
३) हे रव्याचे आणि साखरेचे मिश्रण झाकून ठेवावे. तासाभरात मिश्रण आळते. मग लाडू वळावेत.
११) पान लाडु
साहित्य:
२५० ग्राम किंवा २ कप फ्रेश डेसिकेटेड कोकनट
१/२ पेक्षा थोडेसे जास्त कप कंडेन्स मिल्क
५ मोठी ताजी विड्याची पाने
१ टी स्पून बडीशेप (कुटून)
१ टी स्पून वेलचीपूड
१ टे स्पून गुलकंद किंवा १/२ टी स्पून रोझ इसेन्स
१ टी स्पून तूप
२ टे स्पून दुध
२-३ थेंब खायचा हिरवा रंग
२ टे स्पून डेसिकेटेड कोकनट पान लाडूला वरतून लावण्यासाठी
कृती:
प्रथम कंडेन्स मिल्क बनवून घ्या. बडीशेप कुटून घ्या. विड्याची पाने धुवून पुसून कोरडी करून चिरून घ्या. मिक्सरच्या भांड्यात विड्याची पाने, कंडेन्स मिल्क, दुध, हिरवा रंग व गुलकंद किंवा रोझ इसेन्स बारीक वाटून घ्या.
एका कढई मध्ये तूप गरम करून डेसिकेटेड कोकनट मंद विस्तवावर १०-१२ मिनिट भाजून घ्या. मग त्यामध्ये वाटलेले विड्याचे मिश्रण, बडीशेप, वेलचीपूड घालून परत ५ मिनिट मंद विस्तवावर भाजून घेवून कढई उतरवून मिश्रण थंड करायला ठेवा. मग त्याचे १५ लहान लहान गोळे बनवून घ्या. एका प्लेटमध्ये डेसिकेटेड कोकनट घेवून हे गोळे त्यामध्ये घोळून घ्या.
पान लाडू बनवून झाले की स्टीलच्या डब्यात भरून फ्रीजमध्ये छान थंड करायला ठेवा व जेवण झाल्यावर सर्व्ह करा.
१२) त्रिवेणी लाडु
साहित्य:
३ कप रवा
१ कप बेसन
२५० ग्राम खवा
२ कप केशर, दुध व पाणी
३ कप साखर
१/२ कप तूप
१ टी स्पून वेलचीपूड
कृती:
एका कढईमध्ये १/४ कप तूप गरम करून त्यामध्ये रवा घालून मिक्स करून, गुलाबी रंगावर, मंद विस्तवावर भाजून घ्या. मग त्यामध्ये एक कप कोमट केलेले केशर दुध घालून मिक्स करून झाकून ठेवा,
दुसऱ्या एका कढईमध्ये राहिलेले तूप घालून बेसन मिक्स करून मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्या. भाजलेले बेसन रव्यामध्ये मिक्स करा.
जाड बुडाच्या भांड्यात साखर व राहिलेले दुध मिक्स करून एक तारी पाक तयार करून त्यामध्ये खवा, भाजलेला रवा, बेसन, पिस्ता तुकडे व वेलचीपूड घालून मिक्स करून २-३ तास तसेच झाकून ठेवा. मग त्याचे एक सारखे २५ लाडू बनवून डब्यामध्ये भरून ठेवा.