वर्षातला सर्वात मोठा आणि महत्वाचा सण म्हणून दिवाळी या सणाला ओळखले जाते. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा अर्थात पडावा आणि भाऊबीज अशी पाच दिवस दिवाळी साजरी केली जाते. याच दिवसाच्या सणाला साजरे करण्यासाठी महिनाभर आधी तयारीला लागले जाते. दिवाळीतील पाचही दिवसांना मोठे महत्व आहे. प्रत्येक दिवसाची एक खासियत आहे. त्या त्या दिवसाला पौराणिक ऐतिहासिक महत्व देखील प्राप्त आहे. दिवाळीतील दुसरा महत्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी.
आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला ‘धनत्रयोदशी’ हा सण साजरा केला जातो. पुराणांमध्ये संपत्ती आणि सौभाग्याचा दिवस असा देखील या दिवसाचा उल्लेख केला असल्यामुळे याला ‘धनतेरस’ असेही म्हणतात. तसेच या दिवशी भारतीय वैद्यकशास्त्र, आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांचीही पूजा केली जाते. यंदा धनत्रयोदशी 29 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते.
धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवतेचा जन्मोत्सव देखील साजरा केला जातो. धन्वंतरीला देवांचे वैद्य मानले जाते. धनत्रयोदशीला धन्वंतरिची पूजा, आराधना केल्याने आरोग्य प्राप्ती होते. यावर्षी २९ ऑक्टोबर २०२४ ला धनतेरस आहे. आयुर्वेदाचे जनक म्हणून ओळखले जाणारे भगवान धन्वंतरी कोण होते आणि धनत्रयोदशीला त्यांची पूजा कशी करावी याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला म्हणजेच धन त्रयोदशी किंवा धनत्रयोदशीला लक्ष्मी आणि भगवान कुबेर देव यांची पूजा करण्याची परंपरा आहे, जी सर्वांना धन आणि धान्य देतात. पौराणिक कथेनुसार भगवान धन्वंतरी यांचा जन्म आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला समुद्रमंथनाच्या वेळी झाला होता. असे मानले जाते की या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने माणूस निरोगी आणि आनंदी राहतो.
भगवान धन्वंतरी कोण आहेत?
पुराणानुसार जगाचे पालनपोषण करणारे श्री हरी भगवान विष्णू यांचे एकूण २४ अवतार झाले आहेत. या २४ अवतारांपैकी भगवान धन्वंतरी हा त्यांचा १२ वा अवतार मानला जातो. पौराणिक कथेनुसार देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केले. या मंथनातून अनेक अद्भुत गोष्टी उदयास आल्या, त्यापैकी भगवान धन्वंतरी तेराव्या रत्नाच्या रूपात प्रकट झाले. असे म्हणतात की ते कलश घेऊन जन्माला आले होते, जे समुद्रमंथनातून बाहेर पडलेले १४ वे रत्न होते. समुद्रमंथनाच्या वेळी धन्वंतरी देवता अमृताचा घागर घेऊन समुद्रातून बाहेर आले होते.
जेव्हा भगवान धन्वंतरी समुद्रातून बाहेर आले तेव्हा त्यांच्या एका हातात अमृताचे भांडे आणि दुसऱ्या हातात औषधी वनस्पती होत्या. असे म्हटले जाते की, धन्वतंरी देव जे अमृताचे भांडे घेऊन आले होते त्याची मागणी देव आणि दानवांनी केली होती कारण त्यावेळी ते अमरत्वाचे वरदान देऊ शकते. भगवान धन्वंतरीचा अवतार आयुर्वेदाच्या सुरुवातीशी जोडलेला आहे. कारण त्यांनी यावेळी अनेक औषधांचे ज्ञान दिले.
धन्वंतरीच्या चार हातांपेकी एका हातात शंख, एका हातात चक्र, एका हातात जळू आणि एका हातात अमृताचा कलश आहे. धन्वंतरींचे मंदिर गुजरातमध्ये एकमेव असल्याचे सांगितले जाते. धन्वंतरींच्या हातातील शंख, चक्र महत्त्वाचे प्रतीक मानतात. भगवान धन्वंतरी यांनीच जगाच्या कल्याणासाठी अमृतसदृश औषधांचा शोध लावला होता. भगवान धन्वंतरींनी जगातील औषधांचा अभ्यास केला आणि त्याचे चांगले आणि वाईट परिणाम आयुर्वेदाच्या मूळ ग्रंथ धन्वंतरी संहितेत लिहून ठेवले आहेत. हा ग्रंथ भगवान धन्वंतरी यांनी लिहिला होता. महर्षी विश्वामित्र यांचा मुलगा सुश्रुत याने त्यांच्याकडून आयुर्वेदिक औषधाचे शिक्षण घेतले आणि आयुर्वेदाची ‘सुश्रुत संहिता’ रचली.
श्री धन्वंतरी मंत्र
– ॐ धन्वंतराये नमः
– ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराये:
– अमृतकलश हस्ताय सर्व भयविनाशाय सर्व रोगनिवारणाय
त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूप
श्री धनवंतरी स्वरूप श्री श्री श्री औषधचक्र नारायणाय नमः॥
-ॐ नमो भगवते धनवंतराय
अमृताकर्षणाय धन्वन्तराय
वेधासे सुराराधिताय धन्वंतराय
सर्व सिद्धि प्रदेय धन्वंतराय
सर्व रक्षा कारिणेय धन्वंतराय
सर्व रोग निवारिणी धन्वंतराय
सर्व देवानां हिताय धन्वंतराय
सर्व मनुष्यानाम हिताय धन्वन्तराय
सर्व भूतानाम हिताय धन्वन्तराय
सर्व लोकानाम हिताय धन्वन्तराय
सर्व सिद्धि मंत्र स्वरूपिणी
धन्वंतरी स्तोत्र
ॐ शंखं चक्रं जलौकां दधदमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्मिः
सूक्ष्मस्वच्छातिहृद्यांशुक परिविलसन्मौलिमंभोजनेत्रम।
कालाम्भोदोज्ज्वलांगं कटितटविलसच्चारूपीतांबराढ्यम
वन्दे धन्वंतरिं तं निखिलगदवनप्रौढदावाग्निलीलम।
ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराये:
अमृतकलश हस्ताय सर्व भयविनाशाय सर्व रोगनिवारणाय।
त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूप
श्री धन्वंतरि स्वरूप श्री श्री श्री औषधचक्र नारायणाय नमः।
=========
हे देखील वाचा : जाणून घ्या दिवाळीबद्दलच्या ‘या’ खास गोष्टी
=========
धनत्रयोदशी कथा
धनत्रयोदशीच्या मागे आणखी एक कथा आहे. भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मरण पावणार होता. आपल्या मुलाला जीवनातील सर्व सुख मिळावे यासाठी राजा राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथ्या दिवशी तो मृत्यूमुखी पडणार असे त्याला सांगण्यात आले होते. त्या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. संपूर्ण राजाचा महल दिव्यांनी उजळून निघतो. त्या वेळी वेगवेगळी गाणी आणि गोष्टी सांगून जागे ठेवले गेले. त्यावेळी यम राजकुमारच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीने दिपतात. त्यामुळे पुन्हा यम आपल्या यमलोकात परततो. तिने राजकुमाराचे प्राण वाचवले.म्हणूनच या दिवशी यमदीपदान केले जाते. या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करुन अपमृत्यू टळतो असा समज आहे.