१७ एप्रिल रोजी चैत्र शुक्ल नवमीला रामनवमी देशभरात साजरी होणार आहे. या रामनवमीचा उत्साह देशभरात अनोखा असला तरी प्रभू रामांचे जन्मस्थळ असलेल्या अयोध्येत रामनवमीचा उत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. याच दिवशी प्रभू रामांच्या चरणी सूर्याभिषेक करण्यात येणार आहे. त्यासाठी अयोध्येत महिनाभर आधीच तयारी सुरु झाली आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत भव्य अशा राममंदिरात प्रभू रामांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून भक्तांचा ओघ कायम आहे. दररोज दीड लाख भाविक रामलल्लांचे दर्शन घेत आहेत. याच संख्येत रामनवमीच्या विशेष मुहूर्तावर मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. (Ram Navami in Ayodhya)
राम मंदिराच्या उद्घाटनानंतरची ही पहिली रामनवमी अयोध्येत भव्य उत्साहानी साजरी होणार आहे. त्यामुळे रामनवमी जेव्हा आहे, त्या संपूर्ण आठवड्यात मंदिराचे नियोजन विशेष पद्धतीनं करण्यात येणार आहे. ज्यातून देशभरातून येणा-या लाखो भक्तांना प्रभू रामांचे दर्शन घेता येईल. यासाठी प्रशासन तयारी करत आहे. शिवाय अयोध्या आणि परिसरात भीषण गर्मी जाणवत आहे. यापासून आलेल्या भाविकांचा बचाव व्हावा म्हणून मंदिर ट्रस्टनी भक्तांना विशेष आवाहन केले आहे. (Ram Navami in Ayodhya)
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्रातर्फे १७ एप्रिल रोजी होणा-या रामनवमीसाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. रामनवमीच्या दिवशी २ लाखांहून अधिक भाविक अयोध्येत येण्याची शक्यता आहे. या सर्व भक्तांना योग्य सुखसोयी मिळतील यासाठी प्रशासनानं आत्तापासून रंगीत तालीम सुरु केली आहे. या दरम्यान येणा-या भक्तांना उष्णतेचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे भक्तांसाठी मुबलक असा स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.
त्यासाठी जागोजागी आरो बसवण्यात येत आहेत. तसेच ज्यांना शक्य असेल त्यांनी सोबत सत्तूचे पिठ ठेवावे असे आवाहनही करण्यात आले आहे. सत्तूच्या पिठाचे सेवन केल्यास शरीराल उष्णतेचा त्रास जाणवत नाही, त्यामुळे रामभक्तांनी आपली काळजी घ्यावी असे आवाहनही आहे. रामनवमीच्या निमित्तानं लाखो भक्त येणार आहेत. त्यामुळे मंदिर २२तास खुले ठेवण्यासंदर्भात विचार करण्यात येत आहे. रामलल्लांची दिवसातून चारवेळा आरती होते. त्यांची पूजा आणि वस्त्रही बदलण्यात येतात. यादरम्यान भक्तांना मंदिर परिसरात थांबवण्यात येणार आहे. मात्र भक्तांची गर्दी जास्त वाढली तर अशावेळीही मंदिर परिसरात प्रवेश देण्याबाबत विचार सुरु आहे. अधिक गर्दी होऊन चेंगराचेंगरीसारख्या घटना होऊ नयेत म्हणून वेळीच काळजी घेण्यात येत आहे. (Ram Navami in Ayodhya)
राममंदिर परिसरात सध्या हजारो भक्त येतात. येथे दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. ऋतूनुसार रामलल्लांना वेगवेगळा नैवेद्य दाखवला जातो. तसेच आठवड्यातील वेगवेगळ्या दिवसांनुसार त्याची सजावट केली जाते. 17 एप्रिलला मात्र हेच सर्व भव्य स्वरुपात असेल. रामनवमीच्या दिवशी अयोध्येत दीपावली साजरी होणार आहे. प्रभू रामांचा सूर्याभिषेक होणार आहे. हा अभूतपूर्व सोहळा बघण्यासाठी लाखो भक्त येणार आहेत.
राममंदिर उभारतांना प्रभू रामांच्या चरणी रामनवमीला सूर्याभिषेक होईल अशी रचना करण्यात आली आहे. रामनवमीच्या दुपारी सूर्याची किरणे प्रभू रामाच्या मूर्तीच्या कपाळावर पडतील. सुमारे ६ मिनिटे सूर्यकिरणांनी रामलल्लांना टिळक लावला जाईल. यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे सूर्याची किरणे गर्भगृहात जाऊन प्रभू रामाच्या मस्तकावर पडतील. यासाठी ऑप्टो मेकॅनिकल पद्धतीने सूर्यकिरण रामललाच्या मूर्तीपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. हे दृष्य पहाण्यासाठी लाखो रामभक्त आतुर झाले आहेत. त्यामुळेच अयोध्येतील हॉटेलचीही बुकींग वाढली आहे. अयोध्येमध्ये असलेली टेंटसिटीही याच दरम्यान बुक झाल्याची माहिती आहे. २२ जानेवारीपासून सुमारे १ कोटी १५ लाख भाविकांनी रामलल्लांचे दर्शन घेतले आहे. मात्र येत्या पंधरा दिवसात येणा-या भक्तांचा आकडा यापेक्षाही मोठा असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (Ram Navami in Ayodhya)
=============
हे देखील वाचा : बिघडलेली पचनसंस्था आणि कोलेस्ट्रॉलवर रामबाण उपाय आहे हिंगाचे पाणी
=============
रामनवमीसाठी प्रशासनानं सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क केल्या आहेत. राममंदिरापर्यंत पोहचण्याआधी भक्तांची काळजीपूर्वक तपासणी करण्यात येत आहे. शिवाय मंदिरात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी कायम ठेवण्यात आली आहे. या मंदिर परिसरात होणारी गर्दी पहाता, भक्तांसाठी तात्पुरती निवासस्थानेही उभारण्यात येत आहेत. तसेच शहराबाहेर गाड्यांच्या पार्कींगची व्यवस्था करण्यात येणार आहे.
सई बने