उत्तरप्रदेशमधील अयोध्या, वाराणसी आणि प्रयागराज येथे पर्यटकांचा महापूर आलेला आहे. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त या तिनही ठिकाणी मोठ्या संख्येनं भक्त दाखल झाले आहेत. त्यातही उत्तरप्रदेशमध्ये पुढच्या वर्षी महाकुंभ होत आहे. या महाकुंभ सोहळ्याची तयारीही सुरु झाली असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. आत्ताच अयोध्या मध्ये जसा दिपोत्सव साजरा झाला. तसाच दिपोत्सव वाराणसी येथेही झाला. बाबा विश्वनाथांची नगरी असलेल्या काशीमध्ये झालेला हा दिपोत्सव आता पुन्हा करण्यात येणार आहे. त्याला कारण म्हणजे, 15 नोव्हेंबर रोजी देवदिवाळी आहे. या देवदिवाळीसाठी वाराणसीमध्ये दिपोत्सव करण्यात येणार आहे. काशीमध्ये अगदी पावलापावलावर मंदिरे आहेत. या सर्व मंदिरात रोषणाई करण्यात येणार असून बाबा विश्वनाथांच्या मंदिरात विशेष लाईट शो चेही आयोजन करण्यात आले आहे. काशी विश्वनाथ मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असे सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात अहोरात्र भक्तांची ये जा चालू असते. याच भक्तांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आता लाईट शो ही करण्यात येणार आहे. (Dev Diwali 2024)
वाराणसी हे गंगा नदीच्या काठावर असलेले सर्वात जुने शहर आहे. बाबा विश्वनाथांची नगरी असलेल्या काशीमध्ये देश विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येनं येतात. काशी विश्वनाथ मंदिर हे 12 ज्योतिलिंगापैकी एक आहे. काशीमधील घाटांनाही पौराणिक महत्त्व आहे. या काशीनगरीमध्ये भगवान शंकराची आणखीही अनेक मंदिरे असून त्यामागे पौराणिक कथा आहेत. या सर्व मंदिरांमध्ये जाणा-या भक्तांना अधिक सुविधा व्हाव्यात यासाठी स्थानिक प्रशासकीय यंत्रणेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. काशीमध्ये दिवाळी जशी साजरी होते, तशी देवदिवाळी अधिक उत्सहानं साजरी होते. देवांची दिवाळी असे या दिवसाला म्हटले जाते. त्यामुळेच या देवांच्या दिवाळीसाठी काशीमधील सर्वच घाटांना दिव्यांनी सुशोभित केले जाते. यावेळीही ही देवदिवाळी याच उत्साहानं साजरी करण्यात येणार आहे. वाराणसीमधील अस्सी घाटावर पर्यटकांची मोठी गर्दी असते. या अस्सी घाटावर देवदिवाळी निमित्त दिव्यांची रोषणाई करण्यात येणार असून विशेष आरतीचेही आयोजन कऱण्यात आले आहे. येथील पहाटेची आरती प्रसिद्ध आहे. या सकाळच्या आरतीने वाराणसीमधील देवदिवाळी उत्सवाची सुरुवात होणार आहे. (Social News)
याशिवाय वाराणसीमध्ये दशाश्वमेध घाट प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी ब्रह्मदेवाने दशाश्वमेध यज्ञ केला होता. या घाटावर होणारी गंगा आरती देश विदेशात मोठी प्रसिद्ध आहे. देवदिवाळीला ही आरती अधिक भव्य स्वरुपाची होणार असून या भागामध्ये मोठी दिव्यांची आरास केली जाणार आहे. तसेच आरती नंतर लेझर शो करण्याचाही प्रशासनाचा मानस आहे. या आरतीसाठी दररोज हजारो भाविक उपस्थित असतात. मात्र देवदिवाळीला भाविकांची संख्या अधिक वाढते, या भाविकांच्या संख्येचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाचे नियोजन सुरु आहे. वाराणसी हे जसे भोलाबाबांसाठी प्रसिद्ध आहे, तसेच तेथील संकटमोचन हनुमान मंदिरासाठीही प्रसिद्ध आहे. अस्सी नदीच्या काठावरील या मंदिराला प्रत्येक भाविक भेट देतात. या मंदिराचेही सुशोभिकऱण मोठ्या वेगानं सुरु आहे. देवदिवाळी आणि पुढच्या वर्षी होत असलेल्या महाकुंभ मेळ्यासाठी या मंदिराची सजावट करण्यात येत आहे. काशीच्या उत्तरेकडील नदी जान्हवीचे दोन्ही किनारे देव दिवाळीला अप्रतिम दिव्यांनी उजळून निघणार आहेत. चंद्रकोरीच्या आकाराचे घाट दिव्यांच्या माळा घातलेले दिसतील, तर फायर शो, लेझर शो बघत भाविक भगवान शंकराच्या भजनाचा आनंद घेऊ शकरणार आहेत. (Dev Diwali 2024)
======
हे देखील वाचा : जाणून घ्या छट पूजेचे महत्व आणि माहिती
====
15 नोव्हेंबरसाठी पर्यटन विभागाने जिल्हा प्रशासन, पोलीस, पर्यटन, गाईड असोसिएशन आणि सामाजिक संस्थांसोबत अनेक बैठका घेऊन नियोजन केले आहे. देव दिवाळीचे वैभव पाहण्यासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. गंगेतील बोटी, लहान-मोठ्या बोटींची तिकिटेही यासाठी आगाऊ बुक झाली आहेत. शिवाय 14 ते 16 नोव्हेंबरपर्यंत गंगा नदीच्या काठावर असलेली हॉटेल्स, गेस्ट हाऊस, पेइंग गेस्ट हाऊस आणि स्टे होम्स पूर्ण भरली आहेत. यावेळी गंगा घाटावर होणारी आतिषबाजी विशेष ठरणार आहे. 60 ते 70 मिटर उंचीवर जाणा-या फटाक्यांचा हा शो बघण्यासाठी येणा-या पर्यटकांची सोय करण्यास पर्य़टन विभाग तत्पर आहे. (Social News)
सई बने