Home » उत्तराखंडमधील भगवान टपकेश्वर महादेव मंदिर

उत्तराखंडमधील भगवान टपकेश्वर महादेव मंदिर

by Team Gajawaja
0 comment
Tapkeshwar Mandir
Share

उत्तराखंड राज्यात सध्या निसर्गाचा कोप चालू आहे.  देवभूमी म्हणून ओळखल्या जाणा-या उत्तराखंडामध्ये जोरदार पाऊस आणि सतत होणा-या ढगफुटीमुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहेत. अनेकांची घरे तुटली आहेत.  डोंगरच्या डोंगर खाली येत आहेत.  मात्र असे असतांना या देवभूमीतील मंदिरांमधील भाविकांची गर्दी मात्र कमी होतांना दिसत नाही.  याच देवभूमीत असलेल्या एका मंदिराची चर्चा सध्या होत आहे. भारताची चांद्रयान 3 ही मोहीम सुरु झाल्यापासून या मंदिरात अखंड नामस्मरण करण्यात आले.  हे मंदिर आहे, श्री टपकेश्वर महादेव मंदिर (Tapkeshwar Mandir).  हे भगवान शंकराच्या मंदिराचे नाव थोडे वेगळे वाटेल.  त्यासाठी या मंदिराची निर्मिती कशी झाली, आणि श्री टपकेश्वराची कथा जाणून घेणे महत्त्वाचे आहे.  

भगवान शिवशंकराची अशी अनेक प्राचीन मंदिरे उत्तराखंडमध्ये आहेत.  या मंदिरांचा संबंध अगदी थेट रामायण, महाभारतापर्यंत आहे.  त्याचप्रमाणे देवभूमी उत्तराखंडची राजधानी असलेल्या डेहराडूनमध्ये भगवान शंकराचे अति प्राचीन मंदिर आहे.  या मंदिरातच अश्वत्थामाचा जन्म झाल्याची माहिती आहे.  डेहराडूनपासून सात कि.मी. अंतरावर टपकेश्वर मंदिर आहे. या मंदिरात भगवान शंकराचा कायम वावर असतो, अशी भाविकांची आस्था आहे.  त्यामुळे नदीकाठी असलेल्या या गुहेमध्ये भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची अखंड रांग लागलेली असते. कौरव आणि पांडवांचे गुरु असलेल्या आचार्य द्रोणांचा पुत्र अश्वत्थामा याचे जन्मस्थान म्हणूनही या श्री टपकेश्वर गुहेची ओळख आहे. येथेच द्रोण आणि अश्वत्थामा यांनी तपश्चर्या केली होती.  द्रोणाचार्य आणि त्यांची पत्नी  कृपी, यांनी याच गुहेमध्ये भगवान शंकराची आराधना केली होती.  या पूजेने प्रसन्न झालेल्या भगवान शंकरांनी त्यांना पुत्रप्राप्तीचे वरदान दिले. त्यानंतरच त्यांच्या घरी अश्वत्थामाचा जन्म झाल्याचे सांगितले जाते.  (Tapkeshwar Mandir)

तमसा नदीच्या काठावर असलेल्या टपकेश्वर मंदिराच्या (Tapkeshwar Mandir) आख्यायिकेनुसार ही गुहा द्रोणाचार्य यांची गुहा म्हणूनच ओळखली जायची.  गुरु द्रोण याच गुहेत रहायचे.  अश्वत्थामा याच्या जन्मानंतर त्याच्यासाठी दूधही या दांम्पत्याला घेता येत नव्हते.  तेव्हा द्रोणाचार्यांनी भगवान शंकराकडे प्रार्थना केली. भगवान शंकरानं प्रसन्न होऊन गुहेच्या छतावर गाईची कासे केली त्यातून अखंड दुधाचा प्रवाह चालू झाला. कलियुगात या ठिकाणी दुधाऐवजी पाण्याचा अखंड प्रवाह चालू झाला.  त्याच्याखाली भगवान शंकराचे स्थान निर्माण झाले.  त्यालाच  श्री टपकेश्वर महादेव मंदिर असे नाव पडले.  येथे भगवान शंकराकडून अश्वत्थामाला अमरत्वाचे वरदान मिळाल्याचेही मानले जाते. अश्वत्थामाची गुहा देखील या गुहेला लागूनच आहे.  या गुहेजवळ अश्वत्थामाचा पुतळा बसवण्यात आला आहे.  टपकेश्वर महादेवाची गुहा अत्यंत पवित्र मानली जाते.  महादेवाने स्वतः आचार्य द्रोण यांना याच जागी शस्त्रास्त्रांचे ज्ञान आणि धनुर्विद्येचे पूर्ण ज्ञान दिल्याचे सांगितले जाते.  

टपकेश्वर शिवमंदिर (Tapkeshwar Mandir) हे तमसा नदीजवळ असलेल्या एका नैसर्गिक गुहेमध्ये आहे.  महाभारताच्या आधीपासून असलेले हे मंदिर नैसर्गिकरित्या बनवलेले आहे.  गुरु द्रोणाचार्यांनी येथे तपश्चर्या केल्यामुळे ही गुहा द्रोण गुंफाम्हणूनही प्रसिद्ध आहे.  या गुहेच्या आत एक शिवलिंग आहे.  या शिवलिंगावर अखंड असा पाण्याचा अभिषेक चालू असतो.  नैसर्गिकरित्या आणि नियमितपणे चालू असलेला हा अभिषक अगदी उन्हाळ्यातही थांबत नाही.  हे पाणी कुठून येते हे जाणण्याचा अनेकवेळा प्रयत्न करण्यात आला.  मात्र या अखंड टपकणा-या पाण्याचा मुळ स्त्रोत अजूनही सापडलेला नाही.  या श्री टपकेश्वर मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे.  मुळात सतत दुधडी भरुन वाहणारी तमसा  नदी,  आणि आसपासच्या डोंगरावरुन वाहणारे धबधबे हे बघण्यासाठी अनेक पर्यटक या भागाला येतात.

=========

हे देखील वाचा :दोन्ही धर्मियांना बांधून ठेवणारे ‘हे’ मंदिर

=========

श्री टपकेश्वर महादेवाभोवती (Tapkeshwar Mandir) 5151 रुद्राक्षांची माळा घालण्यात आली आहे.  सध्या श्रावण महिना चालू असल्यामुळे या श्री टपकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी वाढली आहे.  दरवर्षी या मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते.  मात्र यावर्षी पावसानं घातलेला धुमाकूळ पाहता यात्रेचे स्वरुप भव्य नाही.  श्री टपकेश्वर महादेव मंदिर सकाळी 9 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत खुले असते.  काही दिवसांपूर्वीच या मंदिराची एक भिंत पडून मंदिरात 700 भाविक अडकल्याची घटना घडली होती.  पण या सर्व भक्तांना कुठलीही दुखापत झाली नाही.  त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली.  त्यामुळेच येथील स्थानिकांची टपकेश्वर महादेवावरची श्रद्धा अधिक वाढली आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.