दमास्कस किंवा दमिश्क या शहराचे नाव सध्या चर्चेत आहे. दमास्कस ही सिरिया या देशाची राजधानी आहे. या ऐतिहासीक शहराला आता रक्तरंजीत स्वरुप आले आहे. बशर अल-असद यांची जुलमी राजवट दूर करुन आता तिथे बंडखोर गटांच्या नेत्यांचे राज्य सुरु होणार आहे. गेली पन्नास वर्ष बशर अल असद यांच्या कुटुंबानं या शहराचं आणि संपूर्ण सिरियाचे शोषण केले आहे. आज जरी दमस्कस शहरात अशांतता असली तरी हे जगातील मोजक्या जुन्या शहरांमध्ये गणले जाते. या दमस्कसमध्ये अनेक वैभवशाली इमारती आहेत, धार्मिक वास्तू आहेत, ज्यांची जोपासना जागतिक संपत्ती म्हणून केली जाते. लेबनॉनच्या सीमेवरील हे शहर एकेकाळी अरब संस्कृतीचे वैभवशाली प्रतिक मानले जात असे. ईसापूर्व इतिहास असलेल्या दमस्कसनं जगाला मोठी देणगी दिली आहे, ती म्हणजे दमिश्क नावाच्या अप्रतिम गुलाबाची. गुलाबी रंगाचा आणि मंद सुवासाचा हा गुलाब दमस्कस शहराची ओळख होता आणि आहेही. बर्दा नदीच्या दक्षिण किना-यावर वसलेल्या या शहरावर अनेक संस्कृतींचा प्रभाव राहिला आहे. तिथून त्या शहराची वास्तूकला उदयास आली. त्यात या सर्व संस्कृतींचा मिलाफ आहे. या सर्वात एकच राहिला तो दमास्कसच्या गुलाबाचा दर्जा. (Damascus)
दमास्कस आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रांतात या गुलाबाच्या बागा आहेत. अगदी घराच्या सुशोभिकरणासाठी वा रस्त्याच्या बाजुला सुभोशित करण्यासाठी या दमिश्क गुलाबाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. दमास्कस मधील नागरिकांचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाणा-या या दमिश्क गुलाबापासून अत्तर आणि गुलाबजल तयार होते, त्याची जगभरात मोठी मागणीही आहे. अलिकडील काळात भारतातील उत्तराखंडमध्ये या दमिश्क गुलाबाची लागवड मोठ्याप्रमाणात करण्यात येत असून त्यावर आधारीत उत्पादनेही घेण्यात येत आहेत. सध्या सिरिया या देशाकडे जगाचे लक्ष लागले आहे. सिरियामधील बशर अल असदची सत्ता उलथवून टाकण्यात आली आहे. बंडखोर गटांचे वर्चस्व आता या सिरियामध्ये आहे. सिरियाची राजधानी असलेल्या दमास्कस शहरावर कोणाचा ताबा असावा यासाठी मोठ्या आंतराष्ट्रीय घडामोडी चालू आहेत. रशिया, इस्राइल, टर्की, अमेरिका, इराण सारख्या देशांची यात मोठी भूमिका आहे. दुसरीकडे बशर अल असदच्या अत्याचाराच्या एकएक कहाण्या बाहेर येत आहेत. त्याचे भूमिगत सुरंग हे सध्या प्रेक्षणिय स्थान बनले आहे. शिवाय त्यानं उभारलेले तुरुंग आणि केलेली हत्याकांडे ही अंगावर काटा आणत आहेत. या सर्वांसोबत आणखी एक गोष्टीकडे जगाचे लक्ष आहे, ते म्हणजे, सिरियाच्या राजधानीमधील ऐतिहासीक वास्तू. (International News)
सिरियाची राजधानी असेलेल्या दमास्कस शहराला अतिशय जुना असा इतिहास आहे. अगदी बॅबिलोनिया संस्कृतीच्या खाणाखुणाही या शहरात दिसतात. पर्शियन, मेक्सिकन, अँटिगोनिड, टॉलेमिक, इटुआ, रोमन, रशिदुन खलीफा, अब्बीसीद खिलाफत, इख्शीदाद राजवंश, बुरीड राजवंश, मंगोल साम्राज्य, मामलुक सल्तनत, ऑट्टोमन साम्राज्य, फ्रेंच अशा अनेक शासकांनी या शहरावर राज्य केले आहे. त्यांच्या काळात दमास्कसमध्ये अनेक पुरातन वास्तू उभारण्यात आल्या. या वास्तूंमधील अजम पॅलेस, ज्युपिटर टेंपल ही स्थाने जागतिक संपत्ती म्हणून जतन करण्यात येत आहेत. तुर्कमेन सरदारांनी बांधलेला दमास्कस किल्ला, 13 व्या शतकात स्थापन झालेला अल-अदिलिया मदरसाही प्राचीन वारसा मानला जातो. याशिवाय दमास्कसमध्ये अनेक मशिदी असून या मशिदींची जापोसना कशी होणार याची काळजी तज्ञांना आहे. (Damascus)
========
हे देखील वाचा : सिरियाचा नवा हुकुमशहा !
========
या सर्वात दमास्कसचे प्रमुख वैशिष्ट असलेल्या दमिश्क गुलाबाची लाली तर या अशांत वातावरणात हरवली जाणार नाही ना, याचीही काळजी दमास्कस मधील शेतक-यांना आहे. दमास्कस हे शहर या दमिश्क नावाच्या गुलाबाचे उगमस्थान मानले जाते. येथूनच या गुलाबाची जात जगभर पसरली आणि सिरियामधील अस्थिर वातावरणाचा परिणामामुळे तिथेच त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दमिश्क गुलाबाची लागवड बल्गेरिया, तुर्की, फ्रान्स, इटली, मोरोक्को, रशिया आणि भारत यांसारख्या देशांमध्ये केली जाते. दमिश्क गुलाब तेल 10 ते 12 लाख रुपये प्रतिकिलो दराने विकले जाते. दमिश्क गुलाबापासून काढलेले गुलाबाचे पाणी परफ्यूम आणि परफ्यूम बनवण्यासाठी वापरले जाते. दमास्कस शहराच्या परिसरातील शेतात या गुलाबाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. दमास्कसमध्ये घरोघरी या गुलाबाचे जल औषधासारखे घेतले जाते. मात्र अलिकडील काळात दमास्कसमधील या गुलाब शेतीला तेथील अस्थिर परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. अनेक शेतक-यांची पुढची पिढी ही शेतीकडे न वळता बंडखोर गटात सैनिक म्हणून सामिल झाली आहे. गुलाबाच्या शेतीचे प्रमाण दमास्कासमध्ये एवढे घटले की या भागात होणारे गुलाब महोत्सव रद्द करण्यात येत आहेत. दमास्कसमधील गुलाब हा फक्त उत्पादनासाठी नाही, तर तो तेथील कुटुंबाचा एक भाग आहे, हे कुटुंब पुन्हा भरभराटीस यावे यासाठी आता येथील नागरिक प्रार्थना करीत आहेत. (International News)
सई बने