Home » CRPC – ‘या’ कारणांसाठी पोलीस स्त्री आरोपीला संध्याकाळच्या वेळी अटक करू शकत नाहीत

CRPC – ‘या’ कारणांसाठी पोलीस स्त्री आरोपीला संध्याकाळच्या वेळी अटक करू शकत नाहीत

by Team Gajawaja
0 comment
CRPC
Share

आपण अनेकदा ऐकलं/ वाचलं असेल की, संध्याकाळ उलटून गेल्यामुळे अथवा रात्र असल्यामुळे अमुक एका संशयित महिलेला दुसऱ्या दिवशी अटक करण्यात येईल. हे असं का? संध्याकाळी महिलांना अटक का करत नाहीत? याचं उत्तर आहे आपल्या कायद्यामध्ये. हो! कायद्यानुसार महिलांना संध्याकाळनंतर अटक करता येत नाही. 

फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७६ (CRPC) अन्वये स्त्रियांना सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी अटक करता येत नाही. पण असं का? यामागे नक्की कारण काय आहे? आरोपीच्या बाबतीत स्त्री-पुरुष भेद कशासाठी? आरोपीला कसलं आलंय ‘स्त्री दाक्षिण्य’? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील. 

फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७६ (CRPC) कलम ४६ मध्ये संशयिताला/ आरोपीला अटक करण्यासंबंधित कार्यवाही नमूद करण्यात आली आहे. कलम ४६ नुसार, “अटक म्हणजे एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेण्याच्या दृष्टीकोनातून प्रत्यक्ष जप्ती किंवा त्याच्या शरीराला स्पर्श करणे.”

अटक करण्याचे शब्द उच्चारणे म्हणजे अटक नाही, जोपर्यंत अटक करण्याची मागणी केलेली व्यक्ती या प्रक्रियेस सादर होत नाही आणि अटक करणार्‍या अधिकाऱ्यासोबत जात नाही तोपर्यंत अटकेची प्रक्रिया पूर्ण होत नाही. 

भारतामध्ये समानतेसोबत महिला सक्षमीकरण हा मुद्दाही अत्यंत महत्वाचा मुद्दा मानला जातो. फौजदारी प्रक्रियेमध्ये ‘अटक’ हा पहिला टप्पा आहे. यामध्ये आरोपीला अटक करून त्याच्याकडून सत्य वदवून घेतलं जातं. मात्र सत्य वदवून घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले जातात. आरोपीची तपासणी /चाचणी निष्पक्षपणे करायची असेल, तर त्याची सुरक्षा जपणं अत्यंत आवश्यक आहे. 

आरोपी म्हणजे गुन्हेगार नाही. जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला गुन्हेगार म्हणता येत नाही. एखाद्या स्त्रीने केलेला कितीही गंभीर गुन्हा केलेला असला तरीही जोपर्यंत तो सिद्ध होत नाही तोपर्यंत कायद्याने तिला गुन्हेगार म्हणता येत नाही. 

====

हे देखील वाचा: पावतीवर ‘नो एक्सचेंज, नो रिटर्न’ लिहिलेले असले तरीही ग्राहकाला आहे वस्तू परत करण्याचा अधिकार!

====

स्त्री जरी आरोपी असली तरी तिच्या शिलाचं रक्षण करणं ही कायद्याची जबाबदारी आहे. या गोष्टीला दुर्लक्षित करता येत नाही. अटक झाल्यानंतर गुन्हा वदवून घेताना चुकूनही तिच्याबाबतीत अन्याय व्हायला नको, तसंच चौकशीच्या वेळीच तिच्या बाबतीत काहीही चुकीचं घडायला नको. महिलांवर होणाऱ्या संभाव्य दबावतंत्राचा गंभीरपणे विचार करूनच हा नियम तयार करण्यात आला आहे. त्यामुळेच विधिमंडळाने फौजदारी प्रक्रिया (सुधारणा) अधिनियम, २००५ (CRPC) कलम ४६ मध्ये उप-कलम (४) जोडले. यानुसार अपरिहार्य परिस्थिती वगळता सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी महिलांना अटक करता येत नाही. 

अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय? हे मात्र संहितेत नमूद करण्यात आलेलं नाही. तसंच अपवादात्मक परिस्थिती अस्तित्वात होती का, हे तपासण्यासाठीही निश्चित असा नियम नमूद करण्यात आलेला नाही. परंतु, सामान्यतः गंभीर गुन्ह्यामधली आरोपी किंवा संशयित स्त्री, पुरावे शोधण्यासाठी जिची अटक आवश्यक आहे अशी स्त्री, संशयित स्त्री राज्याबाहेर अथवा देशाबाहेर जायची भीती असल्यास, अशा परिस्थितीला अपवादात्मक परिस्थिती समजली जाते. 

====

हे देखील वाचा: Complaint against Builder: बिल्डरविरुद्ध ग्राहक मंचात तक्रार कशी दाखल कराल?

===

अपवादात्मक परिस्थिती असेल तेव्हा महिला पोलीस अधिकाऱ्याच्या लेखी अहवालाच्या आधारे, संबधीत न्यायदंडाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेऊन महिलांना अटक करता येते. 

“हजार गुन्हेगार सुटले तरी चालतील, परंतु एकही निरपराध्याला शिक्षा होता काम नये”,  या मूलभूत तत्वाचे पालन न्यायव्यवस्थेमध्ये केले जाते. त्यामुळे फौजदारी प्रक्रिया (सुधारणा) अधिनियम, २००५ (CRPC) मधील ही तरतूद पटत असली काय किंवा नसली काय, ती सामाजिक न्याय व्यवस्थेचा विचार करूनच तयार करण्यात आली आहे, ही गोष्ट नाकारता येणार नाही. 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.