Home » चीनची आण्विक पाणबुडी बुडाली !

चीनची आण्विक पाणबुडी बुडाली !

by Team Gajawaja
0 comment
China Nuclear Submarine
Share

सर्व जगावर आपलं साम्राज्य हवं हे स्वप्न बघणा-या चीनला सर्वात मोठा धक्का बसला आहे. जगभरात समुद्रावर अमेरिकेची सत्ता आहे, यावर मात करण्यासाठी चीन आधुनिक शस्त्रांस्त्रांची निर्मिती करत होता. त्यातच चीननं टाइप 041 या वर्गाची आधुनिक पाणबुडी तयार करुन ती वुहानजवळील वुचांग शिपयार्डमध्ये तैनात केली होती. कोरानाचा उगम जिथे झाला तेच हे वुहान शहर आहे. चीननं या आधुनिक पाणबुडीला आपल्या नौदलात सामील करुन घेतले. या पाणबुडीच्या सहाय्यानं चीननं अमेरिकेला धमक्याही देऊन झाल्या. तसेच चीनच्या भोवती असलेल्या देशांनाही या आण्विक पाणबुडीची धमकी मिळाली. चीनचा मनसुबा जाणून आसपासच्या लहान देशांमध्ये या पाणबुडीची दहशत होती. पण ज्या पाणबुडीच्या जीवावर चीन अन्य देशांना धमकावात होता, त्या पाणबुडीचे तंत्रज्ञान आणि बनावट अस्सल चिनी पद्धतीची निघाली. (China Nuclear Submarine)

अर्थात आपल्या बाजारात जसे चीनमधील वस्तुंची गॅरेटी दिली जात नाही, त्याचप्रकारची ही आण्विक पाणबुडी निघाली. कारण ज्या भागात ही आण्विक पाणबुडी तैनात होती, त्या भागाचे सॅटेलाइट फोटो अमेरिकेच्या माध्यमातून घेण्यात आले, तेव्हा या पाणबुडीनं समुद्रतळ गाठल्याचे सिद्ध झाले. ही पाणबुडी बुडाली आहे. यामुळे तज्ज्ञांनी चीनच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. फक्त आण्विक पाणबुडीच नाही, तर चिनी शस्त्रांस्त्रांच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहेत. चीननं हा पाणबुडीचा अपघात लपवण्याचा प्रयत्न केला तरी अमेरिकेनं थेट फोटो जाहीर करुन चीनची पोल खोलली आहे. मात्र यातून एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे या पाणबुडीवर असलेल्या आण्विक साहित्याचे नेमके काय झाले. हे साहित्य समुद्राच्या पाण्यात मिसळल्यास त्यापासून संपूर्ण निसर्गाला मोठा धोका निर्माण होणार आहे. (International News)

चीन ज्या पाणबुडीच्या जोरावर अमेरिकेला धमकावत होता, ती सर्वात आधुनिक आणि धोकादायक आण्विक पाणबुडी समुद्रात बुडाली आहे. हा अपघात गेल्या मे किंवा जूनमध्ये वुहानजवळील वुचांग शिपयार्डमध्ये झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पाणबुडी बुडण्याचे कारण स्पष्ट नसले तरी चीननं ही गोष्ट लपवण्याचा मोठा प्रयत्न केला. या पाणबुडीसह अनेक तंत्रज्ञ आणि कर्मचारीही होते, त्यांचे काय झाले, हा प्रश्नही आहे. शिवाय अपघाताच्या वेळी पाणबुडीमध्ये आण्विक साहित्य असण्याची शक्यता आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. कारण या पाणबुडीची निर्मिती चीननं आपल्या सभोवती असलेल्या देशांना धमकवण्यासाठी केली होती. तिच बुडल्यानं चीनच्या महत्त्वाकांक्षेला मोठा धक्का बसला आहे. अलीकडेच चीनने प्रशांत महासागरात आपल्या इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. चीनच्या या प्रगतीचे कौतुक होत असतांनाच आण्विक पाणबुडीची बातमी पुढे आली. (China Nuclear Submarine)

ही पाणबुडी वुहान शहराजवळील शिपयार्डमध्ये होती. 10 मार्च रोजी मॅक्सर टेक्नॉलॉजीजने घेतलेल्या उपग्रह फोटोमध्ये झोउ-क्लास पाणबुडी दिसत होती. पण जूनमध्ये घेण्यात आलेल्या फोटोत पाणबुडी गायब असल्याचे दिसून आले. त्यानंतर घेतलेल्या शोधानंतर पाणबुडी बुडाल्याचे स्पष्ट झाले. या पाणबुडीची निर्मिती केल्यापासून चीन तैवान, फिलीपिन्स, मालदीव, श्रीलंका, बांगलादेश आणि म्यानमार यांसारख्या देशांना धमकावत होता. सुमारे चार महिन्यांपूर्वी ही अद्ययावर पाणबुडी समुद्रात बुडाल्यामुळे चीनी अण्वस्त्र मोहिमेलाही मोठा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. बुडणा-या या पाणबुडीला वाचवण्यासाठी चीननं मोठ्या क्रेनचाही वापर केल्याचे छायाचित्रात दिसत आहे. या शिपयार्डमध्ये अचानक 4 क्रेन आल्या होत्या, असे सॅटेलाइट छायाचित्रांमध्ये दिसून आले. ही सर्व छायाचित्रे 12 जून ते 17 जून दरम्यानची आहेत. (International News)

===========

हे देखील वाचा : वयोवृद्ध चीन

==========

मात्र हे सर्व प्रयत्न पाणबुडीला वाचवण्यासाठी कमी पडले आहेत. आता ही आण्विक पाणबुडी समुद्रात सामावल्यामुळे त्यातील आण्विक सामुग्रीबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी त्या भागातील पाण्याचे नमुने घेण्यात येत असून रेडिएशनचा किती फैलाव झाला आहे, याचा अभ्यास करण्यात येत आहे. अर्थात यासंदर्भातील सर्वच माहिती चीननं गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चिनी अधिकारी या घटनेची संपूर्ण माहिती देतील अशी शक्यता कमी आहे. सध्या चीनकडे 6 अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्र पाणबुड्या आणि 48 डिझेलवर चालणाऱ्या पाणबुड्या आहेत. 2035 पर्यंत 80 पाणबुड्या तयार करण्याचा चीनचा मानस आहे. पण या दुर्घटनेनंतर या सर्वच पाणबुड्यांच्या क्षमतांबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. (China Nuclear Submarine)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.