गेल्या काही वर्षापासून अमेरिकेवर मात करण्यासाठी चीन तयारी करत आहे. त्यासाठी चीनमध्ये उद्योगाची उभारणी सुरु झाली. निर्यात वाढवली गेली. शिवाय परदेशी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात सवलती देऊन उद्योगाची उभारणी करण्यात आली. यासाठी आवश्यक असे मनुष्यबळ त्या कंपन्यांना पुरवण्यात आले. एकीकडे आर्थिक नियोजन चालू असतांनाच चीनने अनेक देशांना कर्ज देऊन आपल्या अंकीत करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यात श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश सारखे देश फसले. चीनच्या या आक्रमक भूमिकेमुळे या देशांमध्ये उठाव झाले. त्यात चीन आपला फायदा शोधत असतांना इकडे चीनमध्येच स्वतःची आर्थिक घडी पार विस्कटण्याच्या वाटेवर आहे. याचे परिणाम गेल्या महिन्यापासून दिसू लागले आहेत. मध्यंतरी भारतीय शेअर बाजारातून परकीय कंपन्यांनी आपली गुंतवणूक मागे घेत चीनच्या शेअर बाजारात गुंतवणूक केली. यामुळे भारतीय शेअर बाजार कोसळेल अशी भीती होती. मात्र भारतातील मॅच्युअल फंडाच्या गुंतवणुकीनं शेअर बाजाराला उभारी मिळाली. (China Financial Crisis)
इकडे ज्या परकीय गुंतवणूकदारांनी चीनच्या शेअर बाजारात गुंतवणूक केली, त्यांच्यावर डोक्याला हात मारायची वेळ आली आहे. कारण चीनच्या अर्थव्यस्थेचा फुगा कधीही फुटण्याच्या बेतावर आहे. अनेक आघाड्यांवर चीनची गुंतवणूक आहे. मात्र त्यातून योग्य प्रमाणात परतावा आलेला नाही. त्यामुळे चीनमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक तंगी निर्माण झाली आहे. ही बातमी पुढे आली म्हणून की काय चीनमधील अर्थतज्ञांना सोशल मिडियावर व्यक्त होण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. चीनमधील काही मान्यवर कंपन्यांचे प्रमुख आणि अर्थतज्ञही गायब असल्याची माहिती आहे. एकूण चीनचा फसवा आर्थिक डोलारा कधीही कोसळण्याच्या बेतात आहे. अर्थातच या सगळ्याचा चीनवर अवलंबून असलेल्या देशांवरही परिणाम होणार आहे. (International News)
चीन हा देश अनेक आर्थिक आघाड्यांवर लढा देत आहे. अन्य देशांना मुबलक कर्ज देणारा चीन स्वतःच्या नागरिकांना मुलभूत सुविधा योग्य प्रमाणात देऊ शकत नाही, हे स्पष्ट झालं आहे. या देशाचे सरकारी कर्ज प्रमाण 86% वर पोहोचले आहे. आपल्या देशातील हा तोटा झाकण्यासाठी आता चीन सरकार पुन्हा कामाला लागले आहे. त्यांनी त्यासाठी थेट भारतावर निशाणा साधला. भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी चीनने एक मोठे पॅकेज जाहीर केले. या रिलीफ पॅकेजमुळे चिनी बाजारात तेजी आली. ही तेजी पाहून बरेच विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून सातत्याने पैसे काढू लागले. (China Financial Crisis)
भारतीय बाजारात यामुळे थोडी पडझड झाली. मात्र मॅच्युअल फंडाचे पैसे बाजारात आल्यानं बाजार लगेच सावरला. यामुळेच भारतीय शेअर बाजाराचा अभ्यास करणा-या परकीय अभ्यासकांनी भारतीय बाजाराला दीर्घकालीन नफ्यासाठी सर्वाधिक पसंतीची बाजारपेठ असल्याचे सांगितले आहे. इकडे चीनमध्ये सेंट्रल बॅंक ऑफ चीनने दोन नवीन निधी योजना लाँच केल्या आहेत. त्या अंतर्गत सुमारे 9.36 लाख कोटी रुपये भांडवली बाजारात आणले जाणार आहेत. शिवाय चीनच्या सेंट्रल बँक, पीपल्स बँक ऑफ चायनाने बनवलेल्या नवीन आर्थिक धोरणांतर्गत ही गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे चीनच्या बाजारातील घसरण थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आणि परकीय गुंतवणूक चीनकडे वळवण्याचा हा प्रयत्न असेल. (International News)
चीननं आपली आर्थिक दिवाळखोरी लपवण्यासाठी हे उपाय केल्याचे तज्ञांचे मत आहे. कारण चीन सरकारची गंगाजळी पैशाअभावी खाली झाली आहे. सरकारला नवा पैसा उभा कऱण्यासाठी परदेशी गुंतवणूकदारांची मदत लागणार आहे. ते पुन्हा चीनमध्ये येण्यासाठी त्यांना आर्थिक सुरक्षतेचे वचन द्यावे लागणार आहे. कारण सध्या चीनमध्ये 1990 च्या दशकापासून जपानची अर्थव्यवस्था ज्या परिस्थितीत अडकली आहे तीच परिस्थिती आहे. अमेरिकेसोबत सुरू असलेल्या तणावामुळे चीनची अवस्था बिकट झाली आहे. चीनमध्ये परकीय गुंतवणुकीतून जे मोठे कारखाने चालू झाले होते, ते बंद पडल्यानं रोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच गेल्या तीन ते चार वर्षापासून चीनचे रिअल इस्टेट क्षेत्र गंभीर संकटात आहे. (China Financial Crisis)
======
हे देखील वाचा : अणुहल्ल्याच्या धमकीसह किम जोंगची युद्धात एन्ट्री !
======
इतके की चीनच्या अनेक भागात भुतानी बिल्डींग तयार झाल्या आहेत. या बिल्डीगमध्ये ज्यांनी पैसे गुंतवले होते, त्यांना पूर्ण घराचे पैसे देणे शक्य होत नाही, त्यामुळे अनेक वर्षापासून ही घरे मोकळीच आहेत. अशा इमारती चीनच्या प्रत्येक प्रांतात आहेत. दुसरीकडे चीनच्या निर्यातधोरणालाही मोठा फटका बसला आहे. चीनची मुख्य बाजारपेठ आशिया खंड आहे. मात्र यामध्ये आता चीनी वस्तुंना हवी तेवढी मागणी नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चालू असलेले कारखाने बंद होत आहेत. अशातच परकीय गुंतवणुकीमुळे चीन सरकारची गंगाजळी खाली झाली आहे. या सर्वांच परिणाम म्हणजे, चीनच्या उंबरठ्यावर आर्थिक वादळ केव्हाही धडक देणार आहे. (International News)
सई बने