हिंदू पौराणिक ग्रंथानुसार १७ जुलैपासून चातुर्मासाची सुरुवात झाली आहे. आता पुढचे ११८ दिवस, म्हणजेच, चार महिने हा चातुर्मास रहाणार आहे. देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते. या एकादशीपासून भगवान विष्णू ४ महिने विश्रांतीसाठी क्षीरसागरात जात असल्याचा उल्लेख पौराणि ग्रंथात आहे. अशावेळी भगवान शिवशंकर भक्तांच्या रक्षणासाठी पुढे येतात. भगवान विष्णुंची ही योगनिद्रा आणि चातुर्मास या काळासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. (Chaturmasa)
पुढचे चार महिने हे नियम पाळले, तर भाविकांना त्याची पावती नक्की मिळते, हे पौराणिक ग्रंथांमधून सांगण्यात आले आहे. हे सर्व नियम काळजीपूर्वक वाचले तर जाणवते की, या सर्वांमागे एक शास्त्रीय कारणही होते. हे चार महिने पावसाळ्याचे असतात, अशावेळी पचनक्रीया थंडावलेली असते. अशात पालेभाज्या, मांस, मद्य यांचे सेवन केले तर आरोग्याला हानी होते. ती होऊ नये असे वाटत असेल तर चातुर्मास म्हणजे काय हे जाणून घ्यायला हवेच. शिवाय चातुर्मासाचे नियम काय आहेत, याचीही माहिती घ्यायला हवी.
हिंदू धर्मग्रंथांमध्ये चातुर्मासाचे विशेष महत्त्व आहे. देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी क्षीरसागरमध्ये योग निद्रामध्ये जातात. प्रत्यक्ष भगवान विष्णूच योगनिद्रेमध्ये जात असल्यानं पुढचे चार महिने कोणतेही शुभ कार्य करता येत नाहीत. सकळांचा पालनकर्ता म्हणून भगवान विष्णुचा उल्लेख करण्यात येतो. भगवान विष्णुच जर नसेल तर चार महिने भाविकांच्या मदतीला कोण येतो आणि या चार महिन्यात कोणाची पुजा करायची हा प्रश्न पडतो. तर या चार महिन्यात सर्व भाविकांच्या हाकेला ओ देण्याची जबाबदरी भगवान शिवशंकर घेतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा चातुर्मास १२ नोव्हेंबर रोजी देवूथनी एकादशीला संपणार आहे. (Chaturmasa)
देवूथनी एकादशीलाच दिवशी भगवान विष्णूंसोबत इतर देवी-देवताही योगनिद्रातून बाहेर पडणार आहेत. त्यामुळेच या सर्व दिवसांत विवाह, मुंडन, गृहप्रवेश ही शुभकार्य करु नयेत असा उल्लेख पौराणिक ग्रंथांमध्ये आहे. पण या काळात पूजा अर्चना जरुन कराव्यात असेही सुचवण्यात आले आहे. चातुर्मासात शिव परिवाराची विशेष पूजा केली जाते. असे मानले जाते की, या चार महिन्यांत भगवान शिव सृष्टीवर नियंत्रण ठेवतात. या चातुर्मासात पहिला महिना येतो तो श्रावण. श्रावण हा भगवान शंकरांचा आवडता महिना आहे.
श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करण्याचे आवाहन करण्यात येते. या महिन्यात हरतालिका तीज, हरियाली तीज, कजरी तीज यांसारखे व्रत आणि सण येतात. यावेळी भगवान शंकराचीच पुजा करण्यात येते. ज्योतिषशास्त्रामध्येही चातुर्मासाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. या महिन्यात जप, तप आणि उपासना करण्याचे सांगण्यात आले आहे. भगवान विष्णूसह माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात असेही सांगण्यात आले आहे. (Chaturmasa)
चातुर्मासाच जप तपाचे महत्त्व सांगण्यात आले असले तरी त्यामागे शास्त्रीय कारण आहे. चातुर्मासात सात्विक अन्न खावे असे सागण्यात आले आहे. चातुर्मासात तेल, दूध, दही, साखर, मिठाई, लोणची, पालेभाज्या यापासून पदार्थ आहारात जास्त समाविष्ठ करु नयेत असे सांगितले आहे. शिवाय मसालेदार अन्न, मांस, दारू, सुपारी इत्यादींचे सेवन टाळावे, असेही सांगितलेले आहे. कारण या ११८ दिवसात पावसाचे आगमन झालेले असतात. या काळात मनुष्याची पचनक्रीयाही मंदावलेली असते. तसेच याच काळात साथींच्या रोगाचे आगमनही झालेले असते.
===========================
हे देखील वाचा : जाणून घ्या आषाढी एकादशी महात्म्य आणि व्रत
============================
यात अधिक तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ले तर त्याचा आरोग्यावर परिमाण होऊ शकतो. त्याचाच आधार घेत, या महिन्यात सात्विक आहार करण्यास सांगितलेले आहे. या काळात पालेभाज्यांपासून दूर रहाण्यास सांगितले आहे. त्यामागेही तेच शास्त्र असण्याची शक्यता आहे. कारण पालेभाज्यांमध्ये पावसाळ्यात बारीक किडे किटक असतात. अजाणतेमुळे हे किडे पोटात गेले तर त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळेच चातुर्मासाला आरोग्याचा काळ म्हणतात. या चार महिन्याच्या काळात सकस आहार घेण्याचा आग्रह करण्यात आला आहे. (Chaturmasa)
सई बने