भारतीय राजकारण हे जगातील सर्वात जास्त चर्चेत असणारे आणि गाजणारे राजकारण आहे. त्यातही आपले राजकीय नेते नेहमीच लोकांच्या चर्चेचा विषय असतो. आपण कितीही काहीही म्हटले तरी आपल्याला कोणता तरी एक नेता नक्कीच आवडत असतो आणि आपण त्याला अप्रत्यक्षपणे का होईना पण पाठिंबा देत असतो.
भारताच्या आजवरच्या राजकीय इतिहासात अनेक दिग्गज आणि प्रतिभावान राजकीय नेते होऊन गेले आहे. या नेत्यांनी देशाला जागतिक पातळीवर अग्रेसर होण्यासाठी आणि देशाचा विकास होण्यासाठी आपले अमूल्य योगदान दिले. अशाच एका महान नेत्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. भारतीय राजकारणातील अत्यंत साधे आणि सुस्वभावी असे व्यक्तिमत्त्व म्हणजे मनोहर पर्रिकर. आज मनोहर पर्रिकर यांची ६९ वी जयंती.
गोव्याचे मुख्यमंत्री ते भारताचे संरक्षण मंत्री आदी अनेक महत्वाची पदे पर्रिकरांनी त्यांच्या कार्यकाळात भूषवली. मनोहर पर्रिकर हे असे व्यक्तीमत्व होते ज्यांची ओळखच साधेपणा ही होती. ते चार वेळा गोव्याचे मुख्यमंत्री होते. मात्र, चारही वेळा त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवूनही त्यांनी कुठल्याही व्हीआयपी सुविधांचा कधीही उपभोग घेतला नाही.
मनोहर पर्रिकर हे जितके साधे होते, तितकेच चाणाक्ष होते. ते भारताचे पहिले आयआयटी झालेले मुख्यमंत्री होते. मनोहर पर्रिकरांच्या कार्यकाळात भारताने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यावेळी सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. आज मनोहर पर्रिकरांच्या जयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासाबद्दल.
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे मनोहर पर्रिकरांचे व्यक्तिमत्व होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजपचे सामान्य कार्यकर्ते होते. पुढे त्यांनी अनेक मोठी पदं निभावली. मोठे यश संपादन केले. मात्र त्यांनी त्यांच्यातला कॉमन मॅन कधीही सोडला नाही.
मनोहर पर्रिकर यांचा जन्म १३ डिसेंबर १९५५ मध्ये गोव्यातील म्हापसा येथे झाला. त्यांचे बालपण गोव्यातच गेले. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण लोयोला हायस्कूलमध्ये घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते मुंबईमध्ये आले. १९७८ मध्ये त्यांनी आयआयटी मुंबईतून इंजिनीअरिंगमध्ये पदवी संपादन केली.
राजकारणात येण्याआधी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सहभागी झाले. आरएसएसच्या उत्तर गोवा युनिटमध्ये पर्रिकर सक्रिय होते. पुढे त्यांनी पूर्णवेळ राजकारणात येण्याचे ठरवले. १९९१ मध्ये उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून ते उमेदवार म्हणून उभे राहिले. मात्र काँग्रेसच्या हरिश झांट्ये यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर १९९४ मध्ये त्यांनी पणजी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि मोठा विजय मिळवला. त्यानंतर याच मतदारसंघातून सलग चारवेळा ते निवडून आले.
२००० साली पर्रिकर पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री होऊनही ते स्कूटीवरून मुख्यमंत्री कार्यालयात जायचे. स्कूटीवरून जातानाचे पर्रिकरांचे अनेक फोटो तेव्हा वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध व्हायचे. मुख्यमंत्री झाल्यानंतरही पर्रिकर पणजीतील शासकीय निवासस्थानी न राहता त्यांच्या म्हापसा येथील वडिलोपार्जित घरातच राहायचे. पर्रिकर यांच्याबद्दलची खास बाब म्हणजे ते देशातील पहिले आयआयटी पदवीधर मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री म्हणून ते कोणत्याही सरकारी अथवा खासगी कार्यक्रमात जातात तेव्हा ते सामान्य कपडेच घालायचे.
गोव्यात भाजपला स्थापित करण्यामध्ये आणि सत्तेपर्यंत नेण्यामध्ये पर्रिकर यांचा मोठा वाटा होता. जून २००२ मध्ये गोवा विधानसभा बरखास्त करण्यात आल्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या आणि भाजपने सर्वात मोठा पक्ष म्हणून विजय मिळवला. छोटे पक्ष आणि एका अपक्ष आमदाराच्या पाठिंब्याने पर्रिकर पुन्हा मुख्यमंत्री झाले.
२०१२च्या विधानसभा निवडणुकीत पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपला गोव्यात दणदणीत यश मिळाले. २१ आमदारांसह पूर्ण बहुमतातले भाजपचे सरकार गोव्यात स्थापन झाले. निवडणुकीनंतर राज्यात पेट्रोलवरील व्हॅट हटवण्याचा मोठा निर्णय पर्रिकर यांनी घेतला. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात ११ रुपयांनी स्वस्त पेट्रोल मिळू लागले. पर्रिकर यांनी त्यांच्या कार्यकाळात दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, सायबरएज योजना, सीएम रोजगार योजना आदी अनेक मोठ्या आणि महत्वाच्या योजना राबवल्या. त्यामुळेच गोव्याला सलग तीन वर्षे योजना आयोगाने ‘बेस्ट गव्हर्निंग स्टेट’ हा बहुमान दिला.
नोव्हेंबर २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पर्रिकर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. पर्रिकर यांच्यावर देशाच्या संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी दिली गेली. पर्रिकर यांच्याच कार्यकाळात उरी हल्ल्याचा बदला म्हणून सप्टेंबर २०१६ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक देऊन भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राइक घडवला. मार्च २०१७ मध्ये पर्रिकर यांनी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ते चौथ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र वर्षाच्या आतच फेब्रुवारी २०१८ मध्ये पर्रिकर यांना स्वादुपिंडाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले आणि या आजाराशी झुंज देत असतानाच त्यांचे १७ मार्च २०१९ रोजी निधन झाले.
पर्रिकरांच्या साधेपणाबाबत अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. यातलाच एक म्हणजे, पर्रिकर एकदा एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये जात होते. त्याचवेळी नेमकी त्यांची गाडी खराब झाली. त्यांनी लगेच एक खासगी टॅक्सी बोलावली आणि साधे कपडे, चप्पल घातलेले मुख्यमंत्री हॉटेलवर पोहचले. जेव्हा ते टॅक्सीतून उतरले तेव्हा हॉटेलच्या आत जावू लागले. त्यांना पाहून सुरक्षारक्षकांनी पर्रीकरांना आडवले आणि सांगितले तुम्ही आता जाऊ शकत नाही. तेव्हा पर्रिकरांनी मी गोव्याचा मुख्यमंत्री आहे असे सांगितले त्यावर तो सुरक्षारक्षक जोरजोरदार हसू लागला आणि म्हणाला, ‘तुम मुख्यमंत्री है तो मैं देश का राष्ट्रपती हूं.’ तेवढयात तिथे त्या कार्यक्रमाचे आयोजक आले आणि पुढील प्रकरण थांबले.