अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे. या मंदिराचा पहिला टप्पा रामभक्तांसाठी 22 जानेवारीपासून खुला करण्यात येणार आहे. हा भव्य प्रकल्प समस्त भारतीयांसाठी स्वप्नवत आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात बघण्यासाठी 22 जानेवारीपासून लाखों रामभक्त या मंदिराला भेट देणार आहेत. या सोहळ्यासाठी आता अवघे दोन महिने राहिले असल्यानं अयोध्येतील राम मंदिरस्थळी मोठी लगबग उडाली आहे. (Ayodhya)
यात प्रभू रामांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा ते मंदिरस्थळी होणारे विविध कार्यक्रम, याचीही तयारी सुरु आहे. अयोध्येत मृगाशिरा नक्षत्रात प्रभू रामांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून या मुहूर्ताचा प्रभाव शतकानुशतके टिकणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच या अद्वितीय मुहूर्ताला साजेसा हा सोहळा करण्यासाठी हजारो जण तयारी करीत आहेत.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. या सोहळ्याची तयारी 4 टप्प्यात विभागण्यात आली आहे. 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12:20 वाजता अभिजीत मुहूर्त, मृगाशिरा नक्षत्रात प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा होईल. 17 जानेवारी 2024 पासून प्राणप्रतिष्ठेच्या प्रार्थना, विधींना सुरुवात होणार आहे. 17 जानेवारी ते 22 जानेवारी 2024 पर्यंत दररोज अनेक पुजा या ठिकाणी होणार आहेत. त्यानंतर 23 जानेवारीला मंदिर सर्व भाविकांसाठी खुले होणार आहे. या संपूर्ण सप्ताहात सिद्ध, साध्या, शुभ, शुक्ल आणि ब्रह्मयोग असे सहा शुभ योग असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Ayodhya)
ज्या दिवशी हा सगळा सोहळा होणार आहे, त्या 22 जानेवारी 2024, रोजी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील कूर्म द्वादशी आहे. कूर्म द्वादशी व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे. विष्णु पुराणानुसार, या तिथीला भगवान विष्णूंनी कूर्म म्हणजेच कासवाचा अवतार घेतला होता आणि समुद्रमंथनात मदत केली. यासाठी भगवान विष्णूंनी कासवाचा अवतार घेऊन मंदार पर्वत आपल्या पाठीवर घेतला. त्यानंतरच समुद्रमंथन झाले. समुद्रमंथनातून अमृत, ऐरावती हत्ती, लक्ष्मी माता आणि धन्वंतरी यांच्यासह 14 मौल्यवान रत्नं प्राप्त झाली.
त्यानंतर कासवाचे रूप स्थिरतेचे प्रतीक मानले गेले. याच शुभमुहूतर्तावर होणारी प्रभू रामांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा मंदिराला शतकानुशतके स्थिरता प्राप्त करुन मंदिराची कीर्ती जगभर होईल, असे सांगण्यात आले आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये मृगाशिरा नक्षत्र हे कृषी कार्य, व्यवसाय आणि परदेश प्रवासासाठी उत्तम मानले जाते. भारत हा कृषिप्रधान देश असल्याने या शुभ मुहूर्तावर होणारा हा अभिषेक देशाच्या प्रगतीसाठीही अत्यंत शुभ ठरणार असल्याची माहितीही आहे. जवळपास पंधरा दिवस अयोध्येमध्ये हा सर्व सोहळा होणार असून यासाठी अडीच हजार साधू-संत येणार असल्याची माहिती आहे.
या सोहळ्यासाठी राम मंदिर ट्रस्ट आणि अन्य संघटना तयारीला लागल्या आहेत. यासाठी याच महिन्यात 45 राज्यांमध्ये अक्षतांचा कलश पाठवण्यात आला आहे. हे अक्षत कलश पुढे 5 लाख गावांतील मंदिरांमध्ये पोहोचवण्यात येतील. 1 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत महासंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये देशातील 10 कोटी कुटुंबांशी संपर्क साधण्यात येणार आहे. तसेच या कुटुंबांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण देण्यात येईल. भाविकांना 22 जानेवारीनंतरच प्रभू रामांच्या दर्शनासाठी अयोध्येत येण्याची विनंती करण्यात येणार आहे. याशिवाय 22 जानेवारी रोजी मंदिरांमध्ये आनंदोत्व साजरा करा. सायंकाळी घरांमध्ये दिवे लावून आनंद व्यक्त करा, असे आवाहनही आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपल्यानंतर प्रभू रामांच्या दर्शनाचा पुढचा कार्यक्रम 45 दिवस चालणार आहे. (Ayodhya)
याबरोबरच अयोध्येतील 14 कोसी परिक्रमा सुरू झाली. यात लाखो रामभक्तांनी भाग घेतला. एकीकडे मंदिर उभारणीलाही वेग आला असून राम मंदिरात भगवान रामांचे सिंहासहनही भव्यदिव्य बनवण्यात येत आहे. भगवान रामांचे सिंहासन तीन फूट उंच, चार फूट रुंद आणि आठ फूट लांब असेल. सिंहासन राजस्थानी संगमरवरी दगडापासून बनवले जात असून, त्यावर सोन्याचा लेप लावण्याचे काम सध्या सुरु आहे. राम मंदिराचा तळमजला हॉल 15 डिसेंबरपर्यंत तयार होणार आहे. त्यानंतर हे सिंहासन बसवण्यात येणार आहे. (Ayodhya)
===========
हे देखील वाचा : स्वर्गाचे द्वार असणा-या तुंगनाथ मंदिराचे अस्तित्व धोक्यात
===========
याशिवाय संपूर्ण अयोध्या नगरीचा मोठ्याप्रमाणात कायापालट होत आहे. आता प्रभू रामांची अयोध्या नगरी सौर नगरी होणार आहे. त्याचेही काम वेगानं सुरु आहे. वाराणसी ते हल्दिया असा पहिला अंतर्देशीय जलमार्ग सुरु करण्यात आला आहे. यापाठोपाठ अन्य 12 महत्त्वाच्या नद्या जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणार आहेत. याशिवाय रामायणावर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रांचे काम सुरु आहे. अयोध्येतील 25 एकर जमीनीवर मंदिर संग्रहालय उभे राहत आहे. यात वेगवेगळ्या कालखंडात कोणत्या प्रकारची मंदिरे बांधली गेली हे दाखवण्यात येणार आहे.
सई बने