Home » आषाढी एकादशी का साजरी केली जाते? जाणून घ्या वारीचे महत्व आणि माहिती

आषाढी एकादशी का साजरी केली जाते? जाणून घ्या वारीचे महत्व आणि माहिती

by Team Gajawaja
0 comment
ashadhi ekadashi 2023
Share

महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्याने ‘आषाढी एकादशी’ला विशेष महत्त्व आहे. यंदा आषाढी एकादशी (Ashadi Ekadashi) २९ जून २०२३ रोजी आहे. विठूरायला भेटायची आस आणि मुखी विठ्ठू नामाचा जप करत, विठ्ठल भक्तीत मंत्रमुग्ध झालेले वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघतात. आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी, स्मार्ताची एकादशी, भागवत एकादशी असे पण म्हणतात. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या एकादशी पासून चातुर्मास सुरू होतो. (Ashadhi Ekadashi 2023)

देवशयनी म्हणजे काय?

भगवान विष्णू योग निद्रेत गेल्यानंतर चार महिन्यांपर्यंत मांगलिक कार्य केले जात नाही.त्याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते.दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असे मानले जाते.निसर्गात या चार महिन्यांत सूर्य, चंद्र आणि निसर्गाचं तेज कमी राहते.

या काळात शुभ शक्ती कमकुवत असतात. त्यामुळे केलेल्या कार्याचे परिणाम देखील शुभ प्राप्त होत नाहीत.म्हणूनच या चार महिन्यांत म्हणजेच चतुर्मासात संत आणि महात्मे एकाच ठिकाणी राहतात आणि जप, तपश्चर्या व पूजा अर्चना करतात.

आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते.म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी’ (देवांच्या निद्रेची) एकादशी’, असे म्हणतात.या दिवशी रोजच्या पुजेबरोबरच श्रीविष्णूची `श्रीधर’ या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात. तसेच घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा प्रतिमा असल्यास त्याचीही मनोभावे पूजा केली जाते. वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे.

ashadhi ekadashi 2023
ashadhi ekadashi 2023

वारीचा इतिहास
महाराष्ट्रातील पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेव यांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती.त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. संत ज्ञानदेव आणि संत नामदेव यांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले.

हेच व्यापक स्वरूप पुढे जपत संत एकनाथ महाराज, आणि संत तुकाराम महाराज यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली. संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती.

काही जाणकारांचे असे म्हणणे आहे की, “पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे, किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे. वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे.” ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला; परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिकच. भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाला इतिहासाला सुरुवात होते. या इतिहासाचे पुढील कालखंडांत विभाजन करता येईल- (Ashadhi Ekadashi 2023)

संत ज्ञानदेवपूर्व काळ- भक्त पुंडलिक- काळ

संत ज्ञानदेव- संत नामदेव काळ

संत भानुदास महाराज- संत एकनाथांचा काळ

संत तुकोबाराया –संत निळोबा यांचा काळ

संत तुकाराम महाराजांच्या नंतर आजपर्यंत तीनशे वर्षांचा काळ

हेही वाचा- पुराना नव्हे पांडवकालीन पुराण किल्ला…

आषाढी वारी आणि कार्तिकी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय. वारकरीसंप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाति-धर्माचे लोक तसेच मराठा, बौद्ध , मातंग, रोहिदास, लिंगायत व इतर जातींचे भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. वारी हा एक आनंद सोहळा असतो. तर वारीचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे, आषाढी वारी- सर्व संतांच्या पालख्या यावेळी आपापल्या गावाहून पंढरपुरात येतात. तर दुसरी म्हणजे, कार्तिकी वारी – संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरातून आपापल्या गावाला जातात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.