रामा गेली दोन वर्ष त्या आजी आजोबांना न चुकता जेवण देत होता. हे वृद्ध निराधार दांपत्य एकटेच राहत होते. परवा रामा डबा दयायला गेला आणि धक्काच बसला. आजोबा जग सोडून गेले होते. आज त्यांचा ‘तिसरा’ होता. आजींनी त्यांच्या परिने तिसर्याचा नैवैद्य केला खरा, परंतू डोळयातून अश्रू वाहताना त्यांच्या तोंडून शब्द आले, “रामा, तुमचे जेवण त्यांना खूप आवडायचे रे, तुम्ही आम्हाला दोन वर्ष सांभाळलं पोरांनो”, हा प्रसंग अस्वस्थ करणारा होता.
रामा त्यांना अखेरचा डबा घेवून गेला. स्मशानभूमीत रामाने आणलेले जेवण नैवेद्य म्हणून ठेवले. याला कोणी अंधश्रद्धा म्हणा अथवा अन्य काही म्हणा, पण कावळा आला आणि त्याने रामाने दिलेला नैवैद्य उचलला. एक मृतात्मा तृप्त झाल्याची ती भावना होती. अडीच वर्ष मोफत चालवलेल्या अन्नदानाची ती पुण्याई होती आणि मृत्यूपश्चातही पुण्यकर्मासाठी व्यक्त केलेली ती कृतज्ञता होती.

जसा जन्म आहे तसा मृत्यूही आहे, हे अंतिम सत्य असतानाही आपण का आणि कशासाठी जगतो, हे अखेरच्या क्षणापर्यंत न कळलेले अनेक लोक असतात आणि याच स्वार्थाच्या बाजारात नकळत काही हात पुण्याईचे काम असे करून जातात की, एखादया मृत्यूनंतरही त्याची दखल घ्यावीशी वाटते.
ही अकल्पित, अविश्वसनीय घटना घडली आहे, सांगलीमधल्या विट्यामध्ये! या गावातील मिथुन सगरे नावाचा तरूण आणि त्याच्या विटा फिटनेस क्लबचे सदस्य गेल्या दोन अडीच वर्षांपासून शहरात कसलाही गाजावाजा न करता अन्नदानाचा उपक्रम राबवित आहेत. रामा सोळवंडे व गणेश खिलारे हे मिथुनचे सहकारी हे काम न थकता करतात.
लॉकडाऊनमध्ये साधारण आर्थिक परिस्थिती असणार्या मंडळींसमोरही दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. मग अशावेळी अधू, मनोरूग्ण आणि निराधार, लोकांच्या अन्नपाण्याची काय अवस्था असेल, याची कल्पनाही करता येणार नाही. त्यात कोरोनाचे संकट असल्याने या निराधार लोकांच्या मदतीलाही कोणी नव्हतं. शहरातील जवळपास ३० ते ४० निराधारांना दररोज दोन वेळचे मोफत जेवण पोचतं करण्याचा हा उपक्रम विटा फिटनेस क्लबने हाती घेतला.
आज अडीच वर्ष हा उपक्रम एकही दिवस न थांबता अविरत सुरू आहे. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा काहीही असो या गरजूंना अन्नदान केले जातेच. “उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म” असं म्हणतात. हे यज्ञकर्म या मंडळींना उमगले असावे आणि त्याचे आत्मिक समाधानही त्यांना निश्चितच मिळत असेल. सर्वात महत्वाचं म्हणजे या पुण्यकार्याची विशेष प्रसिध्दीही केली जात नाही.
=====
हे ही वाचा: प्रांगण फाउंडेशन (Prangan Foundation):लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया!
=====
हा उपक्रम मिथुन सगरे आणि त्यांचे सहकारी कायमस्वरूपी राबवणार आहेत. केवळ कोरोना काळ किंवा लॉकडाऊनच्या वेळेतच नाही, तर उपेक्षीतांच्या मुखी कायमच दोन घास देण्याचा त्यांचा निर्धार आहे. पण आज जो प्रसंग घडला तो मिथुन आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या आयुष्यात कोरून ठेवण्यासारखा होता. त्यांच्या या कामासाठी आपण आपल्या संस्कृतीत जे म्हटलं आहे, “अन्नदाता सुखी भवं…!” येवढंच म्हणू शकतो.
– बी संतोष
=====
हे ही वाचा: हिंदू धर्मात मृत्यूपश्चात लहान मुलांना अग्नी न देता दफन का करतात?
=====