विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला आता जोरदार सुरुवात झाली आहे. अनेक उमेदवार अगदी घराघरांत जाऊन प्रचार करत आहेत. प्रत्येक मतदारसंघात कमी अधिक प्रमाणात लढाईचं चित्र फिक्स झालं आहे. आज आपण बघणार आहोत नवी मुंबईच्या ऐरोली विधानसभा मतदारसंघाबद्दल. ऐरोली विधानसभा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नवी मुंबईत गणेश नायकांची असलेली ताकद पाहता त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार हे जवळपास फिक्स होतं. पण तरीही भाजपचं तिकीट जाहीर व्हायच्या आधी गणेश नायकांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाण्याच्या चर्चा घडल्या होत्या. मात्र अखेर केवळ त्यांच्या मुलानेच पक्षप्रवेश केला. त्यामुळे पुन्हा गणेश नाईक कमळ चिन्हावर लढणार हे नक्की झालं आहे. गणेश नाईक यांच्याविरोधात ठाकरे गटाने एम.के.मढवी यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीत बंडखोरी झाली असून शिंदेंच्या सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी अपक्ष फॉर्म भरला आहे. त्यामुळे या सीटवर तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशावेळी ऐरोलीत नेमकं कशाप्रकारे राजकीय गणित साधलं जाईल? नेमकं कोणत्या उमेदवाराला अप्पर हॅन्ड असणार आहे? जाणून घेऊया. (Airoli Vidhansabha)
तर ऐरोली विधानसभा मतदारसंघ हा ठाणे लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. ऐरोलीचा इतिहास पाहिल्यास बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन नवी मुंबईत ऐरोली आणि बेलापूर असे दोन विधानसभा अस्तित्वात आले. मतदारसंघाच्या स्थापनेपासून हा मतदारसंघ नाईक कुटुंबाकडेच राहिला आहे. २००९ आणि २०१४ मध्ये गणेश नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक हे या मतदारसंघातून आमदार होते. मात्र २०१९ ला गणेश नाईक या मतदारसंघातून उभे राहिले आणि विधानसभेवर गेले. २०१९ ची निवडणूक गणेश नाईकांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवॆश करत लढवली होती. शिवसेना आणि भाजपचे उमेदवार म्हणून गणेश नाईकांनी ही सीट सत्तर हजारांपेक्षा जास्त मतांनी जिंकली होती. (Political News)
मात्र २०२४ च्या विधानसभेला सामोरं जाताना मात्र चित्र वेगळं आहे. नायकांपुढे एकेकाळी त्यांचे कट्टर समर्थक असलेल्या आणि आता कट्टर विरोधक झालेल्या दोन नेत्यांचे आव्हान आहे. यातील पहिलं नाव आहे एम के मढवी. नवी मुंबई महापालिकेत सलग चार वेळा निवडून गेले आहेत. सॊबतच त्यांची पत्नी तीन वेळा तर मुलगा एक वेळा नगरसेवक झाला आहे. एम.के.मढवी हे एकेकाळचे कट्टर नाईक समर्थक मानले जात होते. मात्र पुढे संदीप नाईक यांच्याशी त्यांचे बिनसले आणि ते शिवसेनेत गेले. शिवसेना फुटली, तसे ते उद्धव गोटात राहीले. या काळात त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले, त्यांना तडीपारही करण्यात आले. त्यानंतरही एम.के.मढवी यांनी उद्धव यांची साथ सोडली नाही. उद्धव ठाकरेंबरोबर राहण्याचं फळंही त्यांना मिळालं आणि ठाकरेंनी त्यांना विधानसभेचं तिकीट दिल आहे. (Airoli Vidhansabha)
नाईकांपुढे दुसरं चॅलेंज असणार आहे शिवसेनेचे विजय चौगुले यांचं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समर्थक असलेला एक मोठा गट नाईकांच्या विरोधात आहे. या गटाचे नेतृत्व विजय चौगुले करतात. नवी मुंबईत एकनाथ शिंदे यांचा जो गणेश नाईक यांच्याशी वाद आहे, तो शिंदे चौगुले यांच्या मार्फतच लढत आले आहेत. त्यातच ऐरोली विधानसभेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी केला आहे. त्यामुळॆ हि जागा शिंदेंनेही मागितली होती. मात्र भाजपने ही जागा सोडली नाही. परिणामी आणि विजय चौगुले यांनी अपक्ष फॉर्म भरला आहे. महत्वाचं म्हणजे चौगुले यांच्या फॉर्म भरण्याला दुसरी किनारही आहे. गणेश नाईक यांनी या मतदारसंघातून पाच वर्षांपुर्वी ८२ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला खरा, मात्र त्यावेळी त्यांना बऱ्यापैकी एकसंघ शिवसेनेची साथ मिळाली होती. नाईकांनीही त्यावेळी प्रचारात शिवसेनेचे स्थानिक नेत्यांना सोबत घेतले होते. मागील पाच वर्षात मात्र नाईक आणि त्यांच्या विरोधकांमधील दरी वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि नाईक यांच्यात विस्तवही जात नाही. त्यातच गणेश नाईक यांनी एक वक्तव्य करून अजूनच सेनेच्या कार्यकर्त्यांचा रोष ओढवून घेतला होता. गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी “माझे सर्व विरोधक स्वर्गस्थ झाले, एकही जिवंत उरला नाही.” असे म्हटल होतं. त्यांच्या या विधानावर वाद निर्माण झाला होता, कारण हे वक्तव्य आनंद दिघे यांनाही उद्देशून आसल्याचं म्हटलं गेलं असा शिंदेच्या नेत्यांचा आरोप होता. (Airoli Vidhansabha)
इंटरेस्टिंग्ली, गणेश नाईक यांनी शिवसेना सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यावेळी ठाण्यात शिवसेनेचं नेतृत्त्व आनंद दिघे करत होते. शिवसेना सोडल्यानतंर गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. त्यांच्यासमोर बेलापुरातून आनंद दिघे यांनी अत्यंत नवख्या अशा सीताराम भोईर यांना उभं केलं आणि गणेश नाईक पराभूत झाले. जो पराभव गणेश नाईक अजूनही विसरलेले नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी जेव्हा दिघेंच्या चेहरा पुढे केला, तेव्हा हा संघर्ष अजूनच वाढला आहे. थोडक्यात, जर विजय चौगुले यांनी माघार घेतली नाही, तर गणेश नाईक यांना महायुतीतूनच चॅलेंज असणार आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात युतीचा उमेदवार केवळ १० हजार मतांनीच पुढे होता. अशावेळी युतीच्या दोन प्रमुख पक्षांची एकमेकांविरोधात भूमिका घेणं गणेश नाईक यांची सीट अडचणीत आणू शकतं. (Political News)
मात्र महायुतीच्या पथ्यावर पडणारी गोष्ट म्हणजे महावीआकस आघाडीतही असाच गोंधळ आहे. शिवसेनेना ठाकर गटाचे राजकारणात मित्र कमी शत्रु अधिक अशी परिस्थिती आहे. त्यातच ऐरोलीतील तीन प्रभागांपुरता प्रभाव असलेल्या मढवी यांना इतरांच्या ताकदीची अजूनच गरज आहे. मात्र त्यांना स्वपक्षातूनच विरोध आहे. मढवी यांना उमेदवारी देताच उद्धव यांच्या पक्षाचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांनी राजीनामा दिला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गणेश नाईक यांच्या विरोधात यंदा काॅग्रेसकडून माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांचे पुत्र अनिकेत यांनी मतदारसंघात चांगली बांधणी केली होती. मात्र जागा वाटपात हा मतदारसंघ उद्धव सेनेकडे गेला. त्यामुळे ते नाराज आहेत. त्यातच रमाकांत म्हात्रे आणि मढवी यांचेही राजकीय संबंध चांगले नाहीत. त्यामुळे नवख्या मढवी यांना विधानसभेत मोठा उलटफेर करायचा असेल, तर बरेच कष्ट करावे लागणार आहेत. (Airoli Vidhansabha)
======
हे देखील वाचा : वरळी – माहीममध्ये ठाकरेपुत्रांचा विजय होणार का?
====
ऐरोलीतील मतदान पाहिल्यास 2011 च्या जनगणनेप्रमाणे या मतदार संघात 42 हजार 531 एससी 9.5 टक्के मतदार आहेत. एसटी मतदारांची संख्या 7,924 म्हणजे 1.77 टक्के आहे. 26,862 मुस्लिम मतदार आहेत, ज्यांची मतदारांची टक्केवारी 6% आहे. सोबतच बेलापूरच्या तुलनेत ऐरोली हा झोपडपट्टी, सिडकोची लहान घरे, माथाडी वसाहती, दाटीवाटीने वसलेल्या गावांचा मिळून बनलेला मतदारसंघ आहे. या भागात झोपडपट्टीवासीय लक्षणीय आहे. मनपात 57 नगरसेवकांपैकी जवळपास 20 नगरसेवक हे झोपडपट्टी बहुल भागातून निवडून येतात. त्यामुळे स्थानिक प्लस झोपडपट्टीतील मतदार यावर सर्व उमेदवारांची भिस्त असणार आहे. आणि यामध्ये कोण यशस्वी होणार हे प्रत्यक्ष निकालातच कळेल. (Political News)