Home » वडीलांनंतर मुलगाही सरन्यायाधीश…

वडीलांनंतर मुलगाही सरन्यायाधीश…

by Team Gajawaja
0 comment
Dhananjay Chandrachud
Share

भारताचे 50 वे  सरन्यायाधीश म्हणून धनंजय यशवंत चंद्रचूड (Dhananjay Yashwant Chandrachud) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून शपथ घेतली.  सरन्यायाधीश लळीत यांची ते जागा घेणार आहेत.  अत्यंत प्रतिभावान म्हणून परिचित असलेल्या सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड यांचे वडील, यशवंत चंद्रचूड यांनीही भारताचे सरन्यायाधिश म्हणून पद भुषविले आहे.  वडिलांचा हा वारसा पुढे चालवणारे धनंजय चंद्रचूड (Dhananjay Yashwant Chandrachud)यांनी वडीलांनीच दिलेले काही निकालही बदलले आहेत.  कर्तव्य कठोर म्हणून त्यांची ओळख असली तरी नव्या विचारांचे व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे.  

सरन्यायाधीश उदय लळीत यांचा कार्यकाळ आता संपुष्टात आला आहे. निवृत्त होणारे सरन्यायाधीश नव्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करतात. त्यानुसार लळीत यांनी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केंद्राकडे केली होती.  त्यानुसार न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी 50 वे सरन्यायाधीश (Dhananjay Yashwant Chandrachud) म्हणून शपथ घेतली.  सरन्यायाधीश लळीत यांच्यानंतर धनंजय चंद्रचूड हे सर्वात वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत. लळीत यांच्यानंतर देशाला पुन्हा एकदा मराठमोळे सरन्यायाधीश लाभले आहेत. चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड हे सरन्यायाधीशपदी तब्बल 7 वर्ष 4 महिने अशा प्रदीर्घ काळासाठी कार्यरत होते.  

देशाचे नवे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड(Dhananjay Yashwant Chandrachud) यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला.  त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी हावर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले. त्यांनी फॉरेन्सिक सायन्स (एसजेडी) मध्ये मास्टर्स आणि डॉक्टरेट केले आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी, हावर्ड लॉ स्कूल, येल लॉ स्कूल आणि विटवॉटरलँड सारख्या मान्यवर विद्यापीठात व्याख्यानेही दिली आहेत.

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड  हे देशाचे 16 वे सरन्यायाधीश होते.  यशवंत चंद्रचूड 22 फेब्रुवारी 1978 ते 11 जुलै 1985 पर्यंत, सात वर्ष चार महिने या पदावर होते.  सरन्यायाधिशपदाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा कार्यकाळ आहे. वडिलांच्या निवृत्तीच्या 37 वर्षानंतर त्यांचा मुलगा सरन्यायाधिश झाला आहे.  सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात वडिलांनंतर मुलगा सरन्यायाधिश होण्याची ही पहिलीच घटना आहे.  

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड (Dhananjay Yashwant Chandrachud)यांनी सर्वोच्च न्यायालयात येण्यापूर्वी अनेक उच्च न्यायालयात काम केले आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. त्यापूर्वी ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यांची प्रथम न्यायाधीश म्हणून 2000 साली मुंबई उच्च न्यायालयात नियुक्ती झाली होती. त्यापूर्वी ते 1998 ते 2000 पर्यंत भारत सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल होते.  मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होण्यापूर्वी त्यांनी गुजरात, कोलकत्ता, अलाहाबाद, मध्य प्रदेश आणि दिल्ली उच्च न्यायालयांमध्ये वकील म्हणून प्रॅक्टिस केली आहे. यासोबतच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणूनही प्रॅक्टिस केली. 1998 मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आले होते. 2000 पर्यंत त्यांनी भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून काम केले आहे.  वकील म्हणूनही त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण खटले लढवले आहेत.

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अनेक निवाड्यांवर चर्चा झाली आहे. यामध्ये 2018 साली विवाहबाह्य संबंध (व्यभिचार कायदा) रद्द करण्याच्या निर्णयाचा समावेश आहे.  2018 च्या एका केसच्या निकालात कलम 497 नाकारताना त्यांनी व्यभिचार कायदा महिलांच्या बाजूने आहे असे दिसते.  परंतु प्रत्यक्षात तो महिलाविरोधी आहे. वैवाहिक नात्यात पती-पत्नी दोघांचीही समान जबाबदारी असते, मग पतीपेक्षा एकट्या पत्नीलाच जास्त त्रास का सहन करावा लागतो? व्यभिचारावरील दंडात्मक तरतूद हे घटनेतील समानतेच्या अधिकाराचे अप्रत्यक्ष उल्लंघन आहे कारण ते विवाहित पुरुष आणि विवाहित महिलांना भिन्न वागणूक देते.  असे मत नोंदविले होते.  या निर्णयाचे महिला संघटनांनी कौतुक करत कोर्टाचे अभिनंदन केले होते.  सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याबद्दल एक खास गोष्ट म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असते. ते कनिष्ठ वकिलांना सुप्रसिद्ध वकिलांप्रमाणेच आदराने वागवतात. खटला फेटाळतानाही, तो नम्र स्वरात वकिलाला कारण तपशीलवार सांगतात.  

कोविडच्या काळात त्यांनी ऑक्सिजन आणि औषधांच्या उपलब्धतेबाबत अनेक आदेश दिले.  स्वतः कोरोनाग्रस्त असतांनाही त्यांनी घरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीत सहभाग घेतला होता. अलीकडेच त्यांनी रात्री उशीरापर्यंत न्यायालयीन कामकाज चालवले आणि त्यादिवशी त्यांच्यासमोरील सर्व खटले निकाली काढले.  

=======

हे देखील वाचा : चिनच्या गुप्तहेर जहाजाची भारताला चिंता…

======

अलीकडे त्यांनी अविवाहित महिलांना त्यांच्या 20 ते 24 आठवड्यांच्या गर्भधारणेचा गर्भपात करण्याची परवानगी दिली. या ऐतिहासिक निर्णयात त्यांनी असेही म्हटले आहे की, जर पतीने बळजबरीने लैंगिक संबंध ठेवून पत्नीला गर्भवती केली असेल तर 24 आठवड्यांसाठी गर्भपात करण्याचा अधिकार असेल. अशाप्रकारे, गर्भपाताच्या प्रकरणालाच कायद्याने प्रथमच वैवाहिक बलात्काराची मान्यता दिली.  लष्करात कायमस्वरूपी कमिशनसाठी दीर्घकाळ संघर्ष करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांनाही त्यांनी दिलासा दिला आहे.  सरन्यायाधीश चंद्रचूड हे अयोध्या खटल्याचा निकाल देणाऱ्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाचे सदस्य होते. आधार प्रकरणाचा निकाल देताना त्यांनी गोपनीयतेला मूलभूत अधिकार म्हणून घोषित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या आई प्रभा या शास्त्रीय संगीतकार होत्या. त्यांच्या पत्नीचे नाव कल्पना दास असून त्यांना माही आणि प्रियांका अशा दोन मुली आहेत.  सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा कार्यकाळ 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत असेल.

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.