श्रीकृष्ण जन्माष्टमी जवळ येत आहे. अशावेळी मथुरेतील प्रत्येक मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्माची तयारी सुरु झाली आहे. मथुरा वृदांवन येथील बांके बिहारी मंदिरात हजारोंच्या संख्येनं कृष्ण भक्त आत्तापासूनच येत आहेत. देशविदेशातून येणारे हे भक्त बांके बिहारींच्या मंदिरात जाऊन बाळकृष्णाच्या मोहक रुपाचे दर्शन घेतात. एरवी मंदिर म्हटलं की त्यात घंटा असतेच. मंदिरात जाणारे भाविक घंटा वाजवून मग देवाचे दर्शन घेतात. मात्र हे बांकेबिहारी मंदिर त्याला अपवाद आहे. या मंदिरात भगवान श्रीकृष्णांचा प्रत्यक्ष निवास असल्याचे सांगण्यात येते. भगवान श्रीकृष्ण येथे लहान रुपात पुजले जातात. बाळकृष्ण झोपले असतांना त्यांना घंटीच्या आवाजाचाही त्रास होऊ नये, अशी काळजी या मंदिरात येणारे प्रत्येक भक्त घेतात. अशाच अनेक परंपरा या मंदिरात पाळल्या जातात. आता श्रीकृष्ण जन्मोत्सव जवळ आला असतांना मंदिरात देशविदेशातील भक्त मोठ्या संख्येनं येत आहेत. पुढचा महिनाभर अशीच भक्तांची मांदियाळी या मंदिरात रहाणार आहे. (Shri Krishna Temple)
भगवान श्रीकृष्णाच्या वृंदावन येथील बांकेबिहारी मंदिरात हजारो भक्तांची गर्दी झालेली आहे. भगवान बांके बिहारी यांची स्थापना त्यांचे भक्त स्वामी हरिदास यांनी केली. त्यांना तानसेनचे गुरूही म्हणतात. भगवान बांके बिहारी निधीवनमध्ये प्रकट झाल्याचे सांगितले जाते. आजही निधीवनामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधा रास लीला करतात, असे सांगण्यात येते. योसोबत येथील बांकेबिहारी मंदिरातही भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्तांसाठी कायम असतात असे सांगण्यात येते. बांके बिहारी मंदिरात अनेक रहस्य आहेत, सोबत अनेक परंपराही पाळण्यात येतात. त्यातील मुख्य परंपरा म्हणजे, या मंदिरात घंटा वाजवण्यास मनाई आहे. या मंदिरात आवाजाशिवाय आणि घंटेच्या स्वराशिवाय आरती केली जाते. वास्तविक आपण कुठल्याही मंदिरात गेल्यावर मंदिरातील घंटा नजरेस पडते. ती वाजवल्यावर भक्त देवाच्या चरणी नतमस्तक होतात. (Shri Krishna Temple)
मात्र या बांकेबिहारी मंदिरात घंटानाद करण्यास मज्जाव आहे. पण बांकेबिहारी मंदिरात घंटाच नाही. शिवाय तेथे मोठ्या आवाजात आरती करण्यासही मनाई करण्यात येते. याचे मुख्य कारण म्हणजे, भगवान श्रीकृष्ण या मंदिरात बालस्वरूपात विराजमान आहेत. १८६२ मध्ये उभारलेल्या या मंदिरात भगवान श्रीकृष्णाला बालरुपात पुजण्यात येते. जर एखाद्या लहान मुलाने मोठा आवाज ऐकला किंवा घंटा वाजवली तर त्याला किती त्रास होऊ शकतो. या मंदिरातही असेच काहीसे आहे. श्रीकृष्णाच्या बालरुपाला घंटेच्या आवाजाही त्रास होऊ नये, यासाठी भक्त ही काळजी घेतात. या मंदिरात ही परंपरा प्रदिर्घ काळापासून सुरू असून येथे येणारे भाविकही या परंपरेचे आनंदानं पालन करतात. (Shri Krishna Temple)
या मंदिरातील पडद्याबाबतही अनेक कथा आहेत. बांके बिहारींच्या आणि भक्तांच्या मध्ये एक पडदा आहे. हा पडदा दर दोन मिनिटांनी बंद केला जातो. त्यामागेही एक कारण सांगितले जाते. एकतर भगवान श्रीकृष्णाला नजर लागू नये म्हणून ही काळजी घेतली जाते. शिवाय भगवान श्रीकृष्ण हे भक्तांच्या प्रेमापोटी काहीही करायला तयार असतात. भक्तांनी आपल्यासोबत चला, अशी गळ घातली तर बांकेबिहारी भक्तांसोबतही जातील, म्हणून दर दोन मिनिटांनी देवासमोरचा पडदा बंद करण्यात येतो. बांके बिहारी मंदिरातील मुर्तीही खास आहे. ही मुर्ती काळ्या रंगाची आहे. या मूर्तीमध्ये राधा आणि कृष्ण या दोघांची प्रतिमा आहे, म्हणूनच बांके बिहारींच्या मूर्तीचा अर्धा भाग स्त्रीच्या रूपात आणि अर्धा भाग पुरुषाच्या रूपात सजवला जातो. (Shri Krishna Temple)
=======
हे देखील वाचा : नागकुंडातील पाण्याचे रहस्य !
========
मान्यतेनुसार, बांकेबिहारी मार्गशीर्ष महिन्याच्या पाचव्या दिवशी प्रकट झाले. दरवर्षी या दिवशी वृंदावनमध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो. या बांके बिहारी मंदिरात जन्माष्टमीला वर्षातून एकदाच मंगला आरती केली जाते. या दिवशी बांके बिहारींचे दर्शन अत्यंत पवित्र मानले जाते. देवाला मूर्तीच्या रूपात पाहिल्यास माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते. या क्षणासाठी देशविदेशातील अनेक भाविक मंदिरात हजर असतात. मंदिर परिसरात आठवडाभर हा उत्सव चालू असतो. मात्र या कालावधीत बांकेबिहारींना त्रास होईल, म्हणून कोणीही मंदिरात घंटा वाजवत नाही.
सई बने