‘फर्स्ट डे फस्ट शो’ चित्रपट बघणारे अनेक चित्रपट प्रेमी आहेत. हे चित्रपट प्रेमी ‘फर्स्ट डे’ म्हणजे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पहिल्याच दिवशी -शुक्रवारी बघतातच. शुक्रवार आणि चित्रपट यांचे अनोखे नाते आहे. बहुतांश बॉलिवूडपट शुक्रवारीच प्रदर्शित होतात, का? यामागे खूप कारणं आहेत. अर्थात अर्थकारण हे पहिलं कारण असलं तरी यामध्ये श्रद्धा हा मुद्दाही आहेच. (Why do films usually release on Friday?)
बॉलिवूडमध्ये ‘फ्रायडे हिट’ हा फंडा हॉलिवूडमधून आला आहे. 1940 च्या दशकात हॉलिवूडमध्ये याची सुरुवात झाली. भारतात 1960 मध्ये ही शुक्रवारची संकल्पना आली. त्यापूर्वी भारतात सोमवारी बहुतांशी चित्रपट प्रदर्शित होत असत. 24 मार्च 1947 रोजी ‘नील कमल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा सोमवार होता.

हॉलिवूडमध्ये प्रथम शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्याचा ट्रेंड, ‘गॉन विथ द विंड’ या लोकप्रिय चित्रपटातून आला. हा चित्रपट 15 डिसेंबर 1939 रोजी प्रदर्शित झाला आणि तूफान चालला. बॉक्स ऑफीसवरचे त्याचे यश बघता सर्व हॉलिवूडपट शुक्रवारी प्रदर्शित होऊ लागले.
भारतात शुक्रवारी प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट म्हणजे, मुघल-ए-आझम. 5 ऑगस्ट 1960 रोजी मुघल-ए-आझम प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या यशाबद्दल बोलायलाच नको. मुघल-ए-आझम चित्रपटाने इतिहास घडवला. या चित्रपटासारखे उज्वल यश संपादन करायचे असेल, तर चित्रपट प्रदर्शनासाठी शुक्रवारचा मुहूर्तच साधायला हवा, असा काही दिग्दर्शक आणि निर्मांत्यांमध्ये समज झाला. त्यातून हे शुक्रवारचे समिकरण बॉलिवूडमध्ये अधिक दृढ झाले.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शनिवार आणि रविवारी बहुतांशी भागात सुट्ट्या असतात. काही ठिकाणी शुक्रवारीही अर्धादिवस सुट्टी देण्यात येते. शाळा, कॉलेजलाही शनिवार, रविवारी सुट्टी असते. अशावेळी कुटुंबासह मनोरंजनाचे साधन म्हणून चित्रपटाला प्राधान्य दिले जाते. (Why do films usually release on Friday?)
शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाल्यास शनिवार आणि रविवारी येणाऱ्या प्रेक्षकांमुळे त्याला ‘हिट’ लेबल लागते. हे लेबल लागल्यावर जे प्रेक्षक चित्रपटगृहात येऊन चित्रपट बघण्यासाठी उत्सुक नसतात, तेही उत्सुकतेपोटी चित्रपट बघतात. यामुळे बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई होऊ शकते.

एका चित्रपटाच्या निर्मितीमागे करोडो रुपयांची गुंतवणूक असते. कलाकारांचे भविष्य त्यावर अवलंबून असते, तसेच पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांचे भवितव्यही चित्रपटाच्या यशावर अवलंबूंन असते. चित्रपट हिट की फ्लॉप, यावर हा करोडोचा मनोरा कोसळणार की, त्यावर अधिक इमले चढवले जाणार हे ठरत असते. म्हणूनच चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्याला महत्त्व दिलं जातं.
चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात करताना काही दिग्दर्शक त्यासाठी खास मुहूर्त काढून घेतात. सेटवर पूजा केली जाते. मुहूर्ताचा नारळ फोडला जातो आणि चित्रीकरण सुरु होते. एवढं सगळं करुन झाल्यावर या चित्रपटाच्या प्रदर्शनाला खास दिवस ठरवला जाणारच ना? (Why do films usually release on Friday?)
====
हे देखील वाचा – बँक खात्यात झिरो बॅलेंन्स असला तरीही पैसे काढता येतात?
====
भारतात शुक्रवार म्हणजे देवी लक्ष्मीचा वार मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली, तर धनलाभ होतो, अशी सर्वसामान्य भावना आहे. हीच भावना चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांचीही असते. चित्रपटावर देवी लक्ष्मीचा वरदास्त असल्यास चित्रपट सुपरहिट होऊन बक्कळ कमाई होईल, ही त्यामागची भावना असते.
अर्थात अनेक चित्रपट होळी, दिवाळी, ख्रिसमस, ईद, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन अशा महत्त्वाच्या सणांच्या दिवशी शुक्रवार नसूनही प्रदर्शित झाले आहेत आणि त्यांनी बॉक्स ऑफीसवर चांगले यश संपादन केले आहे. 2006 मध्ये आलेला ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट 26 जानेवारीचा मुहूर्त साधत बुधवारी प्रदर्शित झाला होता. याशिवाय 6 जुलै 2016 रोजी सलमान खानचा ‘सुलतान’ चित्रपटही गुरुवारी प्रदर्शित झाला. केजीएफ 2 हा चित्रपट गुरुवारच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आला आणि तो तुफान हीट ठरला. (Why do films usually release on Friday?)

बॉलीवूड इंडस्ट्री ही जगभरामध्ये सर्वाधिक आर्थिक उलाढाल करणारी मनोरंजन इंडस्ट्री आहे. दरवर्षी भारतात 500 हून अधिक चित्रपट प्रदर्शित होतात. या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांचे प्रेम लाभतेच असं नाही. हे सर्व गणित चित्रपटाच्या प्रदर्शनावरही काही अंशी अवलंबून असते. त्यामुळेच प्रदर्शनाची तारीख अत्यंत महत्त्वाची समजली जाते.
– सई बने