Mirza Ghalib : मिर्झा गालिब हे उर्दू आणि फारसी साहित्यातील महान शायर मानले जातात. त्यांचे पूर्ण नाव मिर्झा असदुल्ला बेग खान होते. ते 27 डिसेंबर 1797 रोजी आग्रा येथे जन्मले. त्यांचा जन्म एक उच्चशिक्षित, तुर्की मूळाच्या नवाब कुटुंबात झाला. लहान वयातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यानंतर त्यांच्या जीवनात संघर्षाला सुरुवात झाली.गालिब यांचे शिक्षण फारसी, उर्दू आणि अरबी भाषांमध्ये झाले. त्यांनी अगदी लहान वयात काव्यलेखन सुरू केलं. त्यांचे पहिले फारसी गुरू अब्दुस समद होते. वयाच्या 13व्या वर्षी त्यांचे लग्न नवाब इलाही बख्श यांच्या कन्येशी झाले. मात्र वैवाहिक जीवन विशेष सुखकर नव्हते. त्यांच्या एकाही मुलाचे दीर्घायुष्य लाभले नाही.
मिर्झा गालिब यांचे आयुष्य अनेक अडचणींनी भरलेले होते. आर्थिक चणचण, कर्जबाजारीपणा, समाजाची उदासीनता, आणि राजाश्रय मिळवण्यासाठी सतत चालणारी धडपड. त्यांनी मुघल सम्राट बहादुर शाह झफर याच्या दरबारी इतिहासकार आणि शायर म्हणून काही काळ काम केलं. झफर देखील कवी होता आणि गालिब त्याचे गुरू म्हणून प्रसिद्ध झाले.

Mirza Ghalib
गालिब यांचे काव्य हे पारंपरिक उर्दू शायरीपासून वेगळे होते. त्यांनी प्रेम, जीवन, मृत्यू, वेदना, आध्यात्म आणि अस्तित्व या विषयांवर अतिशय सूक्ष्म आणि प्रभावी भाषेत विचार मांडले. त्यांच्या शायरीत चिंतनशीलता, तत्त्वज्ञान आणि आत्मअन्वेषण यांचा प्रभाव दिसतो. त्यांची प्रसिद्ध गझल —
“हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमाँ, लेकिन फिर भी कम निकले।”
या ओळी त्यांच्या स्वप्नांनी भरलेल्या, पण हताशतेने वेढलेल्या आयुष्याचं सुंदर प्रतिबिंब आहेत. गालिब यांचे आयुष्य राजकीय उलथापालथींच्या काळात गेले. 1857 चा स्वातंत्र्यसंग्राम घडला, मुघल साम्राज्याचा अस्त झाला आणि ब्रिटिश सत्ता प्रबळ झाली. बहादुरशाह झफरला बंदिवासात पाठवण्यात आलं आणि दरबारी शायर म्हणून गालिबचा आधारही निघून गेला.(Mirza Ghalib)
===========
हे ही वाचा :
Wajid Ali Shah : ‘एक कलाप्रेमी राजा : वाजिद अली शाह’, पण या कारणास्तव राहिला चर्चेत
Tara Bhawalkar : मराठी लोकसाहित्य आणि स्त्रीवादी साहित्य क्षेत्रातील संशोधक- डॉ. तारा भवाळकर
===========
आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात गालिब यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट होती. तरीही त्यांनी लिहिणं थांबवलं नाही. त्यांचे पत्रलेखनही अतिशय प्रसिद्ध आहे. त्यांनी लिहिलेली पत्रं आज उर्दू साहित्यात *गद्य लेखनाचं नवे पर्व* मानली जातात. मिर्झा गालिब यांचं निधन 15 फेब्रुवारी 1869 रोजी दिल्ली येथे झालं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे काव्य अधिक लोकप्रिय झालं. आज गालिब यांना उर्दू शायरीचे अनमोल रत्न मानले जाते. त्यांचे कार्य इतकं प्रभावी आहे की आजही त्यांच्या गझलांना, शेरांना संगीत, नाटक, चित्रपट आणि साहित्यिक मंचांवर अनंत वेळा वापरलं जातं.