Home » Reza Pahlavi : इस्रायल-इराण युद्धात राजकुमाराची एन्ट्री !

Reza Pahlavi : इस्रायल-इराण युद्धात राजकुमाराची एन्ट्री !

by Team Gajawaja
0 comment
Reza Pahlavi
Share

इराण-इस्रायल संघर्षादरम्यान, आता इराणच्या पहलवी राजघराण्यानीं एन्ट्री घेतली आहे. इराणच्या पहलवी राजघराण्याचे युवराज रेझा पहलवी, हे गेल्या 46 वर्षापासून अमेरिकेमध्ये निर्वासीत म्हणून रहात आहेत. इराणमधील खामेनींची सत्ता उलथून टाकण्यासाठी आता या युवराज रेझा पहलवी यांनी इराणी जनतेला रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. युवराज रेझा यांनी अमेरिकेच्या मदतीनं खामेनी यांच्या नेतृत्वाखालील इस्लामिक सरकारविरुद्ध आघाडी उघडली आहे. रेझा पहलवी यांना इस्रायल आणि अमेरिकेचाही पाठिंबा आहे. त्यामुळे इराणमध्ये अयातुल्ला खामेनी यांची सत्ता जाऊन पुन्हा इराणचे पहलवी राजघराणे सत्तेत येणार अशी चर्चा सुरु झाली आहे. (Reza Pahlavi)

इस्रायलकडून सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे इराणची स्थिती बिकट झाली आहे. अशात अमेरिकाही इस्रायलच्या बाजुने युद्धात उतरण्याची शक्यता असतांना खामेनी यांची सत्ता जवळपास संपुष्ठात आल्याचे सांगितले जात आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी हे या हल्ल्यामुळे बंकरमध्ये लपले असून त्यांचा मुलगा आता सक्रीय झाला आहे. यामुळे वंशपरंपरेला विरोध करणा-या खामेनी यांच्यावर इराणमध्ये पहिल्यांदाच स्वकीयांकडूनही टिका करण्यात येत आहे. आता या युद्धादरम्यान इराणच्या पहलवी राजघराण्याचे वारस युवराज रेझा पहलवी यांनीही उडी घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे. खामेनी यांच्यामुळे गेल्या 46 वर्षापासून युवराज रेझा पहलवी अमेरिकेत निर्वासीत म्हणून रहात आहेत. आता इराणमध्ये निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेमुळे त्यांना पुन्हा आपल्या देशात जाण्याची आशा निर्माण झाली आहे. इस्रायलसोबतच्या युद्धादरम्यान रेझा पहलवी यांनी राष्ट्राला संदेश दिला आहे, यामुळे अयातुल्ला खामेनी समर्थकही हादरुन गेले आहेत. रेझा पहलवी यांनी हे युद्ध म्हणजे, इस्लामिक रिपब्लिकचा अंत असल्याचे सांगून इराणच्या नागरिकांना देशव्यापी उठावाचे आवाहन केले आहे. (International News)

1979 मध्ये इराणच्या शेवटच्या शाहला सत्तेवरून काढून टाकण्यात आले होते. यानंतर इराणमध्ये इस्लामी राजवट स्थापन झाली. त्यानंतर 10 वर्षांनीच खामेनी यांनी इऱाणची संपूर्ण सत्ता आपल्या हाती घेतली. इराणमध्ये, राष्ट्रपतींची निवड लोकशाही पद्धतीनं होते. मात्र त्या राष्ट्रपतीकडे फारसे अधिकार नाहीत. देशातील सर्वच निर्णय हे खामेनी यांच्या हातात आहेत. त्यामुळे अंतिम सत्ता सर्वोच्च नेते खामेनी यांच्याच हाती आहे. आता हेच खामेनी इस्रायलच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी बंकरमध्ये लपले आहेत. इराणमधील या अस्थिर परिस्थितीचा फायदा घेत, युवराज रेझा पहलवी यांनी पुन्हा इराणमध्ये परत येण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी त्यांनी इराणच्या नागरिकांना अतिशय भावनिक संदेश दिला आहे. रेझा पहलवी यांचा हा संदेश नेमक्या वेळी आला आहे. सध्या इराणमध्ये भयावह स्थिती आहे. इराणमधील कट्टरवादाला अनेकांचा विरोध आहे. विशेषतः महिलांवर असलेल्या बंधनाबाबत अनेकवेळा आंदोलन करण्यात आली आहेत. मात्र अयातुल्ला खामेनी यांनी ही आंदोलन कठोरपणे मोडून काढली. यामुळे खामेनी यांच्याबाबत तरुण वर्गात मत चांगले नाही. अशात इराणमध्ये असंतोष वाढत आहे. (Reza Pahlavi)

आर्थिक मंदी यामुळेही खामेनी विरोधी वातावरण आहे. तेलाच्या पैशातून देशभरात सुविधा कऱण्यापेक्षा खामेनी यांनी हा पैसा हमास, हुती सारख्या संघटनांच्या हदशतवादी कारावयांसाठी दिला. तसेच देशाला शस्त्रसज्ज आणि अणुबॉम्ब सज्ज करण्याच्या नादात देशातील आर्थिक आणि सामाजिक सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही खामेनींवर होत आहे. आता हा सर्व अंसतोष एकदम बाहेर आला आहे. हिच संधी साधत युवराज रेझा पहलवी यांनी आता इराणी जनतेला निर्णायक लढा द्या, असे आवाहन केले आहे. जे सुरू झाले आहे ते अपरिवर्तनीय आहे. आपले भविष्य उज्ज्वल असल्याचेही त्यांनी आपल्या संदेशात सांगितले आहे. यासोबतच, रझा पहलवी यांनी इराणच्या जनतेला एक वचनही दिले आहे. त्यानुसार इस्लामिक रिपब्लिकच्या पतनानंतर अराजकता निर्माण होणार नाही, याची खात्री आपण देत असल्याचे रेझा पहलवी यांनी सांगितले आहे. (International News)

================

हे देखील वाचा : Charlie Chaplin : आणि चार्ली चॅपलिनची डेड बॉडीच किडनॅप झाली !

Israel And Iran : पक्के मित्र असलेले इस्रायल आणि इराण शत्रू का झाले !

================

इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या संघर्षात रझा पहलवी यांना खामेनींचा सूड घ्यायचा आहे. इराणच्या पहलवी राजघराण्याचे रेझा पहलवी वारस आहेत. 1979 मध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीदरम्यान त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला देशातून हाकलून लावण्यात आले. त्यानंतर राजघराण्यानं इराणमध्ये परत येण्याचा प्रयत्न केला, मात्र खामेनी यांनी त्यांना इराणमध्ये येण्याची परवानगी दिली नाही. सध्या रेझा पहलवी अमेरिकेत निर्वासित जीवन जगतात. त्यांनी तिथे स्वतःला इस्लामिक रिपब्लिकचे एक कट्टर विरोधक म्हणून स्थापित केले आहे. अमेरिकेत रहात असलेल्या या पहलवी राजघराण्याचे अजूनही इराणमध्ये लाखो समर्थक आहेत. याच समर्थकांना आता रेझा पहलवी खामेनी यांच्याविरुद्ध आंदोलन करण्याचे आवाहन करीत आहेत. (Reza Pahlavi)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.