मार्क कार्नी हे नाव पुढच्या काही वर्षातच आंतरराष्ट्रीय राजकारणात सर्वाधिक चर्चेच्या केंद्रस्थानी रहाणार आहे. मार्क कार्नी यांचा जगभरातील मान्यवर अर्थतज्ञामध्ये समावेश होतो. हेच अर्थतज्ञ आता कॅनडाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. अतिशय प्रतिभावंत व्यक्तिमत्व म्हणून मार्क कार्नी यांची ख्याती आहे. सध्याची कॅनडामधील बिघडलेली परिस्थिती बघता मार्क कार्नी हे देशाला पूर्वपदावर आणतील असा विश्वास त्यांच्या निवडीनंतर येथील जनता व्यक्त करीत आहे. त्यातूनच कार्नी यांची लोकप्रियता आणि जनतेमध्ये त्यांच्याबद्दल असलेले विश्वासाचे नाते किती दृढ आहे, याची प्रचिती येते. (Mark Carney)
कॅनडामधील लिबरल पक्षाचे पुढचे प्रमुख आणि कॅनडाचे पंतप्रधान म्हणून मार्क कार्नी यांचे नाव पक्के झाले आहे. जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यावर कॅनडाचे पुढचे नेतृत्व कोणाकडे जाणार याची उत्सुकता होती. मात्र मार्क कार्नी यांचे नाव आता निश्चित झाल्यानं युरोप आणि अमेरिका येथूनही सावध भूमिका घेण्यात येत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मार्क कार्नी यांची अर्थशास्त्रज्ञ म्हणून असलेली कामगिरी. (International News)
जगभर आर्थिक मंदी असतांना कॅनडाला यातून सावरणारे अर्थतज्ञ म्हणून कार्नी यांचा जगभरात बोलबाला आहे. जगातील दोन प्रमुख देशांमधील मध्यवर्ती बँकांचे कार्नी हे गव्हर्नर राहिले आहेत. त्यामुळेच त्यांचा विजय हा कॅनडासाठी महत्त्वाच मानला जातो. सध्या कॅनडामध्ये अशांतता आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाच्या आर्थिक स्थितीला लक्ष कऱण्यास सुरुवात केली आहे. सोबतच ट्रम्प कॅनडाचा अमेरिकेचे 51 वे राज्य असा उल्लेख करत आहेत. शिवाय ट्रम्प यांनी ड्रग्ज आणि बेकायदेशीर स्थलांतराबद्दल तक्रार करत कॅनडावर 25 टक्के कर लादण्याची घोषणाही केली आहे. या सर्वातून कॅनडाला सावरण्याची जबाबदारी आता मार्क कार्नी यांच्यावर आली आहे. कार्नी यांना एकूण मतांपैकी 85 टक्के मते मिळाल्याची माहिती आहे. कॅनडाच्या इतिहासात हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जागा नसलेले कार्नी हे दुसरे पंतप्रधान आहेत. (Mark Carney)
मार्क कार्नी यांचा जन्म 16 मार्च 1965 रोजी कॅनडाच्या वायव्येकडील फोर्ट स्मिथ येथे झाला. त्यांचे सर्व शालेय शिक्षण अल्बर्टाच्या एडमंटनमध्ये झाले. मार्क यांचे आईवडिल शाळेत शिक्षक होते. अभ्यासात हुशार असलेले मार्क आपल्या सगळ्या प्रगतीचे श्रेय आई-वडिलांना देतात. पालकांनी आपल्यात सार्वजनिक सेवेची बांधिलकी निर्माण केली, त्यामुळेच हा प्रवास शक्य झाल्याचे ते नम्रपणे सांगतात. मार्क यांचे उच्चशिक्षण अमेरिकेत झाले. हार्वर्ड विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला. त्यांनी युनायटेड किंग्डममधून पदव्युत्तर पदवी मिळवली. 1995 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. या सर्वात मार्क यांना आईस हॉकीचीही आवड जपली. (International News)
मार्क कार्नी यांनी 2004 मध्ये कॅनेडियन वित्त विभागातही काम केले. 2007 मध्ये त्यांना बँक ऑफ कॅनडाचे गव्हर्नर बनवण्यात आले. 2007 च्या उत्तरार्धात जेव्हा जगभरात आर्थिक गोंधळ सुरू झाला तेव्हा मार्क कार्नी यांनी हा संभाव्य धोका ओळखून कॅनडाचे चलनविषयक धोरण बदलले. परिणामी जागतिक मंदिची झळ कॅनडाला बसली नाही. 2013 पर्यंत ते बँक ऑफ कॅनडाचे गव्हर्नर होते. त्यानंतर मार्क यांनी बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर म्हणून पदभार स्विकारला. बँक ऑफ इंग्लंडच्या 300 वर्षांहून अधिक काळाच्या इतिहासात ते पहिले गैर-ब्रिटिश गव्हर्नर होते. ब्रिटनमधील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये मार्क यांनी ब्रेक्झिटचा मार्ग मोकळा केला. सोबतच मंदीच्या जाळ्यातून ब्रिटिश अर्थव्यवस्थेलाही वाचवले. 2020 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला. त्यावेळी कोरोनाचे संकट जगावर होते. अशात पद सोडतांना त्यांनी बँकेचे व्याजदर 0.5 टक्क्यांनी कमी केले. (Mark Carney)
==============
हे देखील वाचा : Mohammed Bin Salman : सौदीच्या राजकुमाराच्या विधानानं खळबळ !
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार नाहीत ?
===============
यामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागला. यादरम्यान 2012 मध्ये त्यांना कॅनाडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनी कॅनडाचे अर्थमंत्रीपद बहाल केले होते. मात्र मार्क कार्नी यांनी त्याला नकार दिला. 2013 मध्येही मार्क यांचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे आले होते. मात्र मार्क कार्नी यांनी तेव्हाही त्यास नकार दिला होता. मात्र आता कॅनडा आर्थिक आणि राजकीय परिस्थितीत दोलायमान झाल्यावर कार्ल यांनी आपल्या देशाला हात दिला आहे. मार्क कार्नी यांनी 1994 मध्ये ब्रिटनच्या डायना फॉक्सशी लग्न केले. फॉक्स यांच्याकडे ब्रिटन आणि कॅनडाचे दुहेरी नागरिकत्व आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या आफ्रिका, युरोप आणि उत्तर अमेरिकेत आर्थिक तज्ञ म्हणून काम करत आहे. या जोडप्याला चार मुले आहेत. (International News)
सई बने