आपल्या देशामध्ये दोन महत्वाचे राष्ट्रीय उत्सव साजरे केले जातात. यातला एक २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन (Republic Day) आणि दुसरा १५ ऑगस्ट अर्थात आपला स्वतंत्र दिन. या दोन्ही दिवसांचे महत्व आणि इतिहास खूपच मोठा आहे. हे दोन्ही दिवस प्रत्येक भारतीयांसाठी खूपच महत्वाचे असे दिवस आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का? की हे दोन्ही दिवस का साजरे केले जातात. (Republic Day)
आता १५ ऑगस्ट हा दिवस आपला स्वतंत्रता दिन म्हणून आपण साजरा करतो हे तर माहित आहेच, मात्र २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन साजरे करण्यामागचे कारण आणि इतिहास खूपच कमी लोकांना माहित असेल. या दोन्ही दिवसांमध्ये लहान मोठे असे अनेक महत्वाचे फरक आहे. प्रजासत्ताक दिन साजरे करण्यामागचे कारण काय आहे? चला जाणून घेऊया. (Republic Day History)
प्रजासत्ताक दिन दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले म्हणूनच हा दिवस साजरा केला जातो. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची राज्यघटना लोकशाहीच्या उद्देशाने तयार करण्याचे काम सुरू झाले. २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांत भारताचे संविधान तयार झाले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाच्या संविधान सभेने स्वीकारले. त्यानंतर पुढच्याच वर्षी २६ जानेवारी १९५० रोजी संपूर्ण देशात ही राज्यघटना लागू झाली. (Marathi News)
२६ नोव्हेंबरला स्वीकारलेली भारतीय राज्यघटना लागू करण्यासाठी २६ जानेवारी हीच तारीख का निवडली यामागे देखील एक खास गोष्ट आहे. २६ जानेवारी १९३० रोजी काँग्रेसने इंग्रजांच्या गुलामगिरीविरुद्ध भारत पूर्णपणे स्वतंत्र घोषित केला होता. संपूर्ण स्वराज प्रस्तावाच्या अंमलबजावणीच्या या तारखेचे महत्त्व लक्षात घेऊन राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी २६ जानेवारीची निवड करण्यात आली. १९५० मध्ये या दिवशी संविधान लागू झाल्यानंतर, देशाला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. यासाठीच तेव्हापासून दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.
स्वातंत्र्यानंतर देशासाठी राज्यघटनेची गरज निर्माण झाली. राज्यघटना निर्माण करण्यासाठी संविधान सभा स्थापन करण्यात आली. या सभेने ९ डिसेंबर १९४६ पासून संविधान बनवण्याचे काम सुरू केले. भारताच्या या संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते. तर संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.भीमराव रामजी आंबेडकर होते. भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यात डॉ. आंबेडकरांनी महत्त्वाची आणि मोठी भूमिका बजावली. म्हणूनच त्यांना राज्यघटनेचे निर्माते म्हटले जाते.
================
हे देखील वाचा : Republic Day प्रजासत्ताक दिन स्पेशल : जाणून घ्या राष्ट्रध्वज फडकवण्याचे नियम
================
भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे, ज्याला बनवण्यासाठी तब्बल २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांचा कालावधी लागला. यानंतर, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे देशाचे संविधान सुपूर्द केले. त्यामुळे दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
प्रजासत्ताक दिनी देशाचे राष्ट्रपती २६ जानेवारी रोजी मुख्य कार्यक्रमात सहभागी होतात आणि ध्वज फडकवतात. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आणि या दिवशी पंतप्रधान ध्वजारोहण करतात. तर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथावर प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम होतो. या दिवशी राष्ट्रपती ध्वज फडकवतात.