हिवाळा हा आपल्या उत्तम आरोग्यासाठी अतिशय महत्वाचा समजला जाणारा ऋतू आहे. हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असा उत्तम आहार उत्तम फळं सर्वच मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे हा ऋतू खूपच चांगला आणि उत्तमाचा समजला जातो. मात्र या ऋतूमध्ये कोरड्या हवेमुळे अनेक त्रास देखील सुरु होतात. कोरड्या हवेमुळे आपली त्वचा कोरडी होते आणि त्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. यातलीच एक महत्वाची समस्या म्हणजे केसांमध्ये कोंडा होणे. ही एक सामान्य समस्या असली तरी त्रासदायक आहे.
केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर केसांना सतत खाज येते, टाळूवरील त्वचा लाल होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून सुटण्यासाठी लोकं बाजारात उपलब्ध असलेले अनेक महागडे प्रोडक्ट वापरतात आणि त्यामुळे कोंडा तर कमी होत नाही मात्र केसांची गुणवत्ता नक्की कमी होते. केसांची मूळ कमकुवत होऊन जातात आणि त्यांची वाढ खुंटते. मग अशावेळेस जर आपण काही घरगुती उपाय केले तर त्याचे साईड इफेक्ट होत नाही झाला तर फायदाच होतो. मग केसांमधील कोंडा घालवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतील चला जाणून घेऊया.
कोमट तेलाने मसाज
हिवाळा सुरु झाला आहे. कोंडापासून मुक्ती मिळवण्यासाठी केसांना कोमट तेलाने नियमितपणे मसाज करा. यासाठी खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा बदामाचे तेल हलके गरम करा आणि या तेलाने डोक्याला हलक्या हाताने मसाज करा. या नैसर्गिक तेलांमुळे टाळूला आवश्यक ओलावा मिळेल आणि कोंड्याची समस्या कमी होईल.
टी ट्री ऑइल
टी ट्री ऑइल कोंडा कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल. केस धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शॅम्पूमध्ये टी ट्री ऑइलचे काही थेंब टाकून शॅम्पू करा किंवा नेहमीच्या केसांच्या तेलात टी ट्री ऑइलचे काही थेंब घाला आणि ते केसांना लावा. टी ट्री ऑइल थेट केसांना लावू नका. ते नेहमी थोड्या प्रमाणात इतर तेलात मिसळून लावा.
कोरफडचा वापर
कोंडा दूर करण्यासाठी केसांच्या मुळांवर ताजे कोरफडीचे जेल चांगले लावा आणि अर्ध्या तासानंतर केस धुवा. कोंडा कमी करण्यासोबतच कोरफडीमुळे होणाऱ्या खाज सुटण्यापासूनही आराम मिळतो. याशिवाय या उपायामुळे केस मुलायम देखील होतील.
लिंबू
केसांमधील कोंडा पूर्णपणे काढून टाकण्यासाठी लिंबू उपयुक्त आहे. लिंबाचा रस टाळूचे पीएच संतुलित करून कोंडा कमी करण्यास मदत करतो. लिंबाचा रस काढून आणि कापसाच्या मदतीने केसांच्या मुळांवर लावा. पाच ते दहा मिनिटांनी केस चांगले धुवा.
मेथीच्या दाण्याचा वापर
केसांच्या आरोग्यासोबतच कोंडा दूर करण्यासाठी मेथी उपयुक्त आहे. मेथीमध्ये अँटी फंगल गुणधर्म असतात, जे कोंडा दूर करण्यासाठी प्रभावी असतात. मेथी रात्रभर भिजत ठेवा. ही मेथी बारीक करून त्याची पेस्ट बनवा आणि केसांना लावा. तासाभरानंतर केस चांगले धुवा. नक्कीच कोंडा कमी होईल.
खोबरेल तेल आणि कापूर
खोबरेल तेलात केसांना लाभदायक असे गुणधर्म आहेत. टाळूवरील कोंडा काढण्यासाठी वाटीमध्ये खोबरेल तेल घेऊन त्यात कापूरच्या वड्या टाकून रात्रभर भिजत ठेवा. सकाळी कापूर पूर्णपणे वितळल्यानंतर केसांना तेल लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे टाळूवरील कोंडा निघून जाईल आणि केस स्वच्छ होतील.
लिंबू आणि दही हेअरमास्क
टाळूवरील कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी वाटीमध्ये दही घेऊन त्यात लिंबू मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून नंतर केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत सगळीकडे व्यवस्थित लावून घ्या. केसांना लावून झाल्यानंतर ३० मिनिटं हेअरमास्क तसाच ठेवून द्या. यामुळे केसांमधील कोंडा कमी होईल आणि केस स्वच्छ होतील.
पपई आणि दही हेअरमास्क
एका वाटीमध्ये पपईचा गर घेऊन त्यात दही मिक्स करा. दही मिक्स करून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत सगळीकडे लावा. हा हेअर मास्क कोंडा कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. ३० मिनिटं हेअर मास्क ठेवल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा.
कोरफड आणि व्हिनेगर
व्हिनेगरमध्ये अँटी-फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात यामुळे तुम्ही कोरफड जेल मध्ये व्हिनेगर वापरल्यास केसांच्या समस्येमध्ये याचा डबल फायदा होतो. वाटीमध्ये कोरफड जेलमध्ये अर्धा चमचा व्हिनेगर मिसळा आणि हा मास्क केसांना लावा साधारण तासाभरानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा.
(टीप : कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)