विचार करा, तुम्ही तुमच्या देशात आहात, तुम्ही रस्त्याने फिरत आहात तुम्हाला समोरून जाताना तुमची मैत्रीण दिसली, तुम्ही तिला हाक मारू इच्छिता, पण तुम्ही असं करू शकत नाही, कारण तुमच्या बोलण्यावर तुमच्या देशाने बंदी घातली आहे. तुमची मैत्रीणही तुम्हाला हाक मारू शकत नाही. कारण एकूणच तुमच्या देशात महिलांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची बंदी आहे. तुम्ही म्हणाल, हा काय काल्पनिक देश आहे का? पण हे वास्तव आहे अफगाणिस्तान या देशाच्या महिलांचं. या देशात तालिबान सरकारने मुलींना ७ वी इयत्तेपेक्षा जास्त शिकण्यावर बंदी घातली आहे. बाहेर जाताना महिलांना स्वत:चं अंग आणि चेहरा पूर्णपणे झाकण्याचे आदेश आहेत. पण अफगाणिस्तानातील महिलांचं जीवन पूर्वी पासून असं नव्हतं. एकेकाळी अफगाणिस्तानमध्ये सुद्धा स्त्रिया मोकळं आणि सुरक्षित जीवन जगत होत्या. त्यांना कोणत्याही प्रकारची बंदी नव्हती. बुरखा न वापरता वेस्टर्न कपडे घालण्याचं सुद्धा स्वातंत्र्य त्यांना होतं अफगाणिस्तानमध्ये महिलांचा अधिकार आणि हक्क याचा इतिहास कसा राहिला आहे? हेच जाणून घेऊया. (Afghanistan)
अफगाणिस्तानचा इतिहास पहिला तर १८८०-९० च्या आधी मुलींचं लग्न कमी वयातच करून दिलं जायचं, महिलांना पतीच्या निधनानंतर पतीच्या भावाशी लग्न करायची परंपरा होती, मुलीला वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळत नव्हता. नंतर, अफगाणिस्तानमध्ये १८८० ला अब्दुर रहमान खान यांची सत्ता आली. त्यांनी अफगाणिस्तानमधल्या महिलांचं जीवन सुधारण्यासाठी बरेच निर्णय आणि कामं केली. त्यांनी लग्नन करण्यासाठी मुलींची वयमर्यादा वाढवली, पत्नीने पतीच्या निधनानंतर त्याच्या भावासोबत लग्न करण्याची परंपरा मोडीत काढली आणि काही विशेष परिस्थितींमध्ये महिलांना घटस्फोट देण्याचा अधिकार सुद्धा दिला. त्यानंतर त्यांचा मुलगा आमिर हबीबुल्ला खान याने सुद्धा वाडिलांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत महिलांच जगणं सुधारण्यासाठी प्रयत्न केले. (International News)
१९१९ मध्ये हबीबुल्लाहच्या हत्येनंतर त्याचा मुलगा आमिर अमानुल्लाह खान सत्तेत आला. त्याच काळात महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. 1923 मध्ये स्त्रियांना त्यांच्या मर्जीने लग्न करण्याचे कायदेशीर अधिकार मिळाले. १९२८ मध्ये अफगाणिस्तानच्या काही महिला तुर्कीमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेल्या. यादरम्यान अफगाणीस्तानमधील राजघराण्यातील स्त्रिया वेस्टर्न कपडे घालू लागल्या होत्या. त्या काळात काबूलमध्ये झालेल्या एका सभेत अमानुल्लाह खान म्हणाला की, “ धर्मासाठी स्वत:चा चेहरा आणि शरीर झाकण्याची गरज नाही.” आणि याच सभेत त्याची पत्नी राणी सोराया हिने सर्वांसमोर आपल्या चेहऱ्यावरचा नकाब काढून फेकला. यामुळे अनेक स्त्रियांना आपल्या मर्जीनुसार कपडे घालण्याचं प्रोत्साहन मिळालं. शहरी भागात हा बद्दल लोकांनी स्वीकारला, पण गाव खेड्यात म्हणजे ग्रामीण भागात लोकांना हा बद्दल अधिकच वेस्टर्न वाटू लागला. म्हणून ग्रामणी भागात काबायली समाजाच्या नेत्यांनी अमानुल्लाह खानच्या विचारांना आणि शहरी भागात महिलांना मिळणाऱ्या स्वातंत्र्याला विरोध करायला सुरुवात केली. त्यांनी मुलींच्या शिक्षणाविरुद्ध सुद्धा आवाज उठवला. काबुल आणि ग्रामीण भागातील शाळा बंद करण्यात आल्या आणि मुलींना हिजाब घालण्यास भाग पाडलं गेलं. विरोध इतका वाढला की अमानुल्लाह खान याला देश सोडावा लागला. (Afghanistan)
पुढे मोहम्मद नादिर शाह अफगाणिस्तानवर ४ वर्ष राज्य केलं. पण त्याच्या राज्यात मुलींच्या शिक्षणावर बंदीच राहिली आणि हिजाबवर सुद्धा सख्ती होतीच. पण मग मोहम्मद नादिर शाहच्या हत्येनंतर १९९३ मध्ये त्याचा मुलगा मोहम्मद जहीर शाह सत्तेत आला, जो अफगाणिस्तानचा सर्वात मोठा आणि शेवटचा राजा होता. त्याच्या कारकिर्दीत, अमानुल्ला खानचे महिलां सबंधित अनेक उपक्रम हळूहळू अंमलात आणले गेले. त्यांच्या सरकारने मुलींच्या शाळा पुन्हा सुरू केल्या, नवीन विद्यापीठाला निधी दिला आणि १९५० च्या दशकात नवीन संविधानाची स्थापना केली. त्याच्या काळात महिलांनी नर्स, डॉक्टर आणि शिक्षिका म्हणून काम करायला सुरूवात केली होती. हा काळ अफगाणिस्तानमधील महिलांसाठी सुवर्ण काळ होता. १९५९ ते १९६५ च्या दरम्यान, सिव्हिल सर्विसमध्ये सुद्धा महिला दिसू लागल्या होत्या. १९६० चं दशक असं होतं की अफगाणिस्तानच्या शहरी भागात रस्त्यांवर वेस्टर्न कपडे घालून फिरणाऱ्या मुली दिसत होत्या आणि बुर्का घालूनही महिलां दिसत होत्या. हे त्यांच स्वातंत्र्य होतं की त्यांनी काय परिधान करावं. याच काळात काबूल यूनिवर्सिटीत देखील मुलींच्या संख्येत दररोज वाढ होत होती. १९६६ ते १९७१ च्या दरम्यान, १४ महिला न्यायाधीशांची नियुक्ती झाली. या दशकात अफगाणिस्तानच्या महिला लोकसंख्येपैकी ८% महिलांनी पैसे कमवायला सुरुवात केली होती. महिलांना कायदेशीर अधिकार मिळाले होते. (International News)
मग १९७० च्या दशकाच्या शेवटी सोविएत संघाचं सैन्य अफगाणिस्तानमध्ये दाखल झालं. त्या वेळच्या कम्युनिस्ट सरकारची मदत करण्यासाठी ते इथे आले होते. अमेरिकेने कम्युनिस्ट सोव्हिएत संघा विरुद्ध लढण्यासाठी मुजाहिदीन या कट्टर इस्लामिक संघटनेला मदत केली. १९८९ सोव्हिएत संघाने अफगाणिस्तानातून माघार घेतली. ९० च्या दशकात अफगाणिस्तानमध्ये एक अंतरिम सरकार तयार झालं. यावेळी मुजाहिद्दीनचे वेगवेगळे गट सत्ता मिळवण्यासाठी एकमेकांमध्येच लढायला लागले. त्यात एक गट होता कंधार शहरातील धार्मिक विद्यार्थ्यांचा, ज्यांना ‘तालिब’ म्हटलं जात होतं. पुढे त्याचं तालिबान झालं. या लढायांमुळे कायद्याचं राज्य संपलं आणि इथेच अफगाणिस्तानमधल्या महिलांचा सुवर्ण काळ संपला. या लढायांमुळे अफगाणिस्तान मधील पुरुष मोठ्या प्रमाणावर मारले गेले. ज्या विधवा स्त्रिया होत्या त्यांच्यावर भीक मागायची पाळी आली, बलात्कार सर्रास होऊ लागले. निराशेमुळे महिला आत्महत्या करू लागल्या. १९९६ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला, त्या काळात मुलींचं शिक्षण बंद केलं गेलं, महिलांना नोकऱ्या करण्यापासून वंचित केलं गेलं, महिलांना सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यासह संपूर्ण शरीर झाकण्याची सक्ती केली गेली, महिलांना पुरुष डॉक्टरकडून उपचार घेण्यापासून बंदी घातली, पण त्यांना पुरुष कुटुंब सदस्यासोबतच जाण्याची परवानगी होती. (Afghanistan)
========
हे देखील वाचा : सिरियाचा नवा हुकुमशहा !
======
जर महिलांनी हे नियम पाळले नाहीत तर त्यांना सर्वांसमोर बेदम मारहाण करण्यात येतं होती. जर मुलींना त्यांच्या कुटुंबाने शाळेत पाठवलं, तर कुटुंबीयांना मारहाण केली जात होती किंवा त्यांची हत्या केली जात होती. मग अमेरिकेत मुजाहिद्दीनपासूनच तयार झालेल्या अल कायदा या दहशतवादी संघटनेने सप्टेंबर 2001 मध्ये सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात ओसामा बिन लादेनचे नाव पुढे आले. त्याला तालिबानकडून संरक्षण मिळत होतं. अमेरिकेने सुरुवातीला तालिबानला लादेनला अमेरिकेच्या हवाली सोपवण्याची मागणी केली. पण तालिबानने ते करण्यास नकार दिला. मग अमेरिकेने आपलं सैन्ये अफगाणिस्तानात पाठवलं आणि त्यानंतर तालिबानचं शासन संपलं. इथून परत महिलांना त्यांचे अधिकार मिळण्यास सुरुवात झाली. २००४ साली एक संविधान तयार झालं. महिलांसाठी पुन्हा शिक्षण सुरू झालं. महिला पुन्हा कामाला लागल्या. अफगाणिस्तानमध्ये अनेक संस्था उघडल्या गेल्या, ज्या महिलांच्या हक्कांसाठी काम करू लागल्या. या संस्थांनी त्यांना शिक्षित करणे, आरोग्य सुविधा देणे, त्यांचे जीवनमान सुधारणे आणि कौशल्य प्रशिक्षण देण्याचे काम केलं. महिला संसदेत निवडून आल्या. १५ ऑगस्ट २०२१ साली पुन्हा एकदा तालिबान राजवट सुरू झाली. आणि महिलांचे अधिकार पुन्हा संपुष्टात आले. तेव्हापासून अफगाणिस्तानमधील महिलांची परिस्थिती भीषण आहे. (International News)