मार्गशीर्ष महिना म्हणजे सणांचा महिना. या महिन्यात अनेक लहान मोठे महत्वाचे सण आणि तिथी येतात. या महिन्यातले दोन महत्वाचे दिवस म्हणजे प्रत्येक गुरुवार आणि चंपाषष्ठी. संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा अर्थात मल्हारी मार्तंड यांचा उत्सव चंपाषष्ठीला साजरा होतो. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी होय. श्री खंडोबा हा शंकराचा अवतार आहे. खंडोबा नवरात्राचा आज शेवटचा दिवस आहे. जेजुरीमध्ये या दिवशी मोठा जल्लोष पाहायला मिळतो.
चंपाषष्ठीचे मोठे महत्व आहे. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो. या दिवशी कुलधर्म कुलाचार केला जातो. तळी भरली जाते. या दिवशी दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य, वांग्याचे भरीत – बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवितात.
खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून आठ महिने वांगी चालतात. महाराष्ट्रांत चातुर्मासांत कांदा, लसूण, वांगी वर्ज्य असतात. चंपाषष्ठीच्या दिवशी अनेक घरांमध्ये कुलधर्म झाल्यानंतर हे बंद असलेले कांदे वांगे खाण्यास सुरुवात होते.
चंपाषष्ठीस ब्राह्मण-सुवासीनीस जेवायला बोलवले जाते. भोजनानंतर त्यांना पानविडा-दक्षिणा देऊन नमस्कार करावा. तसेच खंडोबाची वाहने कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे. सटीच्या दिवशी देवासाठी तेल आणि नैवेद्य नेतात. जेवण वाढले की घरांतील सर्वजण ब्राह्मण, वाघ्या-मुरळीकडून ‘ वारी खंडोबाची ‘ म्हणून त्यांच्या पानांतून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात.
चंपाषष्ठी का साजरी केली जाते यामागे देखील एक कथा आहे. मणी-मल्ली नावाच्या राक्षसांचा संहार करण्यासाठी शंकराने हा मल्हारी अवतार धारण केला. सह्याद्री पर्वताच्या रांगेतील जयाद्री नावाच्या डोंगरावर हा अवतार घेतला गेला तोच पुढे जेजुरीगड या नावाने प्रचलित झाला. मणी-मल्ली या राक्षसांबरोबर मार्गशीष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सलग सहा दिवस युद्ध चालले आणि षष्ठीला राक्षसांचा नायनाट करून विजय संपादन केला तो दिवस म्हणजे चंपाषष्ठी होय.
विजयी झाल्यावर देवांवर चाफ्याच्या फुलाचा वर्षाव झाला म्हणजे चाफवृष्टी झाली यामुळे या दिवसाला चंपाषष्ठी असे नाव दिले गेले, असे सांगण्यात येते. युध्द करताना जे आयुध वापरलं ते म्हणजे खड्ग त्याला ‘खंडा’ असं म्हणतात म्हणून ते धारण करणारा म्हणून खंडोबा हे नाव पडले. काही ठिकाणी असंही सांगितले जाते की खंडोबा नावाचे ऋषि होते त्यांनी देवाला मणी-मल्लीचा बंदोबस्त करायला सांगितला म्हणून खंडोबा हे नाव पडले.
तळी म्हणजे काय?
पौराणिक कथेनुसार, ‘मणि आणि मल्ल’ या दैत्यांचा पराभवानंतर सर्वांना आनंद झाला. या आनंदोत्सवात खंडेरायाचा जयजयकार करण्यात आला. त्याचेच प्रतीक म्हणजे ‘तळी भंडारा’ आहे. तेव्हापासून महाराष्ट्रात चंपाषष्ठीला तळी भरली जाते. यात ताम्हणात विड्याची पाने, सुपारी, देवाचा टाक, खोबऱ्याचे तुकडे, भंडारा आदी साहित्य घेऊन तीन, पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये तळी उचलली जाते. घरातील पुरुष मंडळीनी एकत्र येत ‘येळकोट, येळकोट, जय मल्हार’ च्या गजरात ही तळी वर खाली उचलतात.
त्यानंतर जमीनावर पान ठेवून तळी ठेवली जाते. देवाला भंडार वाहिला जातो. त्यानंतर प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावल्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोटच्या गजरात तळी उचलली जाते. शेवटी तळीचे ताम्हण मस्तकी लावत देवाला नमन केले जाते. त्यानंतर खंडेरायाला भरीत आणि भाकरीचा नैवेद्य अर्पण केला जाते. तसेच भंडारा उधळत भंडारा आणि गुळ-खोबऱ्याचा प्रसाद दिला जातो. जेजुरीत हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो.
खंडोबा आरती
जेजुरगडपर्वत शिवलिंगाकार ।
मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ॥
नानापरिची रचना रचिली अपार ।
तये स्थळी नांदे स्वामी शंकर ॥ १ ॥
जय देव जय देव शिवमार्तंडा ।
अरिमर्दन मल्लारी तूंची प्रचंडा ॥ धृ. ॥
मणिमल्ल दैत्य प्रबळ तो झाला ।
त्रिभुवनी त्याने प्रळय मांडिला ॥
नाटोपे कोणास वरे मातला ।
देवगण गंधर्व कांपती त्याला ॥ जय. ॥ २ ॥
चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिसी ।
मणिमल्ल दैत्यांचा संहार करिसी ।
चरणी पृष्ठी खंङ्गें वर्मी स्थापीसी ।
अंती वर देउनि त्या मुक्तीते देशी ॥ जय. ॥ ३ ॥
मणिमल्ल दैत्य मर्दुनी मल्लारी ।
देवा संकट पडतां राहे जेजुरी ॥
अर्धांगी म्हाळसा शोभे सुंदरी ।
देवा ठाय मागे दास नरहरि ॥ जय. ॥ ४ ॥