Home » एक्झिट पोल जेवढा जय, तेवढाच पराजय !

एक्झिट पोल जेवढा जय, तेवढाच पराजय !

by Team Gajawaja
0 comment
Exit Polls
Share

भारतात दूरदर्शनचे आगमन 1970 च्या दशकातच झाले होते, परंतु देशभर त्याचा विस्तार झाला तो साधारण 1983-84 नंतर. त्यावेळी दूरदर्शन ही एकमेव वाहिनी होती. देशात जेव्हा-जेव्हा निवडणुका असायच्या तेव्हा त्याचे वृत्तांकन व विश्लेषण करायला प्रणव रॉय आणि विनोद दुआ ही मंडळी यायची. विविध आकड्यांचे विश्लेषण करून ते प्रेक्षकांना निवडणुकांच्या खाचाखोचा समजावून सांगायचे. त्यात सेफॉलॉजी निवडणूक शास्त्र या विषयाची लोकांना ओळख झाली. याच सेफॉलॉजीतून पुढे दोन शाखा निर्माण झाल्या. पहिला ओपिनियन पोल आणि दुसरी एक्झिट पोल. हे पोल किती अचूक असतात आणि याची सुरुवात कशी झाली हे जाणून घेऊया. (Exit Polls)

ओपिनियन पोल याचा अर्थ निवडणुकीच्या आधी, अगदी निवडणुकीची शक्यता नसतानाही, लोकांच्या मतांचा घेतलेला अंदाज. यालाच मतचाचण्या म्हणतात. या चाचण्या करताना मतदार खरे उत्तर देईलच, याची शाश्वती नसते. त्यामुळे त्यांच्या चुकण्याची शक्यता असते. एक्झिट पोल मात्र निवडणुकीच्या दिवशीच, मतदारांनी मतदान करून आल्यानंतर लगेचच, घ्यायचा असतो. तुम्ही कोणाला मतदान केले आहे, या प्रश्नाला सहसा मतदार खरे उत्तर देतात. त्यामुळे त्यावरून निवडणुकीचा बऱ्यापैकी अचूक अंदाज लावता येतो. मार्केटिंगच्या अनेक कल्पनांपैकी याही कल्पनेचा जन्म अमेरिकेत झाला. तिकडे भारताच्या खूप आधी, म्हणजे 1950 च्या दशकाच्या सुरुवातीला निवडणुकांचे भविष्य वर्तविण्यासाठी याचा पहिल्यांदा वापर झाला. तिथे या शास्त्राला चांगले बळ मिळाले आहे आणि तो एक स्वतंत्र उद्योग बनला आहे. त्यामुळे अमेरिकेत तो गांभीर्याने घेतला जातो. म्हणूनच अमेरिकेप्रमाणेच भारतातही एक्झिट पोलला राजकारणात वाढते महत्त्व येऊ लागले. (Social News)

भारतात एक्झिट पोल्सचे प्रस्थ वाढू लागले ते साधारण 1999 पासून. तोपर्यंत या पोलना मनोरंजन या पलीकडे फारसे स्थान नव्हते. राजकारणात काँग्रेसचेच वर्चस्व होते आणि त्यामुळे राजकारणात फारशी अनिश्चितता नव्हती. पण 1990 च्या दशकात भाजपचे बळ सातत्याने वाढत गेले, दुसरीकडे काँग्रेसेतर व भाजपेतर पक्षांची संख्या वाढत गेली. त्यामुळे निवडणूक निकालांचा अंदाज बांधणे अधिकाधिक कठीण होऊ लागले. अशा वेळेस एक्झिट पोल हे निवडणूक निकालाचा अंदाज बांधण्यासाठी हक्काचे साधन ठरू लागले. अशातच 1999 मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ) विजय मिळवला, तेव्हा एक्झिट पोल्सने बऱ्यापैकी अचूक अंदाज वर्तविला होता. तेव्हापासून बहुतेक राजकीय पक्षांनी त्यावर विसंबून राहायला सुरूवात केली. (Exit Polls)

वर म्हटल्याप्रमाणे, सेफॉलॉजी हे एक शास्त्र आहे, परंतु कोणत्याही दोन मतदानाचे निकाल समान नसतात. तसेच, भारतातील राजकारण पाश्चिमात्य देशांपेक्षा खूप खूप गुंतागुंतीचे आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये बहुतेक लढती केवळ दोन पक्षांत असतात. देशांमध्ये प्रत्येक निवडणूक ही चुरशीची असते, तिथे सहानुभूतीची लाट किंवा अन्य एखादी लाट असा प्रकार क्वचितच असतो. हे बहुसंख्य मतदार त्यांच्या पक्षांशी दृढपणे बांधिल असतात. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांची ठराविक मते स्थिर असतात. केवळ किती मते फिरणारी आहेत याची गणना केली, की निकालाचे अनुमान लावता येते. त्यांच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याची उदाहरणे फारच कमी आहेत. म्हणून त्यांचे अंदाज वर्तविणे सोपे जाते. (Social News)

भारतात परिस्थिती वेगळी आहे. भारतात एकतर बहु-पक्षीय प्रणाली आहे. यातील प्रत्येक पक्षाची कोणाशी युती असते तर कोणाशी छुपी युती असते. प्रत्येक निवडणुकीत मूळ मतांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतो शिवाय स्थानिक पातळीवरची गणिते वेगळी असतात. विधानसभा आणि लोकसभा पातळीवर वेगवेगळ्या नेत्यांचे वर्चस्व असते. यामुळे दोनपेक्षा जास्त पक्षांमधील मतांच्या बदलामुळे स्विंग फॅक्टरची गणना करणे हे एक जटिल कार्य असते. त्यामुळे स्विंग ॲनालिसिसचा वापर करणे भारतात खूप कठीण आहे. त्यामुळे ही मूळ पाश्चात्य संकल्पना वारंवार फसली आहे. उदाहरणच द्यायचे झाले, तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मिळालेल्या विजयाने उत्साहित होऊन 2004 मध्ये मुदतपूर्व निवडणुका घेतल्या होत्या. एनडीएने त्यावेळेस “इंडिया शायनिंग”ची घोषणा देऊन प्रचार केला होता. त्यावेळी एक्झिट पोल्सनी एनडीएला 240 ते 275 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता, परंतु प्रत्यक्षात एनडीएला केवळ 187 जागा मिळाल्या. काँग्रेस व त्याच्या सहकारी पक्षांना (यूपीए) अनपेक्षित अशा 216 जागा मिळाल्या. त्याच प्रमाणे 2021 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत बहुतांश एक्झिट पोल्सनी भाजपच्या विजयाचा अंदाज व्यक्त केला होता, परंतु प्रत्यक्षात तृणमूल काँग्रेसने मोठा विजय मिळवत सत्ता राखली होती. (Exit Polls)

Exit Polls

हे एक्झिट पोल खरे असतात तेव्हाही त्यांची अचूकता संशयास्पद असते. उदा. 2014 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एक्झिट पोल्स आणि प्रत्यक्ष निकाल यांच्यात मोठी तफावत होती. एक्झिट पोल्सनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विजयाची भविष्यवाणी नक्कीच केली होती, मात्र एनडीए बहुमतापासून खूप दूर असेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. एनडीएला 261 ते 289 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. प्रत्यक्षात, एनडीएने 336 जागा जिंकल्या आणि एकट्या भाजपने 282 जागा मिळविल्या. काँग्रेसला ऐतिहासिक पराजयाचा सामना करावा लागला, त्याला केवळ 44 जागा मिळाल्या. तसेच, 2009 लोकसभा निवडणुकीत अनेक एक्झिट पोल्सनी काँग्रेसला निसटता विजय मिळेल असा अंदाज वर्तवला होता, पण मतदारांनी यूपीएला भरभरून विजय दिला. अगदी यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही कमीत कमी 12 एक्झिट पोल्सनी एनडीएला मोठे बहुमत मिळण्याची भविष्यवाणी केली होती. यातील काहींनी तर ‘400 पार’चा अंदाज वर्तविला होता. वास्तवात, एनडीएला 293 जागा मिळाल्या, त्यातील भाजपला 240 जागा मिळून त्याचे एकहाती बहुमत हुकले. याच प्रमाणे 2023 मधील छत्तीसगड विधानसभा निवडणूक, 2015 मधील बिहार विधानसभा निवडणूक , 2015 मधील दिल्ली विधानसभा निवडणूक ही फसलेल्या एक्झिट पोलची काही प्रमुख उदाहरणे आहेत. नाही म्हणायला, एक्झिट पोल बऱ्याचदा वास्तवही ठरले आहेत. उदा. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोल्सनी एनडीए पुन्हा विजयी होईल, असे भाकीत वर्तविले होते. (Social News)

======

हे देखील वाचा : या निवडणुकांनी गृहयुद्धच उभे केले !

====

तसेच 2017 मधील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा अंदाज बरोबर वर्तविला होता. अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरही, ब्रिटन आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये ते अनेक वेळा फसले आहेत. तिकडच्या समाजाचे स्वरूप भारतापेक्षा कमी गुंतागुंतीची असूनही त्यांचे अंदाज चुकले आहेत. उदाहरणार्थ, अमेरिकेत एक्झिट पोलने 2004 मध्ये जॉन केरी यांच्या विजयाचा अंदाज वर्तवला होता, पण त्यांचा पराभव झाला. अगदी यंदाही अमेरिकेत बहुतेक कलचाचण्यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात निकराची लढत होईल, असा अंदाज वर्तविला होता. एक्झिट पोलनीही दोघांमध्ये चुरस असेल, असे म्हटले होते. प्रत्यक्षात ट्रम्प यांनी ऐतिहासिक विजय मिळविला आहे. एकंदर पाहता, भारतात एक्झिट पोल्सचा इतिहास संमिश्र राहिला आहे. बहुतेक पाश्चात्य लोकशाहींमध्ये राजकारण आणि समाजाचे स्वरूप भारतापेक्षा खूप वेगळे आहे. शिवाय निवडणुकीची पद्धतही खूप वेगळी आहे. त्यातच सुरूवातीला प्रामाणिकपणे एक्झिट पोल घेणाऱ्या संस्थांसोबत अनेक व्यावसायिक आणि तद्दन नफेखोर संस्थाही यात शिरल्या. त्यांनी आपल्या राजकीय मालकांसाठी चक्क खोट्या मतचाचण्या व एक्झिट पोल आणायला सुरूवात केली. हे लक्षात घेतले म्हणजे भारतात एक्झिट पोलची अवस्था एवढी वाईट का होते, याची कल्पना येऊ शकते. राजकीय भाषेतच बोलायचे झाले तर एक्झिट पोल्सना जेवढा जय मिळाला आहे, तेवढाच पराजयही वाट्याला आला आहे. (Exit Polls)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.