अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प पुढच्या 20 जानेवारीला शपथ घेणार आहेत. मात्र त्यापूर्वीच अमेरिकेत अनेक घटना घडू लागल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे, अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्यांचा चक्क तुटवडा निर्माण झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत विजयी होताच अमेरिकेतील महिलांनी थेट गर्भनिरोधक गोळ्यांच्या खरेदीसाठी गर्दी केली आहे. येथील महिलांनी स्वतःसाठी आणि कुटुंबातील इतर महिलांसाठी ही गर्भनिरोधक गोळ्या खरेदी करून साठवून ठेवण्यास सुरुवात केली आहे. ट्रम्प यांच्या निवडणूक मोहिमेत गर्भपाताचा मुद्दा प्रमुख होता. ट्रम्प यांनी 16 आठवड्याच्या गर्भपातावर बंदी घालणार असे सुतोवाच केले होते. त्यामुळे ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यावर गर्भनिरोधक गोळ्यांवर बंदी आणतील अशी भीती अमेरिकेत पसरली आहे. परिणामी गर्भनिरोधकांच्या विक्रीत 1000 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर काही ठिकाणी रुग्णालयांमध्ये कायमस्वरुपाची नसबंदी करण्याच्या मागणीत वाढ झाल्यानंही खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील अनेक डॉक्टर आणि औषध विक्रेते त्यांच्याकडे महिलांची संख्या वाढली असून त्यांना भविष्याची भीती वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात ट्रम्प गर्भधारणेसंदर्भात काही कडक कायदा करतील त्या आगोदर पुरेपूर गर्भनिरोधक गोळ्यांचा साठा आपल्याकडे रहावा म्हणून महिलांनी ऑनलाईनंही या गोळ्या बुक करण्याचा विक्रम केला आहे. (America)
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यावर तेथील महिलांमध्ये वेगळीच चिंता पसरली आहे. या महिलांना ट्रम्प गर्भधारणेसंदर्भात कायदा आणतील अशी चिंता आहे. तसेच गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापरावरही बंदी येईल, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. येथील अनेक सूपर मार्केटमध्ये या गोळ्या संपल्या असून त्यांची मागणी हजारोंनी आहे. ही मागणी एवढी वाढली की डॉक्टर असोसिएशनला त्यासाठी पुढे यावे लागले आहे. कारण या गर्भनिरोधक गोळ्यांचा तुटवडा सर्वदूर जाणवत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात या गोळ्या खरेदी झाल्यामुळे चिंताही व्यक्त करण्यात येत आहे. डॉक्टर असोसिएशनने यासंदर्भात एक माहितीपत्रकच जाहीर केले आहे. त्यानुसार देशभरात दीर्घकालीन गर्भनिरोधक आणि कायमस्वरूपी नसबंदीच्या विनंत्या वाढल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. ट्रम्प यांचा विजय झाल्यावर पहिल्या 60 तासातच गर्भनिरोधकांच्या विक्रीत 966% वाढ नोंदवली गेल्याची माहितीही उघड झाली आहे. ट्रम्प पहिल्यांदा अमेरिकेते अध्यक्ष झाले तेव्हाही अमेरिकेत अशीच घबराट पसरली होती. मात्र आता यात वाढ झाली आहे. (Political News)
गर्भपातविरोधी वकिलांनी गर्भपाताच्या गोळ्यांवर आणखी निर्बंध लादण्यासाठी डोनाल्ड ट्रम्पकडे मागणी केली आहे. ट्रम्प यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे भविष्यात अमेरिकेत गर्भपाताच्या संदर्भात कडक कायदा येईल, ही भीती महिलांच्या मनात आहे, त्यामुळेच या गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी वाढली आहे. अर्थात ट्रम्प यांनी आपल्या नंतरच्या मुलाखतीमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांबाबत स्पष्ट विधान करण्याचे टाळले होते. सध्या अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध असलेल्या औषध निर्माण कंपनी एड ॲक्सेसला अवघ्या 12 तासांत 5,000 गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे. याशिवाय आपत्कालीन गर्भनिरोधकांच्या मागणीतही वाढ झाली आहे. आपत्कालीन गर्भनिरोधक पुरवणारी टेलिहेल्थ सेवा Wisp ने 300% वाढ नोंदवली आहे. दरम्यान, गर्भपाताच्या ऑपरेशनसाठीही नोंदणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. Winx या कंपनीने एका दिवसात गर्भनिरोधकांच्या विक्रीत सहा पट वाढ झाल्याचे सांगितले आहे. (America)
======
हे देखील वाचा : ट्रम्पची सेना
====
येथील काही डॉक्टरांनीही महिलांच्या मनातील या भीतीबददल चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्याकडे दीर्घकालीन गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी महिला करत आहेत. प्रसूती-स्त्रीरोगतज्ज्ञाकडे कायमस्वरूपी नसबंदी करण्यासाठीही महिला चौकशीसाठी येत आहेत. अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या या प्रिस्क्रिप्शनशिवाय उपलब्ध आहेत. गेल्या वर्षी, अन्न आणि औषध प्रशासनाने ऑपिल ही गर्भनिरोधक गोळी सर्व वयोगटातील महिलांना प्रिस्क्रिप्शनशिवाय उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. यासंदर्भात अमेरिकेत दोन गट पडले आहेत. एका गटानं महिलांचा महिलांच्या शरीरावर अधिकार आहे, मूल हवं की नको, हा त्यांचा सर्वस्वी निर्णय असल्याचे सांगितले होते. कमला हॅरीसनीही हाच पक्ष घेतला होता. मात्र ट्रम्प यांची भूमिका विरोध असल्यानं आता ट्रम्पच्या दहशतीपोटी गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ झालीआहे. (Political News)
सई बने