आज २९ ऑक्टोबर रोजी आपण दिवाळीचा पहिला दिवस अर्थात धनत्रयोदशी साजरी करत आहोत. आजच्यादिवशी लक्ष्मी, कुबेर आणि धन्वंतरी देवाची पूजा केली जाते. धनत्रयोदशी किंवा धनतेरस दोन शब्दांपासून बनलेली आहे, पहिला शब्द ‘धन’ म्हणजे संपत्ती आणि दुसरा ‘तेरस किंवा त्रयोदशी’. धनत्रयोदशी अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. असे मानले जाते की समुद्रमंथनानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी हातात अमृताचे भांडे घेऊन प्रकट झाले. धन्वंतरी हे भगवान विष्णूंचे आंशिक अवतार मानले जातात. भगवान धन्वंतरी यांना आयुर्वेदाचे जनक म्हटले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी यमराजा पूजाही करण्यात येते. आज यमदीप देखील लावण्याचे खूप महत्व आहे. जाणून घेऊया या यमदीप लावण्याचे महत्व.
आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी, यमराजाला प्रसन्न करण्याकरिता या दिवशी यमदीपदान केले जाते. अपमृत्यु म्हणजेच अकाळी, अपघाताने मृत्यु येऊ नये याकरिता सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेस ज्योत करून ठेवला जातो. याला यमदीप दान देखील म्हटले जाते. वर्षातील हा एकमेव दिवस आहे जेव्हा मृत्यूच्या देवाची पूजा केली जाते आणि यम दीप प्रज्वलित केला जातो.
प्रदोषकाळात यमदीप दान करण्याची परंपरा आहे. असे म्हणतात की, दिव्यामध्ये तमोगुणी ऊर्जा लहरी आणि नकारात्मक तमोगुणी लहरी शांत करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असते. दिवा तयार करण्यासाठी गव्हाच्या पिठात हळद घालून पिठ मळून घ्या. नंतर त्याचा दिवा बनवावा. काही ठिकाणी चारमुखी दिवा बनवला जातो. त्यानंतर स्वच्छ कापूस घेऊन दोन लांब वाती करा. त्यांना दिव्यामध्ये एकमेकांच्या आडव्या दिशेने अशा प्रकारं ठेवा की वातीची चार टोकं दिव्याच्या बाहेर आपणास दिसतील. आता त्यात तिळाचं तेल टाका. आणि घराबाहेर दक्षिण दिशेला हा दिवा ठेऊन नमस्कार करावा. घराची दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते. त्यामुळे यमदीप दक्षिण दिशेला लावावा.
धनतेरसच्या दिवशी २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजून ३८ मिनिटे ते ६ वाजून ५५ मिनिटे या वेळेत यप दीप प्रज्वलित करता येईल.
यमदीपदानाची कथा
एकदा यमराजांनी आपल्या दूतांना विचारले की, लोकांचे प्राण घेताना त्यांना दया येत नाही का? यावर यमदूतांनी नकारार्थी उत्तर दिले. यमराजांनी दूतांना सत्य सांगण्यास सांगितले. यावर यमदूतांनी सांगितले की, एकदा कुणाचातरी जीव घेताना त्यांचे मन भयभीत झाले होते.
हंस नावाचा राजा दुसऱ्या राज्यात शिकारीसाठी गेला होता. त्या राज्याचा राजा त्याचा खूप आदर करत असे. त्याच दिवशी राजाच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. ज्योतिषशास्त्रानुसार, असे सांगण्यात आले होते की लग्नानंतर चार दिवसांनी मुलाचा मृत्यू होईल. हे ऐकून राजाने मुलाला गुहेत सोडले आणि लोकांना त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले.
काही काळानंतर एका मुलीने त्या ब्रह्मचारी मुलाशी गंधर्व म्हणून लग्न केले. लग्नानंतर चार दिवसांनी मुलाचा मृत्यू झाला. यमदूतांनी सांगितले की त्या स्त्रीचा विलाप पाहून त्यांचे हृदय भरून आले. या घटनेनंतर यमराज म्हणाले की, धनत्रयोदशीच्या दिवशी विधीवत पूजा आणि दिवे दान केल्याने अकाली मृत्यू टाळता येतो. यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी यमाच्या नावाचा दिवा लावला जातो.
दीपदान मंत्र
मृत्यूनापाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह।
त्रयोदश्यां दीपदानात सूर्यज: प्रीयतां मम ।।
हा मंत्र म्हणून दिव्याला नमस्कार करावा.
यानंतर हातामध्ये फुल घेऊन खालील मंत्राचा उच्चार करत यमदेवाच्या दक्षिण दिशेला नमस्कार करावा.
ऊं यमदेवाय नम:। नमस्कारं समर्पयामि।।
त्यानंतर हे फुल दिव्याजवळ ठेवावे आणि हातामध्ये बताशा घेऊन खालील मंत्राचा उच्चार करत बताशा दिव्याजवळ ठेवावा.
==========
हे देखील वाचा : धनत्रयोदशीला पूजा केले जाणारे धन्वंतरी आहे कोण?
==========
ऊं यमदेवाय नम:। नैवेद्यं निवेदयामि।।
हातामध्ये थोडेसे पाणी घेऊन आचमन करण्यासाठी खालील मंत्राचा उच्चार करत दिव्याजवळ पाणी सोडा
ऊं यमदेवाय नम:। आचमनार्थे जलं समर्पयामि।
त्यानंतर पुन्हा ऊं यमदेवाय नम: मंत्राचा उच्चार करत दक्षिण दिशेला नमस्कार करा.
(Disclaimer – ही माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या.)